- डॉ.
सुधीर रा. देवरे
‘भारतीय विवाहसंस्थेचा
इतिहास’ हे पुस्तक वाचल्याने
कोणाचाही तथाकथित वंशाभिमान समूळ डळमळल्याशिवाय राहणार नाही. या
विषयावरची इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांची टिपणे 1923 साली पुण्याच्या ‘चित्रमयजगत’ नियतकालिकात छापली
गेली. टिपणांच्या आधाराने त्यांचे या विषयावरील विस्तृत निबंध ‘संशोधन’ मासिकात 1925 साली
छापायला सुरूवात झाली. पुढे एका पुस्तकाच्या संदर्भान्वये कॉ. एस. ए. डांगे यांनी
सुचवल्यामुळे हे पुस्तक 31 डिसेंबर 1976 ला डांगे यांच्या दीर्घ, विस्तृत, चिंतनशील आणि विवेचक
प्रस्तावनेसह पुण्याच्या प्रागतिक पुस्तक प्रकाशनाने (नंतर लोकवाड्.मय गृहाने)
प्रकाशित केले. मात्र हा ग्रंथ परिपूर्ण नाही आणि अपूर्णही नाही. राजवाडे यांनी या
विषयावर लिहिलेले अजून काही मौलिक निबंध होते, परंतु ते उपलब्ध न
झाल्याने या पुस्तकात समाविष्ट होऊ शकले नाहीत. आणि पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते
अजूनही सापडले नाहीत.
निबंध
लिहिण्यासाठी राजवाडे यांनी काढलेली प्राथमिक टिपणे, स्त्री- पुरूष समागम
संबंधातील कित्येक अतिप्राचीन चाली, स्त्रियांचे वंशप्रवर्तकत्व व
प्रजापतिसंस्था,
आतिथ्याची एक आर्ष चाल,
अग्नि व यज्ञ,
लग्नसंस्था : एक टिपण,
विकार- विचार प्रदर्शनाच्या साधनांची उत्कांती आदी विषयांच्या निबंधात वैचारिक
मंथन करून साधार असे योग्य ते निष्कर्ष वाचकांसमोर ठेवले आहेत. राजवाड्यांनी
इतरत्रही इतिहासशास्त्र,
भाषाशास्त्र,
साहित्यशास्त्र, समाजशास्त्र
आदीत अष्टपैलू क्रांतीकारी संशोधन केले आहे.
आर्ष कालीन शरीर- संबंधांची मांडणी वेदसंहिता
व महाभारतातील पुराव्यांवर आधारलेली आहे. अनिर्बंध शरीर संबंधांची कालांतराने पुढे
प्रगती होत त्याची परिणती विवाह संस्थेत झाली, हा या ग्रंथाचा
मुख्य विषय आहे. वर्ण आणि जाती- संस्था आर्यांनी का, कशा आणि कधी निर्माण
केल्या असाव्यात याचे चिंतनही ग्रंथात येते, ते मुळातून वाचले पाहिजे.
श्वेतकेतूने
परपुरूषसंग निषिध्द ठरवत परस्त्रीसंग त्याग करावा असा उठाव केला होता.
यावरून विवाहमर्यादा ही प्राचीन प्रथा नाही, ती एक कृत्रिम आणि
अलीकडील समाजमान्य व्यवस्था असल्याचे राजवाडे यांनी साधार दाखवून देण्याचे धाडस
विसाव्या शतकाच्या सुरूवातीला केले. म्हणून भारतीय
विवाह संस्थेचा स्थापक हा श्वेतकेतू ठरतो. यावरून तात्कालिक समाजाच्या जीवन-
जाणिवा आजच्या काळातील जीवन जाणिवांपेक्षा पूर्णपणे विरूध्द होत्या हे अधोरेखित
होते. आजच्या काळात कोणी एका स्त्रीने वा पुरूषाने असे वागणे म्हणजे शुध्द
व्यभिचार ठरेल.
सरमिसळ समागम, अतिथीला
स्वस्त्रीसमर्पण,
पशूसमागम, गुरूपत्नीगमन, बहुपतित्व, अल्पकालीन वा अटींचे
विवाह अतिप्राचीन काळात होते. दासी वा स्त्री इतरांना भेट दिली जायची. यज्ञाच्या
आजूबाजूला बसून उघड्यावर यभनक्रिया केली जात होती. यज्न् हे वाक्य होते. त्याचा
अर्थ ते जमतात व यभनक्रिया करतात, असा होतो. कालांतराने यज्ञ हे नाम झाले
आणि त्याचा अर्थ बदलला. पवित्र झाला.
राजवाड्यांनी
धार्मिक ग्रंथातील पुराव्यांसह लिहिलेल्या या संशोधनातील अवतरणे आज एकविसाव्या
शतकात सुध्दा जसेच्या तसे उदृत करायची हिम्मत होत नाही. राजवाड्यांनी 1923 च्या
आसपास हे सर्व निर्भिडपणे कसे मांडले असेल याचे आश्चर्य वाटते. या पुस्तकातले
पहिले प्रकरण ‘चित्रमयजगत’ मध्ये प्रकाशित
होताच वाचकांत भयंकर वादळ उठले. पुढचे भाग छापाल तर छापखाना जाळून टाकू, अशी संपादकाला धमकी
मिळाली होती.
वेद आणि महाभारतातील संदर्भ देताना राजवाडे
अरब, पर्शियन, टाहीटियन असे जागतिक
संदर्भही सहज सांगून जातात. ग्रीक, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॉलिनेशिया, मोंगोलिया, युरोप आणि इतर
बहुतेक सर्व देशांत- खंडात परपुरूषाला आपली स्त्री अर्पण करण्याची प्रथा होती.
म्हणजे थोड्याफार फरकाने ही परिस्थिती जगात सर्वत्र होती आणि या संबंधांविरूध्दचे
उत्थापन पायरी पायरीने होऊन आज जगात विवाह संस्था स्थिर झाली, असा निष्कर्ष निघतो.
म्हणून हे पुस्तक जागतिक विवाह संस्थेचा इतिहास ठरतो.
आर्षसमाजात
(अतिप्राचीन काली) आई,
भाऊ, बहिण, बाप, मुलगी, पुतणी, मावशी, चुलता, चुलती, मामा, मामी, आत्या, चुलत बहिण
इत्यादी बहुविध नाती नव्हती. मात्र आईसाठी जनि ही संज्ञा अस्तित्वात होती. जनि
म्हणजे जन्म देणारी. प्राचीनकाळी अपत्यांची आई निश्चित असे. म्हणूनच मुलगा आईच्या
नावावरून ओळखला जायचा. बापाच्या नव्हे. उदा. राधेय: कौंतेय:, कार्तिकेय:, दानव:, कालेया: आदी.
शरीर संबंधात जसजशी उत्तरोत्तर समज येत गेली असावी तेव्हा विवाह होऊ लागल्यानंतर
बाकीची नाती पायरीपायरीने निर्माण झाली असावीत.
याच
काळात स्त्रियांवर पुरूषांची सत्ता पक्की झाली. स्त्रियांचे स्वातंत्र्य
टप्याटप्याने हिरावून घेतले गेले. अनेक स्त्रिया कोणाच्या तरी मालकीच्या असत. पुढे
महिला पुरूषांच्या गुलाम झाल्या. विवाहाने प्राप्त झालेल्या तर काही गुलाम- दासी
म्हणून पुरूषाच्या सानिध्यात राहू लागल्या असाव्यात. स्त्रियांपासून होणार्या
अपत्यांतही वर्गवारी होऊ लागली. योनिज प्रजा आणि अयोनिज प्रजा असे ते वर्गीकरण
होते. योनि म्हणजे गृह. योनिज म्हणजे घरात जन्मलेले मूल व अयोनिज म्हणजे घरात न
जन्मलेले, घराबाहेर जन्मलेले
वा यज्ञमंडपात जन्मलेले मूल. यज्ञात ऋत्विजांकडून प्रजोत्पादन झालेली मुले म्हणजे
अयोनिज प्रजा. पुढे आपल्या शारीर आनंदासाठी नियोग, घटकंचुकी अशा गोष्टी
चतुर पुरूषांनी शोधून काढल्या असाव्यात.
कोणाची पर्वा न करता- भीडमुर्वत न ठेवता
राजवाडेंनी वस्तुनिष्ठ सत्य आपल्यापुढे साधार मांडले आहे. आज हा ग्रंथ
मानववंशशास्त्रीय,
समाजशास्त्रीय आणि मानवी- लोकसंस्कृतीचा दस्ताऐवज ठरला असून याला पारंपरिक स्त्री-
पुरूष संबंधाची गीताही म्हणता येईल.
राजवाडेंचे
भाषात्पत्तीच्या सदंर्भातले विस्तृत टिपणही या पुस्तकात समाविष्ट झाले आहे.
ध्वनींच्या अनुकरणातून भाषात्पत्ती झाली. माणूस त्या त्या प्राण्याला त्याच्या
विशिष्ट आवाजावरून नाव देऊ लागला. जसे की, कावकाव करणार्या पाखराला काक नाव
दिले. भृंग आवाज करणार्या किटकाला भृंग नाव दिले. बर्याच प्राणीनामांचा
शब्दानुकरण जन्म आहेत. ‘विशिष्ट
ध्वन्यादी आघातांवरून वस्तूंना नामे देण्याचा शोध माणसाला लाखो वर्षांपूर्वीच
लागलेला आहे.’
(पृ. 96)
‘पदार्थदर्शक शेकडो
ध्वनींचा साठा मनुष्याजवळ साचतो. मनुष्याचा हाच पहिला शब्दकोश. सजीव पदार्थदर्शक
ध्वनीबरोबरच धडपडणे,
घोरणे, हुंगणे, फरफटणे, कुरकुरणे, थापणे, थापटणे इत्यादी
ध्वनींना तो नामाथू लागतो.’ (पृ. 96)
‘माणसाला भाषेतल्या
नाम आणि क्रिया ह्यांच्या दर्शक ध्वनींचा शोध लागतो. येथेच परिपूर्ण भाषा निर्माण
झाली. (पृ. 96)
‘भाषा म्हणजे मुखातून
निघू शकणार्या शब्दांनी क्रियांचे व पदार्थांचे आविष्करण करण्याची कला.’ (पृ.96)
ही
राजवाडे यांची भाषेसंदर्भातली मौलिक अवतरणे जशीच्यातशी मुद्दाम दिली आहेत. त्यावर
वेगळे भाष्य करायची आवश्यकता वाटत नाही. भाषेसोबतच भ्रांत कला, वास्तव कला, देव कल्पना, लोकभ्रम, रेखन, हावभाव, अभिनय, भांडी, नृत्य, गान, चित्रण, काव्य, नाटक, स्थापत्य, वाद्य यांचेही
चिंतन राजवाडे मुळातून करतात.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा