- डॉ. सुधीर रा. देवरे
बाजरी,
गहू, हरभरा, ऊस, कामोड्या (कापूस), मका, दादर, कांदे आणि काही प्रमाणात भाजीपाला अशी आमची उत्तर
महाराष्ट्र वासियांची पारंपरिक शेतातली पिकं होती. जळगाव भागात केळी, नाशिकच्या
जवळपास (निफाड, पिंपळगाव बसवंत आदी भागात) द्राक्ष, अशीही
त्यातल्यात्यात विभागणी असायची. आमच्या गावात शेताच्या कडेला उभं राहिलं की नजर
जाईल तिकडे एकच एक पिक दिसे. खरिपात बाजरी आणि रब्बीत गहू. गावकर्यांनी केलेली
सामुहीक शेती म्हणजे पाट थळ आणि ज्याची त्याची खाजगी शेती अशा पिकांनी बहरलेली
दिसायची. या पिकांना सेंद्रिय खते (लेंडी खत, मेंढी खत, शेण खत, गाळ खत, पुंजं खत, सोन खत, राख आदी) दिली जायची. आणि फवारेही सेंद्रिय मारले
जात.
पण अलीकडे
रासायनिक खते आणि फवारे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. काळाच्या ओघात इथला शेतकरी
केव्हा व्यावसायिक- कमर्शियल झाला हे त्यालाही कळलं नाही, इतक्या सहज पध्दतीने तो
व्यापारी पिकांकडे वळला. मध्यतंरी तीस- पस्तीस वर्षांपूवीँच्या आसपासच्या काळात इथल्या
शेतकर्याने (द्राक्ष पिकवणार्या भागाव्यतिरिक्त) द्राक्षांची लागवड सुरू केली. हळू
हळू द्राक्षांसोबत आता तो डाळींब पिकांकडे वळला. आणि अधूनमधून भरपूर पैसे कमवू
लागला, असं कोणाला वाटत असलं तरी ही पिकेही बेभरवश्याची आहेत
हे त्याच्या लक्षात येऊ लागलं. तेल्या या रोगापासून तर अवकाळी पाऊस आणि
गारपिटींमुळे बागपिकांचे नुकसान भरून न येणारं आहे. फवारणीसह अन्य मजूरींसाठी
भरपूर भांडवल शेतकर्याला या बागेत गुंतवावं लागतं. आता शेतकरी डाळिंबाची निर्यात
करू लागला. हे शेतकर्याच्या आर्थिक फायद्याचं असलं तरी यातून काही वेळा शेतकर्याचे
भांडवलही वसूल होत नाही. व्यापारी पिके घ्यावी की पारंपरिक अशा मनस्थितीत आज इथला
शेतकरी सापडला. कांदा हे व्यापारी पिक असलं तरी तेही बेभरवश्याचं झालं. काळी, बैडं, थळ, चाकोले, बागायती, जिरायती, पांढरी (गाव
वस्ती) आदी शेतीतले आणि गाववस्तीतले काही प्रकार आहेत. जमिनीचा कस पाहून पिकं
घेतली जातात.
आपलं
संपूर्ण शेत खरिपात बाजरीने आणि रब्बीत गव्हाने वा हरभर्याने उभ्या दिसणार्या
शेतात आता बाजरीचा वा गव्हाचा दाणा पिकत नाही, हे अघटीत वाटतं. ज्यांच्याकडे शेती
नाही त्यांच्याप्रमाणेच शेतकरी सुध्दा आता गहू- बाजरी मार्केटमधून व्यापार्याकडून
विकत घेताना दिसतो हे दृश्य डोळ्यांनी पाहवत नाही. (हा गहू पंजाब, मध्यप्रदेश आदी
राज्यातून मागवला जातो.)
आधी
लाकडी नांगर नंतर लोखंडाचा नांगर म्हणून त्याचे लोखंड्या हे नामकरण आणि आता
ट्रॅक्टरने शेतीची कामं होऊ लागली. या बदलामुळे बैल आणि बैलगाडी शेतकर्यांकडे
दिसत नाहीत. (एक बैलगाडी लुप्त झाल्याने बैलगाडी संदर्भातले भाषेतले अनेक शब्द आणि
वाक्प्रचार लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.) लाकडी नांगर, वखर, पांभर, कोळपणारं, फळी देण्यातली
लाकडी फळी आदी औतं दिवसेंदिवस नामशेष होऊ लागली. धान्य काढायचं मशीन आल्याने कोणी
शेतकरी पाथेवर बैल हाकताना दिसत नाही. म्हणून बैलाच्या तोंडावरचं मुचकंही
इतिहासजमा झालं. बाजरी खुडणे, पाथ धरणे, खळे सारवणे, खळे लावणे, कणसं कांडणे, मोगरी, च्याहूर, पाट्या देणे, उपणणे, वार्याची वाट पहाणे, मुचकं आदी शब्दही मान टाकू लागले.
बाजरीचे कणसं खुडायला माणसं लावल्याचं कुठं दिसत नाही. गावाजवळची खळवाडी दिसेनाशी
झाली.
विहिरीतून
मोटेने शेतीला पाणी भरण्याच्या काळात मोटेवरची गाणीही रानात शिरताच सहज ऐकायला
मिळत. नंतर रॉकेलवर चालणारी वेगवेगळ्या कंपनींची इंजिनं आली आणि आता इलेक्ट्रीक
मोटारी सगळीकडे दिसू लागल्या. दिवसेंदिवस विहिरींचं पाणी तळाला चाललं. विहिरींची
खोली वाढू लागली. पाण्याचा तुटवडा पडू लागला तसं जास्त पाणी लागणारं आणि वर्षभर
पोसावं लागणारं ऊसासारखं पिक घेणं कमी होऊ लागलं. शेताला म्हणजे विहिरींना
जोपर्यंत महामुर पाणी होतं, तोपर्यंत विहिरीतलं पाणी मशिनने वा इलेक्ट्रीक
मोटरने हौदात पडून सारंगने वहात शेतात जात असे. शेतकरी शेतातल्या वाफ्यांना वा
बेल्यांना बारा देऊन पाणी भरायचे. ‘बारा देणे’ हा वाक्प्रचारही कालांतराने भाषेतून लुप्त होईल. आता
तुषार सिंचन वा थेंब (ठिबक) सिंचनाने शेताला पाणी दिलं जातं. पाण्याचा
अपव्यय टाळण्यासाठी मात्र या शोधाचं स्वागतच करावं लागेल.
शेतकर्याला भौतिक सुख मिळावं, त्याच्या हातात दोन पैसे खेळावेत याबद्दल कोणाचंही
दुमत असणार नाही. पण आपली पारंपरिक पिकं अजिबात न घेणं हे मनातल्या मनात खडळतं.
व्यापारी पिकांसोबत आज थोडीफार पारंपरिक शेतीही व्हायला हवी, असं वाटत
राहतं. आज शेती वाटेहिश्यांमुळे अनेक तुकड्यांत विभागली गेली. म्हणून मशीनने सलग
एकाच पिकाची शेती करणे कठीण होऊन बसले.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा