सोमवार, १४ जानेवारी, २०१९

सर्कस (कथा)


- डॉ. सुधीर रा. देवरे

          त्या एवढ्या एवढ्याश्या पटांगणात एवढी मोठी सर्कस उभी राहील असं कोणालाही वाटलं नव्हतं. तरीही दोन्ही बाजूच्या रस्त्यांना लागून का होईना तिथं सर्कशीचा तंबू दिमाखात उभा दिसत होता. तिकिट काढून आत गेलं की सर्कशीची मांडणी पाहून ती जागा पाहिलेल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नव्हतं. कारण त्या जागेचा संपूर्ण कायापालट झालेला होता. सर्कशीच्या गोल अशा रिंगणाचं व्यासपीठ सोडून बाकीचा जमिनीचा चर खोदून मागे मागे भर टाकून खुर्च्या ठेवण्यासाठी नाट्यगृहासारखा उतार केलेला होता आणि तोही रिंगणाकार. त्या उतारावरच खुर्च्या ठेवून बसण्याची सोय केलेली होती. पुढच्या खुर्च्यांना दोनशे रूपये तिकीट होतं. त्याच्या मागच्या खुर्च्यांना एकशे पन्नास रूपये. त्यामागच्या शंभर रूपये आणि शेवटच्या उभ्या मांडणीसारख्या बाकड्यांना पन्नास रूपये तिकीट होतं. म्हणजे सर्कशीतही बर्गीय जाणिवांना सामोरं जावं लागतंच. जशी ऑफिसात, सिनेमागृहात आणि नाट्यगृहात वर्गीय जाणीव आपला पिछा सोडत नाही. (वर्गीय जाणीव नसलेला एक लोककलेतला प्रकार म्हणजे तंबूतला तमाशा आणि तसे सर्वच लोककलाप्रकार पहायला जमलेले लोक... सहज सुचलं.)
          या खेळाचा आताचा सर्कशीतला संपूर्ण तंबू अगदी गच्च भरून गेला होता. सर्कस सुरू होण्याच्या प्रतिक्षेतले प्रेक्षक-लोकविष्कार दिसत होते. समोर एकशेपन्नास रूपये तिकीट काढून बसलेलं जोडपं आणि त्यांचा एक मुलगा यांच्यासमोर आईस्क्रीम वाल्याने आईस्क्रीम धरलं. मुलाने घेतलं. बापाला वाटलं, एकशेपन्नास रूपयाच्या तिकिटातच आईस्क्रीम आहे म्हणून तो बायकोला म्हणाला, तू पण घे बायकोने घेतलं. बायको नवर्‍याला म्हणाली, तुम्ही पण घ्या. नवर्‍यानेही घेतलं. आइस्क्रीमवाला अजून हलत का नाही, म्हणून त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. आईस्क्रीमवाला इकडे तिकडे आईस्क्रीम देऊन पुन्हा त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला. बापाला वाटलं, रिकाम्या डिशेससाठी आला असेल. त्याने त्या गोळा करून त्याच्याकडे दिल्या. आईस्क्रीमवाल्याने त्या डिशेस घेतल्या आणि जवळच्या कचरा बॉक्समध्ये टाकून पुन्हा आईस्क्रीमवाला त्याच्यापुढे येऊन उभा राहिला. बापाने त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहिलं. आईस्क्रीमवाला म्हणाला, पैसे. बाप दचकला. त्याने इकडं तिकडं आणि मागंही पाहिलं. चार दोन लोक त्यांची सर्कस पहातच होते. तो म्हणाला, कितने? आईस्क्रीमवाला म्हणाला, नव्वद. एकशेपन्नास रूपयाच्या तिकीटवाल्या बापाने प्रतिष्ठेचा प्रश्न समजून त्याच्या हातात शंभर रूपयाची नोट ठेवली. आईस्क्रीमवाल्याने तेवढ्याच उलट्या बेफिकिरी अप्रतिष्ठेने त्याच्या हातात दहाची जुनी नोट कोंबली अणि तो दुसरीकडे निघून गेला. थोड्यावेळापूर्वीचा आदबशीरपणा त्याने दुसर्‍या गिर्‍हाइकासाठी राखून ठेवला असावा.
          दोनशे रूपयाच्या खुर्च्यांमध्ये दोनचारच जोडपी बसली होती. आणि ते अधून मधून कमी रूपयाचे तिकीट काढणार्‍यांकडे मागे वळून तुच्‍छतेनं बघून घेत होते. तसंच आपली दोनशे रूपयाची पोझिशन दाखवण्यासाठी ते अधून मधून रूबाबदारपणे हालचाल करण्याची धडपड करीत होते. उदाहरणार्थ, एकाची बायको रूमालाची बारीक घडी गालांवरून ओठांवरून काहीतरी टिपून घेण्याचा बहाणा करत होती आणि आख्या सर्कशीचे लक्ष आपल्याकडंच आहे असा तिनं समज करून घेतला होता. तो एक सुटाबुटातला इन केलेला माणूस सारखा आपले बूट झटकतोय, घड्याळ पहातो आणि त्याने थम्सअपची खूण करून पेय मागवून घेतलं होतं. त्यांच्याकडे माईकची सोय असती तर ती ऑर्डर त्याने थेट माईकवरून दिली असती असा त्याचा चेहरा दिमाखदार होता. त्या मोठ्या तिकिटाच्या असल्या तरी स्वस्त बनावटीच्या सर्कशी खुर्च्या त्याच्या शरीराला रूतत असल्याचं ते अप्रत्यक्षपणे सुचवू पहात होते.
          बिचारे पन्नास रूपये तिकीटवाले भांडे ठेवण्याच्या मांडणीसारख्या तिरप्या बाकड्यांवरचे लोक कोणी कारकून, कोणी शिपाई, कोणी कामगार, कोणी मजूर, कोणी बेरोजगार आणि तीन तीन- चार चार मुलांवाले आईबाप होते. एकमेकांना खेटून ते घट्टपणे बसले होते. खुर्च्यावाल्यांसारखे त्यांना एकमेकांशी अंतर राखता येत नव्हतं. आधी अंतर राखून बसलेले बाकड्यावरचे लोक नंतर नंतर एकमेकांना खेटू लागले. लोक जसजसे तिकिटे काढून आत येऊ लागले आणि त्यांना बसायला जागा कमी पडू लागली असं सर्कशीतल्या कामगारांच्या लक्षात आलं आणि त्यांनी गर्दीत बाकड्यांवर चढून जास्त जागा अडवून बसलेल्या लोकांना अजून एकमेकांजवळ सरकायला भाग पाडून बाकिच्या लोकांना बसायला जागा करून दिल्या. तरीही पन्नास रूपयांचे तिकीटवाले बाकड्यांवर आता मावत नाहीत असं लक्षात येताच त्या लोकांनी शंभर रूपयाच्या खुर्च्यासमोर असलेल्या छोट्या छोट्या मोकळ्या जमिनीवर त्या लोकांना बसायला सांगितलं. सर्कस पहायला आलेले लोकही आज्ञाधारकपणे जागा मिळेल तिथं बसू लागली.
          बाकड्यांवरील लोकांच्या मनात खूप असूनही त्यांना गर्व करता येत नव्हता. ते साळसुदपणे बसून वेफर्स, बिस्कि‍टं, चिवडा, लाह्या असे पदार्थ आपलं प्रमुख अन्न समजून सेवन करत होते. सर्कशीत यावेळी सर्वत्र नीट लक्ष दिलं तर संपूर्ण सर्कस एक भव्य हॉटेल झाल्याचं लक्षात येत होतं. कोणी काय खात होतं तर कोणी काय! या भव्य तंबूत सार्वजनिकरित्या काहीतरी खाण्यासाठीच लोकांनी तिकिटं काढली आहेत की काय असा संभ्रम निर्माण व्हावा, एवढ्या अधाशीपणे सगळे लोक खात होते. अथवा इथं खाल्लं नाही तर बाहेर जाऊन कसं खाता येईल, अशी धास्ती या लोकांना वाटत होती की काय!
          आता तुम्ही म्हणाल, सर्कशीतल्या प्रयोगांविषयी तुम्ही काहीच कसं बोलत नाही अजून? गोष्ट अगदी साधी आहे की, ही सर्कस तुम्ही पाहतच आहात. अथवा कधीकाळी सर्कस तुम्ही पाहिलेलीच आहे. अथवा तुम्ही सर्कशीच्या तंबुतच तर आहात! आपण इथं शरीरांच्या कसरती पहात आहोत. पण आपल्या मनाच्या कसरती यापेक्षा भयानक असतात आयुष्यभर! तरीही सर्कशीचं वर्णन करायचंच झालं तर कसं करता येईल? अथवा सर्कशीची व्याख्या कशी करता येईल? कोणत्याही लहान मोठ्या सर्कशीचं संपृक्‍त वर्णन एकाच वाक्यात करायचं झालं तर असं करता येईल: मानवांकडून पाशवी आणि पशूंकडून मानवी कसरत करून घेणारी यंत्रणा म्हणजे सर्कस!
          हे पटत नसेल तर अरूण कोलटकरचं तरी ऐका:
या जळत्या वर्तुळातून उडी मारून जा
आरपार
इकडून तिकडे
ही शून्याकार आग, ही जळती मोकळीक
रोजचीच आहे
ही सर्वस्वी सर्कस तुझीच आहे
          सर्कशीचा हा खेळ सुटल्यावर घरी परतताना भेटलेल्या पहिल्या व्यक्‍तीनेच काय विचारावं, कितीचं तिकीट काढलं होतं? आणि लगेच पुढचा प्रश्नही विचारला, खाऊ काय काय घेतला होता?
     (आताच प्रकाशित झालेल्या माणसं मरायची रांग या कथासंग्रहातील कथा. कथेचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा