सोमवार, १५ एप्रिल, २०१९

आणीबाणी


-         डॉ. सुधीर रा. देवरे

     देशात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा मी पाचवी सहावीत असेल. या वयात आणीबाणीचा मला काहीच फरक पडणार नव्हता. पडला नाही. माझे वडील प्राथमिक‍ शिक्षक होते. आमच्या विरगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एका लहान गावाला वडिलांची बदली होती. वडील शाळेत पायी जात. तिकडूनही पायी यायचे. त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळेत एसटी नव्हती. पायी जायचं आणि वेळेवर शाळेला पोचायचं. म्हणून वडील पहाटे शाळेला निघत. आणीबाणी असल्याने शाळेला उशीरा जाऊन चालणार नाही असं त्यांच्या बोलण्यातून कळत असे. पण आणीबाणी म्हणजे नेमकं काय हे ते समजण्याचं वय नव्हतं.
     गावात किराणा दुकान होतं. दुकानात वर्तमानपत्र यायचं. मी अधुन मधून किराणा दुकानात जाऊन वृत्तपत्र वाचायचो. त्यात आणीबाणीच्या काही बातम्या असत. पण त्यातलं राजकारण मला त्या वयात समजण्यापलीकडचं होतं. आणीबाणीमुळे पेपरात खर्‍या बातम्या येत नाहीत असं वडील म्हणायचे. यावर म्हणजे काय?’ माझा प्रश्न ठरलेला. मी पेपर वाचायचो. त्यात तर बातम्या असायच्या. मग खर्‍या बातम्या, खोट्या बातम्या कशा ओळखायच्या. कळत नव्हतं.
     त्यानंतर देशात निवडणुका जाहीर झाल्या. यावेळी मला बर्‍यापैकी कळायला लागलं होतं. प्रचारात जनता पक्षाकडून आणीबाणीवर बोललं जात होतं. सरकारवर घणाघाती टीका केली जात होती. सर्व पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष निवडून आला. इंदिरा गांधींचा पराभव झाला. त्यावेळी रेडिओवर बातम्या ऐकताना आमच्या गावचा एक माणूस इंदिरा गांधींना उद्देशून म्हणाला, आनीबानी आनस नही का, आता व्हयी गयी कानीबानी! हा त्यांचा उद्‍गार माझ्या लक्षात आहे. आणीबाणी लावली म्हणून इंदिरा गांधीचं सरकार गेलं, इतकी आणीबाणी वाईट असते, हे त्यावेळी समजलं. पण आणीबाणी वाईट म्हणजे नेमकं काय ते समजत नव्हतं. (आणि ती आणीबाणी इतकी वाईट होती तर फक्‍त अडीच वर्षात इंदिरा गांधींना लोकांनी पुन्हा पंतप्रधानपदी कसं बसवलं?) 
     तेव्हा देशात आ‍णीबाणी असूनही सरकारच्या विरूध्द जाणार्‍या लोकांनी त्या सरकारला जातीयवादी म्हटल्याचं आठवत नाही. विशिष्ट समुदायाचं राजकारण होतं, असं कोणी म्हटलं नाही. सरकारनेही विरोधकांना जातीय म्हटलं नाही. दोन्ही बाजूने जातीय- धर्मीय दुजाभाव झाला नाही. देशात कळपाने एकत्र येऊन कोणाला बदडून जिवानिशी मारलं नाही. देशातल्या विरोधकांना आणि बुध्दीवाद्यांना तुरूंगात डांबलं, पण स्वयंघोषित देशभक्‍तांनी साहित्यिक-विचारवंतांची हत्त्या केली नाही.
     आणीबाणीत जातीय- धर्मीय दंगे झाले नाहीत. दुसर्‍या देशात चालते व्हा’, असं सरकारने आपल्या विरोधकांना म्हटलं नाही. परकीय शक्‍तीचा हात असं सरकारने म्हटलं असेल पण कोणाला देशद्रोही ठरवलं नाही. आणीबाणी असूनही देशात यादवी माजली नाही. अनेक झेंड्यांचे अनेक कळप देशात निर्माण झाले नाहीत. सरकार प्रणित अनेक छुप्या संघटनांनी देशभर आपला अजेंडा राबवला नाही. सरकारबद्दल नाराजी होती पण देश सोडण्याची भाषा साहित्यिक- कलावंत-  विचारवंतांनी केली नाही. सरकारविरूध्द बोलणे हा सरकारद्रोह होता. देशद्रोह नव्हता. तथाकथित संतांकडून चार- पाच मुलं जन्माला घालायला सांगितलं जात नव्हतं. उलट नसबंदी कार्यक्रम राबवला जात होता. बलात्कार कमी कपड्यांमुळे होतात, असं सरकारातला कोणी मंत्री म्हणत नव्हता. मुलगी आवडली तर पळवून आणू असं सरकारचा एखादा आमदार म्हणत नव्हता. 
     तेव्हा फक्‍त आकाशवाणी आणि दूरदर्शन अस्तित्वात होते आणि ते सरकारी मालकीचे होते. (खेड्यात फक्‍त रेडीओ. तो सुध्दा प्रत्येक घरात नव्हता.) म्हणून सरकार बद्दल सर्व गोड गोड ऐकायला मिळायचं. आज देशात शेकडो खाजगी चॅनल आहेत, पण ते नागरिकांच्या बाजूने का बोलत नाहीत, कळायला मार्ग नाही.  
     (‘साधना साप्ताहिक 29 सप्टेंबर 2018 च्या अंकात प्रकाशित झालेला लेख. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

1 टिप्पणी: