-
डॉ. सुधीर रा. देवरे
या
लेखात सटाणा शहराचा विचार केला असला तरी सर्वदूरच्या (महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र)
वाचकांनी सटाणा हे शहर उदाहरणार्थ म्हणून समजावं. ज्यांनी दूरदृष्टीने जल
व्यवस्थापन केलं नाही अशा सर्व गाव- शहरांत कमी अधिक प्रमाणात या वर्षी पाणी टंचाईची
अशीच भीषण अवस्था आहे :
सटाणा
शहराचा पाणी प्रश्न तीस- चाळीस वर्षांपासून तसाच टांगणीला पडला आहे. ‘तहान
लागल्यावर विहीर खोदणे’ या वाक्प्रचारासारखं सटाण्याचं झालं आहे. पाणी टंचाई झाली
की बोलायचं. नदीला आवर्तन सुटलं की आपल्यापुढे पाण्याचा प्रश्नच नाही असं वागायचं.
जमिनीत
बोरवेल करून जो तो आपापला पाणी प्रश्न सोडवू पाहतो. काही अपवाद वगळता बरेच लोक
प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरतात. पाण्याची भरमसाठ नासधूस करतात. गावातल्या
लोकांना प्यायला पाणी नाही, हे माहीत असूनही आपल्याला
बंगल्यात गार वाटावं म्हणून भर दुपारी नळीने बंगल्यांच्या आजूबाजूला पावसाळा
वाटावा इतकं पाणी सांडतात. टाक्या ओसंडून छताच्या पन्हाळातून पाणी वाहतं. नळी
लावून रोज वाहनं धुतली जातात. (हे पाणी आता जास्त दिवस टिकणार नाही हे त्यांना
माहीत असायला हवं.) नदीला पाण्याचं आवर्तन आलं, की
शहरांच्या रस्त्यांतून- गटारीतून पिण्याचं पाणी वाहतं, पण नळ
कोणी बंद करत नाही. पिण्यासाठी नदीत धरणांतून पाणी सोडलं की नदीकाठचे शेतकरी वीज मोटर लावून नदीचं पाणी शेतात खेचून घेतात. नदीकाठी विहिरी
खोदून पाईप लाईन करून दूरवरून पाणी शेतात
घेऊन येतात. आवश्यकते इतकं पाणी वापरायला हरकत
नाही. पण अतिरेक होतोय. ‘पाण्यासारखा
पैसा खर्च करणे’ असा मराठी भाषेत पारंपरिक
वाक्प्रचार आहे. मात्र या पुढे हा वाक्प्रचार उलटा करावा लागेल. आता पाणी पैशांसारखं
काटकसरीने वापरावं लागेल.
काही वर्षांपूर्वी प्रयत्न करुनही केळझर योजना बारगळली. चणकापूरच्या पाणी आवर्तनांवर सटाणा शहर पहिल्यापासून तग धरून आहे. हे आवर्तन फक्त सटाण्यासाठी नाही. मालेगावला याच गिरणा नदीतून पाणी पुढे वाहतं. मालेगाव पस्तीस किमी पुढे असूनही हे पाणी मालेगावला पुढील आवर्तनापर्यंत पुरतं. सटाण्यापेक्षा मालेगावची लोकसंख्याही जास्त आहे. मालेगावला पाण्याचे कोणतेच स्त्रोत नाहीत. तरीही तिथं पाणी टंचाई नाही. कारण आधीपासूनच दूरदृष्टीने तयार करुन ठेवलेले तिथं तलाव आहेत. मालेगावच्या तुलनेने सटाण्याच्या आसपास पाणी स्त्रोत आहेत. ते आपण आतापर्यंत अडवले नाहीत. मुक्तपणे वाहून जाऊ दिले. याचाच अर्थ सटाण्यात पाण्याची कृत्रिम टंचाई आहे. नैसर्गिक नाही.
काही वर्षांपूर्वी प्रयत्न करुनही केळझर योजना बारगळली. चणकापूरच्या पाणी आवर्तनांवर सटाणा शहर पहिल्यापासून तग धरून आहे. हे आवर्तन फक्त सटाण्यासाठी नाही. मालेगावला याच गिरणा नदीतून पाणी पुढे वाहतं. मालेगाव पस्तीस किमी पुढे असूनही हे पाणी मालेगावला पुढील आवर्तनापर्यंत पुरतं. सटाण्यापेक्षा मालेगावची लोकसंख्याही जास्त आहे. मालेगावला पाण्याचे कोणतेच स्त्रोत नाहीत. तरीही तिथं पाणी टंचाई नाही. कारण आधीपासूनच दूरदृष्टीने तयार करुन ठेवलेले तिथं तलाव आहेत. मालेगावच्या तुलनेने सटाण्याच्या आसपास पाणी स्त्रोत आहेत. ते आपण आतापर्यंत अडवले नाहीत. मुक्तपणे वाहून जाऊ दिले. याचाच अर्थ सटाण्यात पाण्याची कृत्रिम टंचाई आहे. नैसर्गिक नाही.
आता
सटाणा शहर पुनंद जलवाहिनी योजनेच्या आशेवर जगत आहे. ही योजना पूर्ण झाली पाहिजे. कोणत्याही
शहराला- गावाला सनदशीर मार्गाने पाणी मिळायला हवं. ‘सटाणा
तालुक्यातलं थोडंफार प्रमाणात पाणी पुनंद धरणात येतं, याचा अर्थ
सटाण्याला पाण्यावर हक्क सांगता येत नाही’, असं कळवणवासी
म्हणतात. समजा, तसं असलं तरी पिण्यासाठी पाणी मिळणं
हा सटाणा वासियांचा हक्क आहेच. बागलाणचा पश्चिम भाग हा विधानसभेच्या कळवण
मतदारसंघाला जोडण्यात आला आहे. आमदार ए. टी. पवार हे बागलाणच्या मतदानामुळेही
निवडून येत होते. ते अर्ध्या बागलाण तालुक्याचेही प्रतिनिधीत्व करीत होते, हे विसरून
चालणार नाही. म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या या धरणावर सटाण्याचा हक्क आहेच.
नाशिक जिल्ह्यांतील धरणांमुळे संपूर्ण
मुंबईची तहान भागते. गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडलं जातं. कर्नाटकातून
तामिळनाडूला पाणी सुटतं. इतकंच काय चीनचं पाणी भारतात आणि भारताचं पाणी
पाकिस्तानात जातं. मात्र कळवणचं पाणी सटाण्याला मिळू नये असं कळवणवासी म्हणतात!
(नद्या, धरणं, भूगोल, खगोल ही
राष्ट्रीय मालमत्ता असते. खाजगी नव्हे.) ह्या योजनेतून पाणी मिळेलच, अशी खात्री असली तरी आपण
पर्यायी व्यवस्था आज राबवली पाहिजे. एकाच कुठल्यातरी योजनेवर विसंबून राहता कामा
नये. (आतापर्यंत अशा होऊ घातलेल्या योजनांवर अवलंबून राहिलोत म्हणून आज हा भीषण
प्रसंग उद्भवला.)
ठेंगोड्याजवळील
(गिरणा नदीत) आपल्या विहिरीजवळ (मातीचा का होईना) बांध घालायला हवा. तसेच आरम नदीत
विशिष्ट अंतरावर चार बांध घालून पाणी अडवा- पाणी जिरवा योजना जन आंदोलनातून म्हणजे श्रमदानातून स्वयंत्स्फूर्तीने राबवू या.
नदीकाठी दोन विहिरी खोदाव्या लागतील. (आरमकाठी कोणी विधींना जाणार नाही याचीही खबरदारी
घ्यावी लागेल.) दोन्ही थड्यांवर झाडं लावून देवराई निर्माण करू या. या देवराईमुळे पर्यावरणाचे
रक्षण होईल, नदीतल्या पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही
आणि देवमामलेदारांच्या मंदिराची शोभा वाढेल. (संदर्भ: ‘माणूस जेव्हा देव होतो’ ग्रंथ.) सटाण्याच्या आसपास सरकारी जमीन ताब्यात
घेऊन पाण्याचा साठा करण्यासाठी तलाव उभारला पाहिजे. (जुन्या अमरधामजवळ आसपासच्या
गावातील वा सटाण्यातील नागरिकांनी विहिरींसाठी जमिनी घेऊन शेतीसाठी जलवाहिन्या
टाकल्या असतील; त्या पाणी टंचाई असतानाच्या काळात सक्तीने
बंद करून पाणी पिण्यासाठी राखीव ठेवता येईल. पाणी विकणार्या वाहनांनाही इथून पाणी
घ्यायला मनाई असावी.) पावसाळ्यातील पाणी वाहू न देता साठवलं पाहिजे. नदी नुसती
नांगरली तरी खूप पाणी मुरतं आणि गावाजवळची पाणी पातळी उंचावते. बांध घातले तर
त्याचा परिणाम लगेच दिसून येईल. रेन हार्वेस्ट योजना शहरांत राबवायला हवी. हे मी सर्व पाच वर्षांपासून मांडत आहे.
पण अजून प्रतिसाद मिळत नाही.
पृथ्वीवर
जवळपास सत्तर टक्के पाणी व्यापलेला भाग आहे. हेच पाणी पाऊस रूपाने गोड होत
आपल्याला मिळतं. म्हणून उरलेल्या तीस टक्के भागात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला
नको. पण ते जगभर जाणवू लागलं आहे. याचं कारण मानवाची हावरट वृत्ती. माणसाने
निसर्गाला अतोनात ओरबाडले- ओरबाडतो आहे. अजूनही वेळ गेली नाही. अशा वृत्तीवर संयम
ठेऊन मानसाने निसर्ग जपला पाहिजे. जंगलतोडीला आळा घालून वृक्षरोपण व संवर्धन मोठ्या
प्रमाणात केलं पाहिजे. वाहून जाणारं पाणी जागोजागी अडवलं पाहिजे. जमिनीत जिरवलं
पाहिजे. तेव्हाच पुढील पिढ्या पाणीदार जीवन जगू शकतील.
सामाजिक बांधिलकी पाळणार्या
सटाण्याच्या सर्व तटस्थ नागरिकांनी आता एक निर्णय घेतला. पाणी प्रश्न सुटला नाही
तर या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा असा हा निर्णय आहे. हे हत्यार खूप
प्रभावी ठरू शकतं. यात कोणतंही राजकारण नसून ही स्वयंस्फूर्त लोकचळवळ आहे. हे
हत्यार सर्वसामान्य लोकांना उपसावं लागावं हे दुर्दैव आहे. पण पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी
हा निर्णय नाईलाजाने नागरिकांना घ्यावा लागला. पाणी आंदोलन हे जन आंदोलन असेल. यात
कोणी नेता नसेल. अध्यक्ष नसेल. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही.
कोणाविरूध्दही नाही आणि कोणाच्या बाजूनेही नाही. हे आंदोलन फक्त पाणी टंचाईच्या
विरूध्द आहे आणि हक्काचं पाणी मिळण्याच्या बाजूने आहे. सटाण्यातील सर्व नागरिकांनी यात उत्फूर्तपणे
भाग घ्यायचा आहे. सर्वांनी आता
श्रमदान करुन आपली तहान भागवावी, त्याला इलाज नाही.
आधी
सांगितल्याप्रमाणे उदाहरणार्थ म्हणून इथं सटाण्याची समस्या मांडली असली तरी, सर्वदूर जिथं
जिथं अशी पाणी टंचाई आहे, त्या त्या गावा- शहरातील
नागरिकांनी अशा पध्दतीने श्रमदानातून पाणी अडवा- पाणी जिरवा ही लोक चळवळ उभी
करावी.
(या लेखाचा
इतरत्र वापर
करताना लेखकाच्या
नावासह ब्लॉगचा
संदर्भ द्यावा
ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा