-
डॉ.
सुधीर रा. देवरे
अनेक
लोकांचे बोलीभाषेबद्दल काही समज आहेत. काही अपसमज आहेत. समाजात फक्त प्रमाणभाषा
असाव्यात. बोलीभाषा नकोत. भाषा जेवढ्या कमी असतील तेवढे दळणवळण सुलभ होईल असा
त्यांचा भाबडा समज असतो. ‘एक देश एक भाषा’ असा नाराही एकेकाळी गाजला आहे. (आणि
आताही तसा प्रयत्न होऊ पहात आहे.) आपली भाषा सोडून इतर भाषा वा बोलींबद्दल असं मत
मांडणं, अशा एखाद्या तथाकथित अभ्यासकाला शोभून दिसेल, ज्या अभ्यासकाचा एखादी बोली
बोलणार्या लोकांशी कधी कोणताही संबंध येत नाही. त्या बोलीतले अपरिहार्य लोकजीवन
त्याला माहीत नसतं. तरीही अशा विशिष्ट लोकजीवन व्यतीत करणार्या लोकांनी
प्रमाणभाषाच बोलावी असा त्यांचाआग्रह असतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला वा गटाला
एका विशिष्ट बोली व्यतिरिक्त कोणतीही भाषा बोलता येत नाही आणि तरीही ती भाषा
वाळीत टाकली जाते व त्या गटाला विशिष्ट भाषा बोलायला वा शिकायला भाग पाडलं जातं,
तेव्हा ही घटना माणसाच्या अस्तित्वालाच सुरूंग लावणारी ठरते. कोणीतरी आपली जीभ
कापून टाकतंय असा हादरवून टाकणारा त्यांचा हा अनुभव असतो.
विशिष्ट भौगोलिक परिसरातल्या
बोली त्या क्षेत्रातील प्रमाणभाषा बोलणार्या लोकांना थोड्याफार कळतात. अहिराणी
भाषा सुध्दा अनेक मराठी लोकांना कोणत्याही अडचणीशिवाय कळते. काही पारिभाषिक
शब्दांची अडचण येऊ शकते, पण एकूण मतितार्थ कळतो. मी संपादित करीत असलेले अहिराणी
माध्यमातील ‘ढोल’ आणि माझे अहिराणी लेख, पुस्तकं सुध्दा महाराष्ट्रभर आणि बाहेरही
सर्व चोखंदळ मराठी वाचकांना समजतात, याचा उल्लेख मी इथं मुद्दाम करीत आहे.
प्रमाण मराठीत सोपी अहिराणी
उपयोजित करावी असं माझं मत आहे आणि तो प्रयोग मी माझ्या लिखाणात करत असतो. (असा
प्रयोग प्रत्येक बोलीभाषकाने करावा.) आता सोपी अहिराणी म्हणजे काय यावरही नवा
आक्षेप येण्याची शक्यता असल्याने त्याचं स्पष्टीकरण आताच देऊन ठेवतो. जशी सोपी
मराठी, अवघड मराठी; सोपी हिंदी, अवघड हिंदी; सोपी इंग्रजी, अवघड इंग्रजी; अशी आपण
वर्गवारी करतो त्या अर्थाने सुलभ अहिराणी ही संज्ञा मी इथं वापरतो.
दुसरं
उदाहरण देतो: राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन नाटकातील भाषा मराठी आणि ग. दी.
माडगूळकर यांच्या कवितेची भाषाही मराठी. एक समजायला कठीण. दुसरी समजायला सोपी.
भाषा
ह्या प्रवाहासारख्या असतात. प्रवाहात नदीचं पात्र जसं पुढे विस्तृत होत जातं, तसंच
भाषेचंही असतं. भाषा एकच असली तरी आजची भाषा कालच्या भाषेपेक्षा वेगळी असते.
उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरांची मराठी, शिवाजी-तुकाराम यांची मराठी, ज्योतिराव
फुल्यांची मराठी, चिपळूणकरांची मराठी आणि आजची मराठी यांत जसं साम्य नाही, तसं
अहिराणीत आज आदिमपण दिसणार नाही. तसं कोणत्याच बोलीभाषेत आज आदिमपण दिसणार नाही.
आदिम, प्राचीन, आर्ष या
संज्ञा मी अहिराणीच्या वा कोणत्याही बोलीभाषेच्या संदर्भात वापरत नाही. लेखाचा तो
कधी विषय सुध्दा करत नाही. पण मध्यंतरी एका अभ्यासकाने अहिराणी ही आदिम बोली आहे
का, हा प्रश्न
विचारला होता. माझ्या कोणत्याही लेखात तसा उल्लेख नसताना हा प्रश्न विचारला गेला.
अहिराणीच नव्हे तर बहुतेक बर्याच बोली या आदिम आहेत. नैसर्गिक क्रमानुसार आधी
बोली निर्माण होतात आणि मग प्रमाणभाषा. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील एकमेकांना
लागून असलेल्या विविध बोलींच्या सरमिसळ मानवी व्यवहारातून प्रमाणभाषा निर्माण होत
असतात.
आज भाषेतील केवळ काही
शब्दांचे आदिमपण सांगता येतं. संपूर्ण भाषेचं आदिमपण दाखवता येत नाही. कारण अनेक
भाषांच्या आदान प्रदानातून सगळ्याच भाषा एकमेकांना पुरक होत राहतात. ज्या
अभ्यासकाचा उल्लेख केला त्यांनीच, संस्कृत आदिम भाषा आहे हे सांगताना संस्कृत मधील
‘विष्णु’ हा असा एकच शब्द सांगितला की ज्याची व्युत्पत्ती सांगता येत नाही. आणि
संस्कृत मधील या एका शब्दाची व्युत्पत्ती सांगता येत नाही म्हणून त्यांच्या मते
संस्कृत ही समग्र भाषा आदिम ठरते. अहिराणीचे आजही असे शंभर शब्द सहज सांगता येतील
की ज्यांची व्युत्पत्ती लावता येत नाही. त्या शब्दांचे नैसर्गिक स्त्रोत दाखवता
येत नाहीत. तरीही अहिराणी ही आदिम भाषा आहे असा दावा करणं अप्रस्तुत समजतो.
अहिराणी भाषेत प्रचलित मराठी
शब्दांचे अवशेष-रूपे दिसतात, हे खरं आहे. आज अहिराणी बोली बोलणारे लोक पहिलीपासून
मराठीत शिक्षण घेतात. त्यामुळे अहिराणीमध्ये मराठी शब्द आज प्रंचड प्रमाणात रूढ
झालेत. जेव्हा एखादी बोली प्रमाणभाषेच्या प्रभावाखाली येते तेव्हाच तिचं
अर्वाचिनीकरण होणं सुरू होतं. शब्द, व्याकरण आणि लिपीही प्रमाणभाषेकडून उसने घेतले
जातात. अहिराणीला स्वतंत्र लिपी नसल्याने जसं अहिराणी लिखाण मराठी म्हणजे देवनागरी
लिपीत लिहिलं. उपलब्ध मराठी लिपीत अहिराणी लिहिल्यामुळे तिचं दृश्य रूपच मराठी
दिसतं, तर मग ती आदिम कशी वाटेल? आणि ती आदिम आहे की नाही यावर चर्चा कशासाठी?
भाषेत जसं शब्दांचं आदान
प्रदान होत राहतं, तसं व्याकरणाचंही होत असतं. याचं एकच उदाहरण देतो. मराठी
व्याकरणानुसार वाक्याची सुरूवात ‘आणि’ या संज्ञेने होत नाही. ‘आणि’ ही संज्ञा वाक्याच्या मधे येत असते. पण इंग्रजी व्याकरणानुसार वाक्याची
सुरूवात (अँड) ‘आणि’ ने होते.
मात्र अलीकडच्या काळात मराठीतही ‘आणि’ ने सुरूवात होणारी वाक्य अनेक लेखकांकडून लिहिली जातात. संशोधनात्मक
प्रबंधांतही अशी वाक्य येत आहेत. हे इंग्रजी भाषकांकडून व्याकरणाचे आदान आहे. याचा
अर्थ मराठी भाषेला इंग्रजी व्याकरण आहे असं जसं म्हणता येणार नाही, तसं अहिराणीला
पूर्णपणे मराठी व्याकरण आहे, असं म्हणता येणार नाही.
ज्या प्राचीन भाषा इतर
भाषांच्या संपर्कात आल्या नाहीत त्यांचे आदिमपण आजही टिकून आहे. उदाहरणार्थ,
अंदमान बेटावरील जारवा या आदिम माणसांची भाषा आज आदिम- प्राचीन- आर्ष म्हणता येईल.
कारण जारवा ही जमात इतर लोकांच्या संपर्कात अजूनही आलेली नाही. ज्या बोली इतर
भाषांच्या संपर्कात आल्या त्यांचे प्राचीनत्व त्यांच्यातील काही शब्दांवरून ठरवता
येतं. भाषेवरून नाही.
जिथं
शब्द फक्त हुंकाराचं काम करतात अशा प्राचीन भाषांना अगदी सुरूवातीच्या काळात
व्याकरण नसतं. मात्र भाषेत वाक्ये यायला लागलीत की व्याकरण येतंच. म्हणून प्रत्येक
भाषेला व्याकरण असतं. बोलीभाषांना व्याकरण नसतं, हा समज चुकीचा आहे. त्या
बोलीभाषेचं व्याकरण आतापर्यंत कोणी लिहिलं नसेल, व्याकरण समजून सांगितलं नसेल,
अथवा त्या भाषेतल्या व्याकरणाचं पुस्तक प्रकाशित झालं नसेल. पण त्या बोलीला
व्याकरणच नाही असं म्हणता येणार नाही.
परंपरेने चालत आलेल्या
नैसर्गिक लोकबोली वेगळ्या आणि पिजीन - क्रिऑल या कृत्रीम तयार झालेल्या बोली
वेगळ्या. बोलींपासून व्यावहारीक प्रमाणभाषा तयार होतात. मात्र पिजीन - क्रिऑल
सारख्या कृत्रीम बोली या प्रमाणभाषेपासून तयार होत असतात. उदाहरणार्थ, मुंबईची
हिंदी बोली ही अनेक प्रमाणभाषांच्या संकरातून तयार झालेली क्रिऑल भाषा आहे. (काही
गुप्त व्यवहारांसाठीही कृत्रीम सांकेतिक भाषा तयार केल्या जातात, त्यांनाही बोली
म्हणता येत नाही.)
एक अभ्यासक म्हणाले की, ‘बोली
सुधारल्या तर मराठी सुधरेल असं तुम्हाला का वाटतं?’ हा प्रश्न ऐकून चक्रावण्याची
वेळ आली. असं आतापर्यंतच्या माझ्या लिखाणात कुठंच म्हटलेलं नाही. बोली मुळीच
सुधारायच्या नाहीत. त्यांचं संवर्धन करायचं आहे. बोली जशा आहेत त्याच स्वरूपात
त्या वाचवायच्या आहेत. इतर भाषेतील शब्दांऐवजी मूळ भाषेतील शब्द सापडत असतील तर
बोलीत ही दुरूस्ती नक्कीच करायला हवी. बोली वाचवल्या तर प्रमाणभाषा टिकतील आणि सकस
समृध्द होतील हे मात्र खरं आहे.
‘अहिराणी ही अहिर लोकांचीच
भाषा आहे, हे कशावरून?’ हा एक आक्षेप. अभिर लोकांचा एक समूह होता जो नैऋत्य कडून
आला, असं इतिहासकारांनी आधीच नमूद करून ठेवलं आहे. अभिरचा अपभ्रंश नंतर अहिर झाला.
अहिर हे एका विशिष्ट जातीचे नव्हते. म्हणून आजही अहिर कुणबी, अहिर सोनार, अहिर
लोहार, अहिर शिंपी अशा सर्व जातीत अहिर हे कुळ आढळतं. अहिर लोकांची भाषा ती
अहिराणी. आणि तेव्हापासून म्हणजे तिच्या उगमापासूनच ती लोकभाषा आहे.
लोकदेव म्हणजे काय हे सुध्दा
अनेक लोकांकडून विचारलं गेलं. पण आतापर्यंतच्या ग्रंथांतल्या विवेचनावरून ते सह्ज
लक्षात येतं. लोकांनी लोकांसाठी तयार केलेला तो लोकदेव. लोकदेव हा लोकांचा
साधासुधा देव असतो. लोकांचं अन्न ते त्याचं अन्न. लोकांचे कपडे ते त्याचं वस्त्र.
कानबाई, म्हसोबा, आसरा, मुंजोबा, वाघदेव, नागदेव, खांबदेव, पिरोबा, खंडोबा,
डोंगरदेव, कन्सरा माऊली आदी अहिराणी पट्यातील लोकदेव आहेत आणि या लोकसंस्कृतीतून
लोकभाषा घडत असते.
एका
अभ्यासकाने जे काही म्हटलं आहे त्या आक्षेपाला काय उत्तर द्यावं सुचत नाही.
बोलीभाषा टिकवल्या पाहिजेत, त्या मरू देता कामा नयेत, त्यांचं संगोपन करणं,
त्यांचे डॉक्युमेंटेशन करणं, बोलीभाषा बोलणार्या लोकांना समजून घेणं आदी
प्रकारच्या सर्व कामाला त्यांनी प्रतिगामी ठरवलं आहे. आणि बोलीभाषा मारून
प्रमाणभाषेकडे जाणं म्हणजे त्यांना पुरोगामी वाटतं. अशी संकुचित टिका याआधी कधीच
ऐकली नव्हती. पण अशा विचारांचे लोकही आहेत हे लक्षात येतं. अशा विचारांच्या
लोकांनी मराठी भाषेत तरी का बोलावं आणि मराठीत का लिहावं? कारण मराठी सुध्दा
महाराष्ट्रापुरती एक बोलीभाषाच आहे. या बोलीभाषेत व्यवहार करून प्रतिगामी
ठरण्यापेक्षा त्यांनी जागतिक भाषेत म्हणजे फक्त इंग्रजीत व्यवहार करून पुरोगामी
असणं इष्ट ठरेल.
याचं
उत्तर कदाचित ते देतील की मराठी ही आमची मातृभाषा आहे म्हणून आम्ही ती उपयोजित
करतो. मग वेगवेगळ्या बोली बोलणार्यांची आणि बोलीभाषा जतन करणार्यांचीही तीच
भूमिका आहे हे त्यांच्या लक्षात का येत नाही.
(‘अक्षरदान’ 2019
च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या दीर्घ लेखाचा काही भाग. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा