मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

अंत्यसंस्कारांचे कार्यक्रम



-         डॉ. सुधीर रा. देवरे

     सुख असो की दु:ख. लग्न असो की मृत्यू. कार्यक्रम भरगच्च हवाच. खूप गर्दी हवी कार्यक्रमाला. माणसाला गर्दीशिवाय सु साजरं करता येत नाही की दु:ख. जेवढी गर्दी तेवढा जसा मोठा आनंद; तशी जेवढी गर्दी, तेवढं प्रचंड मोठं दु:खं. माणसाला गर्दी आवडते. दु:खात सुध्दा आपल्या आजूबाजूला प्रचंड गर्दी हवीच. गर्दीने दु:खाची सुध्दा प्रतिष्ठा वाढते असा आपला समज होतोय का?
     या कार्यक्रम शरण समाजात माणूस संपला तरी कार्यक्रम चुकत नाहीत. दु:ख आवरून कंबर खोचून कार्यक्रम साजरे करायचे असतात. नाहीतर लोक काय म्हणतील! याला मुळी प्रेमच नव्हतं. म्हणून कार्यक्रम करत नाही.
     माणूस वारला. लोकांची गर्दी जमली पाहिजे म्हणून दु:ख आवरून फोनाफोनी करून लोक गोळा करू. (आवश्यक ते नातेवाईक जमलेच पाहिजेत.) गल्लीने मिरवत प्रेतयात्रा निघते, हे ठीक आहे. शेवटची यात्रा नीट निघाली पाहिजे, हे ही समजण्यासारखं आहे. प्रचंड गर्दीने स्मशानात जाऊन प्रेताला अग्नीडाग देण्याचा कार्यक्रम. आता या कार्यक्रमात भाषणांचाही कार्यक्रम आवश्यक झाला आहे.
     दुसर्‍या दिवशी सकाळी राख सावडण्याचा कार्यक्रम. दारावर येणार्‍या लोकांसमक्ष (विशेषत: महिलांनी) रडून शोक प्रदर्शनाचा कार्यक्रम. नदीत अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम. दहाव्याला पुरूषांच्या डोक्याचे केस काढण्याचा कार्यक्रम. कपाळाला टिळा लावण्याचा कार्यक्रम. जेवणाची पंगत देण्याचा कार्यक्रम. अकराव्या दिवशी अकरा सवाष्णी जेऊ घालण्याचा कार्यक्रम. बाराव्याला दिवस म्हणतात. दिवसाला जेऊ घालण्याचा कार्यक्रम. काशीला जाऊन आलेल्या माणसाचा तेराव्याला पुन्हा जेवणाचा कार्यक्रम.
     महिण्याचा पित्तर म्हणजे जेवणच. बारा महिणे होईपर्यंत दर महिण्याला पितरांचं जेवण. शेवटी वर्षाचा पित्तर म्हणजे पुन्हा जेवणच. (दरवर्षी भादव्यात पुन्हा पित्रांचा कार्यक्रम ठरलेला.) बाप रे! दम लागून आला नुसतं सांगूनच. परंपरेतून एवढे कार्यक्रम करणार्‍यांचं काय होत असेल? (म्हणजे आपल्या सगळ्यांचंच...)
     अशा कार्यक्रमांना फाटा देत वाचवलेल्या पैशांतून, जगाचा निरोप घेऊन गेलेल्याच्या स्मरणार्थ चांगलं सामाजिक काम उभं राहू शकतं. हयात नसलेली व्यक्तीही अशा चांगल्या कामांमुळे नाव रूपाने अमर होऊ शकते. याचा विचार वारसांनी करायचा असतो.      
     (अप्रकाशित. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 © डॉ. सुधीर रा. देवरे
 ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा