-
डॉ. सुधीर रा.
देवरे
भारत देशाची राजधानी दिल्ली असून भारताचे सर्वात मोठे शहर मुंबई हे आहे. भारताची आर्थिक
राजधानी सुध्दा मुंबईच आहे. देशाचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,287,263
चौरस किमी इतके आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1,210,854,977 इतकी आहे. (आजची-2017 ची लोकसंख्या 1,293,057,000 इतकी
असावी.) भारताची साक्षरता 86.43 टक्के असून राष्ट्रीय अधिकृत भाषा हिंदी आणि इंग्रजी या असल्या तरी देशात त्या त्या राज्यात त्या त्या
प्रांतीय भाषा अधिकृत मान्यताप्राप्त आहेत. दंतकथेतील भरत वंशावरून देशाचे नाव भारत झाले असा समज.
भारताचा
प्रागितिहास प्रचंड प्रमाणात आहे, पैकी बराच भाग अज्ञात आहे म्हणून तो समूळ उलगडता
येत नाही. वेदकालापासून भारताचा ज्ञात इतिहास आहे. ख्रिस्तपूर्व 3101 हा वेदकाल
समजण्यात येतो. भारताचा प्राचीन कालखंड इ.स. पूर्व 400 – इ. स
1000 आहे. प्राचीन काळात सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, चक्रधरांचा
महानुभाव पंथ व ज्ञानेश्वर यांचा समावेश करता येईल. ईस्ट इंडिया कंपनीच्या
स्थापनेपासून अर्वाचीन इतिहास म्हणता येईल. विसाव्या शतकात भारतात खूप वेगाने घटना
घडत होत्या.
अनेक
राज्यांमध्ये विभागलेला हा देश होता. भारतात अनेक संस्थानात अनेक राजे राज्य करत
होते. परकियचक्र येऊन अनेक राजांनी स्थानिक राजांना हरवून भारताच्या विविध भागात
आपले बस्तान बसवले होते. इंग्रजांची सत्ता ही भारतावर शेवटची सत्ता होती. भारतातील
विविध स्थानिक राजांची राज्य खालसा करून इंग्रजांनी एकछत्री अंमल सुरू केला.
इंग्रजांनी जवळ जवळ दीडशे वर्ष राज्य केल्यानंतर अनेक स्वांतत्र्य सैनिकांच्या
चळवळीने आणि बलिदानाने शेवटी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगष्ट 1947 या
दिवशी भारत स्वतंत्र झाला. आणि 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला. जगातील
सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून भारत जगात ओळखला जातो. 15 ऑगष्ट 1947 ला भारत
दोन देशात विभागला गेला. भारताच्या राजकारणात असलेल्या जिन्हा यांनी स्वतंत्र
पाकिस्तानची मागणी केल्याने भारतातून पाकिस्तान हा मुस्लीम धार्जिना देश निर्माण
झाला. तरीही जगातील दुसर्या क्रमांकाची मुस्लीम लोकसंख्या आज भारतात आहे.
पाकिस्तान ज्या धार्मिक पायावर स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला तो आज विफल
झाला असून जगातला अविश्वसनीय देश म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते. जगातील अनेक
दहशतवादी पाकिस्तानात राजरोसपणे वास्तव्य करू शकतात.
भारताच्या
पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर तर
उत्तरेला हिमालय पर्वत आहे. भारताच्या वायव्य ते पूर्व दिशेपर्यंत अनुक्रमे पाकिस्तान,
चीन, तिबेट, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार (ब्रम्हदेश) या देशांच्या सीमा
आहेत.
भारत
हा देश लोकसत्ताक गणराज्यांचा असून विविध वंश, जाती, धर्म मिळून येथील लोक
गुण्यागोविंदाने राहतात. औद्योगिक राष्ट्रात भारताचा दहावा क्रमांक लागतो. भारताची
तटीय रेखेची लांबी 7516.6 किमी. (अंदमान, निकोबार व लक्षव्दिपसह) आहे.
प्राकृतिकरीत्या भारताचे पाच विभाग पडतात. ते पुढीलप्रमाणे: 1) उत्तरेकडील हिमालय
पर्वत श्रेणी, 2) उत्तरेचा मैदानी प्रदेश, 3) व्दिपकल्पांचे पठार, 4) तटीय मैदानी
प्रदेश, 5) बेटे. असे हे पाच विभाग.
भारतात
अनेक खनिजे, वने आणि वनस्पती आढळतात. बारा तासाचा दिवस आणि बारा तासाची रात्र
होते. भारत हा प्रचंड मोठा देश असल्याने देशात भौगोलिक विविधता दिसून येते. कुठे
असाह्य असे प्रचंड ऊन- उष्णता तर कुठे कडाक्याची थंडी, कुठे एप्रिल महिण्यातही
पडणारे बर्फ, कुठे रोज पडणारा पाऊस तर कुठे भाजून टाकणारे वाळवंट. अशा असमान
वातावरणात प्रचंड तफावतीचा भारत हा देश आहे.
हिंदू
– 79.8%, इस्लाम - 14.2% , ख्रिश्चन - 2.3%, शिख -1.7%, बौध्द -0.7%, जैन - 0.4%, आणि 0.9% इतर धर्मिय लोक. जगातील सर्व प्रमुख
धर्माचे लोक भारतात राहतात. भारत हे निधर्मी राष्ट्र असून भारतातील लोक सहिष्णु
आहेत. या
व्यतिरिक्त अनेक पंथ, संप्रदाय आपापल्या परंपरा पाळताना दिसतात. जात व्यवस्था
वाईट असली तरी भारतातील जात व्यवस्था (जी प्रचंड प्रमाणात आहे.) अजून संपत नाही.
भारताचा देश पातळीवरील
कारभार हिंदी आणि इंगजी या भाषेत पाहिला जात असला तरी भारतीय राज्यघटनेने काही
प्रांतीय भाषांना मान्यता दिलेली आहे. भारतीय राज्यघटनेत अधिसूची -8 मध्ये भारतीय
प्रमुख भाषांचा समावेश केला आहे. त्या भाषा अशा: आसामी, बंगाली, गुजराती, हिन्दी,
कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मलयालम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजावी,
संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगु, उर्दु अशा एकूण अठरा भाषांना प्रांतीय भाषा म्हणून
मान्यता मिळाली आहे. आता एकूण बावीस भाषांना मान्यता आहे. पैकी तमिळ, संस्कृत,
तेलगु, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र भारतात खूप भाषा बोलल्या जातात. भारताच्या
भाषा, बोलीभाषा आज 1500 पर्यंत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत 1800 होत्या.
दिवसेंदिवस बोली भाषा मरताहेत. अनेक आदिवासी भारतात वास्तव्य करतात आणि त्यांच्या
स्वतंत्र बोलीभाषा अस्तित्वात आहेत.
भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यात
धार्मिक, पुरातत्वीय, नैसर्गिक, वास्तु आदी वर्गवारी करावी लागेल. चार धाम यात्रा,
बारा ज्योर्तिलिंगे, कुंभमेळे (हरिव्दार, प्रयाग, उज्जैन, नाशिक- त्र्यंबकेश्वर.),
अष्टविनायक, प्रमुख धार्मिक पीठे: शृंगेरी, व्दारका, पुरी, जोशीमठ,
कांचीपुरम,अहोबिलम, मेलकोटे, उडुपी आदी धार्मिक पर्यटन स्थळे आहेत.
वुलर, डल (जम्मू- काश्मीर), पुष्कर,
सांभर, जयसमंद, सिलिसाड, पिचोला (राजस्थान), नारायण, नलसरोवर (गुजरात), चिल्का
(ओडिशा), पुलिकत, कोल्लेरू (आंध्र प्रदेश), लोणार (महाराष्ट्र), बेब्मनाड,
अष्टमुडी, कायनकुलम (केरळ), लोकटाक (मणिपूर) आदी सरोवरांचे पर्यटन हजारो पर्यटक
करत असतात.
युनेस्कोने गौरविलेली भारतातील बत्तीस
जागतिक वारसा ठिकाणे आहेत: आग्रा किल्ला, ताजमहाल, फत्तेपूर सिक्री
(उत्तर प्रदेश), अजिंठा लेणी, वेरूळची लेणी, घारापुरी लेणी, छत्रपती शिवाजी
टर्मिनस (महाराष्ट्र), महाबलिपुरम, बृहदिश्वर मंदिर- तंजावर (तामिळनाडू), सूर्य
मंदिर- कोणार्क (ओडिशा), ऐतिहासिक चर्च – ओल्ड
गोवा (गोवा), हंपी, पट्टदकल येथील मंदिरे (कर्नाटक), खजुराहोची प्राचीन मंदिरे,
सांची येथील स्तुप, ऐतिहासिक भित्तिचित्र- भीमबेटका (मध्यप्रदेश), हुमायुनची कबर,
कुतुबमिनार, लाल किल्ला (दिल्ली), भारतातील पर्वतीय रेल्वे (निलगिरी, तामिळनाडू,
दार्जिलिंग, पश्चिम बंगाल), महाबोधी मंदिर- बुध्दगया (बिहार), चंपानेर – पावागड, राणी की वाव (गुजरात), जंतर मंतर – जयपूर , राजस्थानातील किल्ले, केवलादेव घाना राष्ट्रीय
उद्यान (राजस्थान), काझीरंगा, मानस वन्यप्राणी अभयारण्य (आसाम), सुंदरबन राष्ट्रीय
उद्यान (पश्चिम बंगाल), नंदादेवी व पुष्पघाटी (उत्तराखंड), पश्चिम घाट (गुजरात,
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू), ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान
(हिमाचल प्रदेश).
भारतीय
लोकसंगीत हे उत्तर हिंदुस्थानी आणि दक्षिण कर्नाटकी म्हणून प्रामुख्याने ओळखले
जाते.
पंजाबचा भांगडा, आसामचा बिहु, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडचा चाहु, गुजरातचा गरबा आणि दांडिया, राजस्थानचा घुमार आणि महाराष्ट्राचा लावणी हे आठ लोकनृत्य मिथक कथांवर आधारीत आहेत.
पंजाबचा भांगडा, आसामचा बिहु, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडचा चाहु, गुजरातचा गरबा आणि दांडिया, राजस्थानचा घुमार आणि महाराष्ट्राचा लावणी हे आठ लोकनृत्य मिथक कथांवर आधारीत आहेत.
इंडियन
नॅशनल अॅकेडेमी ऑफ म्युझिकने ज्या लोकनृत्यांना अभिजात दर्जा दिला आहे ते नृत्य:
नृत्य, नाट्य आणि लोकसंगीत या तिघांचा मेळ ज्यात असतो, ते नृत्य म्हणजे तमिळनाडूचे
भरतनाट्यम, उत्तर प्रदेशचे कथक, केरळचे कथकली आणि मोहिनीअट्टम, आंध्र प्रदेशचे
कुचिपुडी, मणिपुरचे मणिपुरी, ओडिशाचे ओडिशी आणि आसामचे सत्रिया हे अभिजात नृत्य
आहेत.
गुजरातचे
भवाई, पश्चिम बंगालचे जत्रा, उत्तर भारतातील नौटंकी आणि रामलिला, महाराष्ट्राचा
तमाशा, आंध्रप्रदेशाचा बुराकथा, तमिळनाडूचा तेरूकुट्टू आणि कर्नाटकचा यक्षगाण हे
अभिजात नाट्य आविष्कार आहेत.
भारतीय प्राचीन साहित्य हे संस्कृत भाषेत
आढळून येते. त्यापूर्वी कोणत्या भाषेत साहित्य लिहिले जात होते हे अज्ञात आहे.
रामायण आणि महाभारत हे प्राचीन महाकाव्ये आहेत. इलियड सोबत हे दोन महाकाव्ये
जागतिक महाकाव्ये समजली जातात. असे एकूण तीन महाकाव्ये. कालिदासाचे शाकुंतल नाटकही
अभिजात आहे. कामसूत्र हा सुध्दा एक प्राचीन महत्वाचा ग्रंथ आहे. भक्त
संप्रदायातले अनेक संतकवी आजही प्रख्यात आहेत. कबीर, तुलसिदास, गुरूनानक आदी.
विसाव्या शतकातील रविंद्रनाथ टागोर या कवीवर्यांना गितांजली या काव्याबद्दल नोबेल
पुरस्कार मिळाला.
भारतातील
ठळक ऐतिहासिक पुरूषांची नावे घ्यायची झाली तर छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर, विवेकानंद, महात्मा फुले,
बाबासाहेब आंबेडकर आदींचे नावे सांगता येतील.
हिमालय,
विंद्य, सह्याद्री, पूर्व घाट, पाश्चिम घाट, सातपुडा अशा काही महत्वाच्या पर्वत
रांगा भारतात असून गंगा, यमुना, ब्रम्हपुत्रा, गोदावरी, कृष्णा, चंद्रभागा,
कावेरी, नर्मदा, तापी, कोसी, हुगळी, सतलज, झेलम आदी अनेक प्रमुख नद्या भारतातून
वाहतात आणि भारतीय शेतीव्यवस्था समतोल ठेवतात.
(पुण्याच्या मेनका प्रकाशनातर्फे नुकत्याच
प्रकाशित झालेल्या ‘सास्कृतिक भारत’ या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा