-
डॉ. सुधीर रा. देवरे
पूर्वी
गावात आड असत. घरोघरी नसले तरी प्रत्येक पंधरा वीस घरांमागे एक आड असायचाच.
घराच्या मागच्या दारी आड खोदला जायचा. जमिनीत चाळीस पन्नास हात खोल जाताच आडाला
पाणी लागायचं. आडाची रूंदी चार बाय चार हात अथवा तीन बाय तीन हात असायची. या
रूंदीला कडं म्हटलं जायचं. ‘आडनं कितीनं कडं घिदं?’ उत्तर यायचं ‘चार हात’. ‘हेरनं (विहिरीचं) कितीनं कडं घीदं?’ उत्तर यायचं ‘बारानं कडं’. (म्हणजे बारा बाय बारा हात).
आड
धसू नये म्हणून तो बांधून घेतला जायचा. दगड आणि चुना यात तो खालून वरपर्यंत गोल
आकाराने बांधावा लागायचा. आडाच्या वर लाकडी रहाट बसवलं जायचं. त्यासाठी सुताराकडून
आडाच्या काठावर दोन तिरपे खांब उभे केले जायचे. खांबांच्या वरच्या टोकाला छिद्रे
पाडून त्या छिद्र्यांतून आडवा लोखंडी आस टाकत त्या आसात रहाट ओवलं जायचं. आडात
एखादा प्राणी वा लहान मूल पडू नये म्हणून आडाच्या तोंडावर चौकट टाकून लावण्या- उघडण्याच्या
फळ्या बसवल्या जायच्या.
रहाटाला
आवते म्हणजे दोर बांधून दोराच्या दुसर्या टोकाला बादली बांधली जायची. ती बादली
रहाटावरून आडात सोडली जायची. बादली पाण्यात बुडली की रहाटावरच्या आवत्याने ती
ओढायची. दोन हातांनी रहाट ओढायला रहाटाला चार
मुठ्या असत. त्या मुठ्या धरून रहाट ओढत रहायचं. म्हणजे आपण ओढत असलेलं रहाट
आसाभोवती गोल फिरायचं. आवते रहाटाला गुंडाळलं जात पाण्याने भरलेली बादली वर यायची.
बादली वर येताच एका हाताने रहाट स्थिर पकडून दुसर्या हाताने बादलीच्या कडीला धरून
बादली आपल्याकडे खेचायची. ती बादली हंड्यात ओतायची. अशा पध्दतीने तीन चार
बादल्यांनी हंडा भरला की तो उचलून घरात आणून पिण्याच्या पाण्याचा रांजण- माठ
भरायचा.
रहाटाने
दोन जणींनाही पाणी खेचता येतं. शक्यतो पाणी भरण्याचं काम महिलांकडेच असायचं. दोन
जणी पाण्याची बादली रहाटाने ओढू लागल्या की ओढणं जरा हलकं जातं आणि न थकता पाणी
भरता येतं. आडाचं पाणी पिण्यासाठी गावात वापरलं जायचं. धुणं धुण्यासाठी गावातल्या
महिला नदीवर जायच्या. खोल पण आकाराने हे छोटे छोटे आड खाजगी एखाद्याच्या
मालकीचे असायचे. तरीही आजूबाजूचे दहा पंधरा घरं या आडावर हक्काने पाणी भरायला
यायची. आडाचा मालक सुध्दा आपण पाणी भरणार्यांवर उपकार करतो असा आव कधी आणायचा
नाही. उलट आडातून पाण्याचा जेवढा जास्त उपसा होईल, तितकी
पाण्याला चांगली चव येते असा त्यांचा समज होता. पाणी भरणार्या शेजारील बायाही
आडाच्या मालकिनीच्या (आपल्याला पाणी भरू देते म्हणून) चावलेल्या दाबलेल्या नसायच्या.
काही
आड उन्हाळ्यात आटायचे. तेव्हा आड कोरावा लागायचा. गावात एक दोन जण आड कोरणारे, आड खोदणारे असायचेच. ते आडात उतरून आडात साचलेला गाळ काढायचे. एक दोन हात
खाली खोदायचे. आणि तो गाळ – चिखल पाण्याच्या बादलीतूनच दुसरा माणूस वर ओढायचा. आड
खोदणारा आडाचे आजूबाजूचे झिळ- पाझर मोकळे करायचा. त्यात अडकलेली घाण- गाळ काढून
स्वच्छ करायचा. त्यानंतर पुन्हा आडात पाणी उतरायचं आणि आडातून बादली भरून पाणी
येऊ लागायचं.
आवते
तुटून काही वेळा बादली पाण्यात पडायची. अशी बादली आडातून काढण्यासाठी विशिष्ट गळ
असायचा. त्या गळाला आवते बांधून गळ पाण्यातून आडाच्या बुडापर्यंत सोडला जायचा. गळ
वरून आवत्याने खंगाळला जायचा. गळात बादली अडकली असेल तर ती गळातून निसटू नये
म्हणून आवते हळूहळू वर खेचावं लागायचं. पाण्यातून गळ बाहेर येताच त्याला बादली
अडकली आहे की नाही ते आडात डोकावून पहावं लागायचं. गळाच्या वजनावरूनही ते लक्षात यायचं.
नाही आली तर हा प्रयत्न पुन्हा पुन्हा करावा लागायचा. बादली पाण्यात पालथी पडलेली
असली तर ती गळात अडकायची नाही. अशा वेळी आड खोदणारा माणूस आडात उतरून बादली काढून
आणायचा.
पडलेली
बादली आडातून काढण्याचा गळ प्रत्येक घरी नसायचा. गावात दोन चार जणांकडे असे. मग त्या
घरी गळ मागायला गेलं की आपला गळ, नेणार्याने आठवणीने परत आणून
द्यावा म्हणून गळ मालक गळाच्या बदल्यात तोपर्यंत एखादं भांडं ठेऊन जायला सांगायचा.
बाया गळाच्या बदल्यात पितळाचा तांब्या अथवा बोघणं ठेऊन येत. गळ परत करायचा आणि
आपला तांब्या वा बोघणं परत आणायचं, अशी गावात पध्दत होती.
गावात
काही सार्वजनिक आडही असत. या आडांचे कडे मोठे असायचे म्हणून मळ्यातली विहीर आणि हे
आड सारखेच दिसायचे. बारा बाय बारा अथवा सोळा बाय सोळा हाताचे कडे या आडांना असायचे.
हे आड ग्रामपंचायतीने बांधलेले असल्याने लोक या आडांना ‘सरकारी आड’ म्हणायचे.
आता
गावात आड दिसत नाहीत. होते ते आड बुजले गेले. म्हणजे आपापले आड लोकांनी स्वत:हून
मातीने बुजून टाकले. आज इतके कष्ट करून पाणी प्यायला कोणाला सवड नाही. आता
गावागावात वॉटर सप्लाय आलं, जरी ते वेळेवर वॉटर सप्लाय करत नाही. कुठं कुठं आता हात पंपही
पहायला मिळतात. ते उपसून पाणी वर येईलच याचीही शाश्वती राहिली नाही.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा