रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

बाजार – बजारना याळ




-    डॉ. सुधीर रा. देवरे

     ग्रामीण भागात आठवडी बाजार भरतो. मात्र प्रत्येक गावात बाजार भरत नाही. आजूबाजूच्या दहा पंधरा खेड्यांच्या मध्यभागी असलेल्या थोड्या मोठ्या खेड्यात बाजार भरत असतो. आजूबाजूच्या गावांचे हे बाजार भरणारं गाव केंद्रच समजलं जातं.
     बाजाराभोवती देण्याघेण्याचे अनेक व्यवहार होत आले आहेत. ‍विशिष्ट बाजाराच्या गटातल्या गावांत मजूर लोकांची मजूरी प्रत्येक आठ दिवसांनी बाजाराच्या दिवशी चुकती करायची असते. बाजाराच्या दिवशी शेतमजूर दुपारपर्यंत एक पारग शेतात काम करतात. बाजारासाठी दुपारून सुट्टी घेतात. (अन्य खाजगी मजूरही बाजारदिवशी दुपारून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतात.) आपली आठ दिवसाची मजूरी शेतकर्‍यांकडून घेऊन ते बाजारात येऊन पुढील आठ दिवस पुरेल असा सगळ्या जिनसांचा बाजार करून ठेवतात.
     शेतकरी आपला विशिष्ट भाजीपाला, अन्न धान्य,ळे विकण्यासाठी बाजारात आणतो. व्यापारीही आपली दुकाने बाजारात लावतात. म्हणून आठवडी बाजारात सगळ्या जिनसा एकाच जागी उपलब्ध होतात. शेतकरी आपला भाजीपाला बाजारात उघड्यावर बसून विकतात तर व्यापारी तात्पुरता तंबू उभारून दुकान लावून माल विकतात. आजूबाजूच्या खेड्यापाड्यांवरचे लोक बाजाराला येतात. व्यवहारात बाजाराच्या दिवशीचा वादा होत असल्याने या दिवशी खेड्यापाड्यावरचे लोक बाजाराच्या आजूबाजूला बसून आपले एकमेकांचे देण्याघेण्याचे हिशोब चुकते करतात.
     बाजारात विविध प्रकारचा भाजीपाला, फळे, अन्नधान्य, मासे, खेकडी, बोंबील, सोडे, झिंगे, अंडे, भेळभत्ता, मिठाई, खाऊ, मसाल्याचे पदार्थ, विविध भांडी, डालके, कढया, शिराया, झाडू, बांगड्या, नकली दागिने, कपडे असे सगळे काही एकाच जागी विकायला आलेले असते. दोन जवळच्या गावातल्या लोकांना भेटायचा हा दिवस असतो. रोजच्या कामधंद्यात अडकल्यामुळे जवळच्या गावी खास वेळ काढून जाऊन एखादी बोलणी करता येत नाही. म्हणून बाजाराच्या निमित्ताने असे नातेसंबंध जोडण्याचं कामही बाजाराच्या आसपास बसून होत असतं. बाजारात विविध विक्रेत्यांच्या रांगा मिळून अनेक तात्पुरत्या गल्ल्या तयार होऊन लोक दाटीवाटीने आपला माल विकत असतात. या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून हातात कापडी पिशव्या घेऊन लोक आपापल्या गरजेनुसार जिनसा विकत घेतात. यात शेतमजूर, अन्य मजूर, शेतकरी, व्यापारी, कर्मचारी, कारू नारू, अन्य व्यावसायिक लोक आपापल्या गरजेच्या वस्तू खरेदी करायचे- करतात. आपला माल विकून आलेल्या पैशातूनही आपल्याला लागणार्‍या अन्य जिनसा लोक विकत घेतात. या सर्व व्यवहारात देण्याघेण्याच्या किमतीविषयी घासाघीस होत असते. कोणत्याच मालाची किंमत ही दुकानातल्या वस्तुवरच्या छापलेल्या किमतीसारखी पक्की नसते. बाजारातल्या मालाच्या किमती लवचिक असतात.
     ग्रामीण बाजार हे केवळ साप्ताहिक व्यवहाराचं केंद्र नसून आजही एक सांस्कृतिक वैभव आहे. काही ठिकाणी बाजाराला हाट म्हणतात. आठ दिवसांनी भरतो तो हाट. काही ठिकाणी बाजार-हाट असे दोन्ही शब्द बाजारासाठी वापरतात. ग्रामीण बाजार हे सर्व वर्गीय लोक एकमेकांत मिसळण्याचं केंद्र आहे. बाजारात व्यक्‍तीगत दु:ख परिहार होतो. म्हणून ज्या स्त्रियांना दु:ख झालेलं असायचं (म्हणजे घरातलं कोणी वारल्यावर दहाव्या दिवसानंतर) त्यांना बाजाराच्या दिवशी बाजार फिरवण्याची पूर्वी पध्दत होती. बाया बजार भवडाले गयात’, बजार भवडाले घी जानं शे असे खास शब्दसमूह म्हणजे वाक्प्रचारच यासाठी वापरले जात होते. अशा दु:खीत महिलांना घेऊन बाजार फिरवून आणला की बाहेरची जगरहाटी पाहून आपलं दु:ख हलकं होईल अशी यामागे समजूत होती. खूप पूर्वीपासून ग्रामीण भागात बाजार भरत आला. त्याचं स्वरूप आता थोडं बदललं असलं तरी आतून बाजाराचा गाभा आणि उद्देश तोच आहे.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा