- डॉ. सुधीर रा. देवरे
संध्याकाळी बाहेर ओट्यावर उभा होतो. घराच्या
आजूबाजूला मी खूप झाडी लावून ठेवल्यामुळे संध्याकाळी बाहेर डास असतात. हे डास- मच्छर
संध्याकाळी जास्त प्रमाणात दिसून येतात. दारं खिडक्या उघड्या दिसल्या की ते घरात
प्रवेश करतात आणि रात्रभर आपल्याला डंख मारत राहतात. बाहेर ओट्यावर येताच डास घरात
येऊ नयेत म्हणून मी बाहेरून घराचं दार घट्टपणे लावून घेतलं. आत डास जाण्यासाठी
थोडीही फट राहू नये अशी काळजी घेत मी बाहेरून दाराची कडी लावली. आणि अचानक मला बालपण
आठवलं. गावात लहानपणी संध्याकाळी माझ्याकडून चुकून दार लावलं गेलं तर आई म्हणायची,
‘लक्षमी येवानी येळ जयी, दार कसाले लावस रे भाऊ?
उघडं ठेव.’ मला हा उद्गार आत्ताच ऐकू आल्यासारखा मी
चपापलो. आपण शहरात आल्यापासून लक्ष्मी यायची वेळ, दिवाबत्तीची वेळ विसरून गेलो
आहोत. बटन दाबलं की विजेचा भसकन पांढराशुभ्र उजेड घरभर पसरतो. घरात डास येऊ नयेत म्हणून दिवसभर
दार उघडं असलं तरी संध्याकाळी आपण न चुकता दार व्यवस्थित बंद करतो.
संध्याकाळ
झाली आणि कोणी आपल्या घराचं दार लावायला लागलं की लहानपणी वडीलधारी मंडळी
पोरासोरांवर खेकचायची, ‘राहू देत नी रे कवाड उघडं. आता लक्षमी
येवानी येळ जयी आनि तू कवाड आघे करी र्हायना. सांज जई का दार लाऊ नही भाऊ.’
सायंकाळी
घरात लक्ष्मी येते. गावातल्या प्रत्येक घरात लक्ष्मी येते. लक्ष्मी म्हणजे धन,
दौलत, बरकत वगैरे हे ही वडीलधार्यांकडूनच समजलेलं. घरात हे सर्व सुख येण्यासाठी
घराची दारं संध्याकाळी उघडी असली पाहिजेत. शेतकाम व अन्य कामासाठी ग्रामीण लोकांना
दिवसभर घराबाहेर रहावं लागत असल्यानं घराचं दार दिवसभर बंद ठेवलं तरी चालतं. फक्त
संध्याकाळी लावू नये. दिवाबत्तीच्या वेळी घराची दारं उघडी ठेवावीत. हो, दिवाबत्तीच्या
वेळी. खेडोपाडी आधी विजेचे दिवे नव्हते. कंदील आणि चिमणी नावाचे लहान दिवे असत.
त्यांच्या काचा रोज संध्याकाळी चुलीतल्या राखेने घासून एखाद्या फडक्याने स्वच्छ
पुसली जात आणि मग चिपडं पडताच, म्हणजे दिवस जाताच घरोघरी हे दिवे लावले जात. अशा
संध्याकाळच्या वेळेला ‘दिवाबत्तीची वेळ’ झाली असं म्हणत. या वेळी घराची दारं उघडी
असायला हवीत, अशी अलिखित पुर्वपरंपरेने चालत आलेली आचार संहिता होती. गावात ज्या
ज्या घरात माणसं वास्तव्याला असायची (काही लोक मळ्यात रहात म्हणून त्यांच्या घराला
कायम कुलूप असायचं.) त्या त्या घराची दारं संध्याकाळी उघडी ठेवली जात. कारण ही वेळ
लक्ष्मी यायची वेळ असायची.
विचार करताना अशा लक्ष्मी येण्याच्या
समजूतीमागे काही शास्त्रीय आधार असावा का, मनात शंका आली. आणि विचारांना योग्य दिशा
मिळताच लख्खपणे जाणवलं, असलाच पाहिजे. हा शास्त्रीय आधार कोणता असावा हे
शोधण्यातही खूप वेळ गेला नाही. लक्ष्मी म्हणजे काय असू शकतं, हे तर्काने ठरवता
आलं. म्हणूनच या समजुतीला शास्त्रीय आधार असल्याचं लक्षात आलं.
: माझ्या
घराभोवती मी इतकी दाटीवाटीने झाडी लावून ठेवलीत. ही सर्व झाडं आता रात्री
प्राणवायू घेणं सुरू करतील आणि कार्बन डॉय ऑक्साइड सोडतील. संध्याकाळ पासून सकाळ
होईपर्यंत हे सुरू राहील. म्हणजे झाडं रात्री माणसासारखाच प्राणवायूचा श्वास घेऊन
कार्बन बाहेर सोडणार. मग आपण संध्याकाळी दारं- खिडक्या उघडी ठेऊन झाडांकडून
मिळणारा संध्याकाळपर्यंतचा प्राणवायू घरात साठवून ठेवायला नको का? हा बाहेरचा
प्राणवायू घरात भरून ठेवायला हवा. म्हणजे रात्रभर आपल्याला प्राणवायू पुरेल. कमी
पडणार नाही. संध्याकाळी आपण लवकर दारं खिडक्या बंद करून ठेवल्या तर घरातला
प्राणवायू सकाळपर्यंत आपल्याला कमी पडू शकतो. घरातल्या हवेत कार्बन डॉय ऑक्साइडचं
प्रमाण वाढेल. म्हणून अंधार पडेपर्यंत आपण संध्याकाळी घराची दारं उघडी ठेवलीत तर
आपल्याला रात्रभर पुरेल इतका प्राणवायू घरात साठवला जाऊ शकतो. पूर्वी ग्रामीण
घरांना खिडक्या क्वचितच दिसायच्या. कुठे एखाद्या घराला खिडक्या दिसल्या तरी त्या
शास्त्रशुध्द पध्दतीने समोरासमोर नसायच्या. ग्रामीण घरात पुढच्या दाराला लागूनच
थोड्या अंतरावर एक खिडकी असायची. बहुतेक ग्रामीण घरे एक दारी असायची. काहींना
मागचं दार आणि पुढचं दार अशी दोन दारं असली तरी आजूबाजूला खिडकी नसायची. कारण
घराच्या दोन्ही बाजूंना लागून घरे असत. अशा घरात रात्रीच नव्हे तर दिवसाही हवा
खेळती राहत नसे. म्हणून संध्याकाळी बाहेरची हवा घरात घेणं आवश्यक होतं. (कंदील-
चिमणी ह्या दिव्यांना ज्वलनासाठीही प्राणवायू लागतो. म्हणजे आतापेक्षा पेटवलेल्या
दिव्यांच्या काळात गावातल्या घरात रात्री प्राणवायू जास्त लागायचा.) आपल्याला
जिवंत ठेवणारा प्राणवायू, म्हणजेच लक्ष्मी असं तर म्हणायचं नसेल आपल्या पुर्वजांना?
लहानपणी
आमच्या गावात भरपूर झाडी होती. प्रत्येक खेड्यात भरपूर झाडी असायची. म्हणून अशा
प्राणवायू साठवणुकीसाठीच लोक संध्याकाळी घराची दारं उघडी ठेवत असतील. आणि याचं
शास्त्रीय भान आकलनापलीकडे असल्यामुळे प्राणवायू भरण प्रक्रियेला ‘लक्ष्मी’
नाव ठेवलं गेलं असावं का? ही तार्कीक कल्पना असली तरी या कार्यकारण भावात तथ्य
दिसून येतं. पुरेशा प्राणवायूमुळे रात्रभर घरात नेगेटीव्ह एनर्जी निर्माण होत
नाही. अजून काय हवं. हीच तर लक्ष्मी. (आणि अशी लक्ष्मी घरात खेळती राहण्यासाठी
घराच्या आजूबाजूला जितकी झाडं लावणं शक्य असेल तितकी लावली पाहिजेत.) पैसा, अडका, बरकत, दौलत नावाची लक्ष्मी तर आपण कष्ट करून
कमवतच असतो रोज.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
–
डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot. in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा