बुधवार, १४ जून, २०१७

याचक: एक आस्वाद



याचक: एक आस्वाद
- डॉ. सुधीर रा. देवरे

      कुसुमाग्रजांच्या याचक या कवितेचा मी घेतलेला आस्वाद इथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो :

याचक
असा याचक
ज्याच्या हातातील कटोरा
कशानेच भरत नव्हता.
नृपाळांनी टाकली सिंहासने
कुबेरांनी टाकली
सुवर्णाची भांडारे
तरीही तो रिताच.

पंडितांनी शब्द टाकले
पुरोहितांनी धर्म टाकले
साधुंनी सत्व टाकले
वीरांनी कर्म टाकले
तरीही तो रिताच.
मग याचक आला
एका भिकारणीच्या दाराशी
तिथे ती उघड्या स्तनाने
पाजीत होती
आपल्या पोराला...
याचक म्हणाला,
माई भीक वाढ,
भिकारणीने पोर बाजूला सारले
आणि स्तनावर पान्हाळलेले
दुधाचे दोन थेंब
त्याच्या कटोर्‍यात टाकले,
कटोरा भरून गेला
शिगोशिग
अथांग समुद्रासारखा.
आता तो याचक
दाता होऊन
त्या दुधाचे थेंब वाटतो आहे
पृथ्वीवर सर्वांना.
म्हणूनच
इतके सारे होऊन
होत असून
माणसाची जात
अद्यापही जीवंत आहे.
                  - कुसुमाग्रज (मुक्‍तायन)
      कविता ऐकल्यावर- वाचल्यावर आपल्याला प्रथम असं लक्षात येतं, एक याचक हातात कटोरा घेऊन सर्वदूर भटकत आहे. त्याच्या रिकाम्या कटोर्‍यात राजांनी सिंहासने, कुबेरांनी सुवर्णाची भांडारे, पंडितांनी शब्द, पुरोहितांनी धर्म, साधुंनी सत्व आणि वीरांनी कर्म टाकले. तरी तो कशानेच भरत नाही. याचक एका फाटक्या भिकारणीच्या दाराशी येतो. ती भिकारीन स्वत:चे दुधाचे दोन थेंब त्या कटोर्‍यात टाकते आणि कटोरा शिगोशिग भरून जातो. अशी या कवितेची कवितागत कथा आहे. चमत्कार म्हणता येणार नाही तरी काहीशी ‍अतिभौतिकी. या चमत्कारातून आपण सावरत नाही तोच कवितेचा पुढील भाग आणखी एकेक धक्के देत जातो. कटोरा भरल्यावर हा याचक तृप्त होऊन स्वस्थ बसत नाही तर याचकाचा तो दाता होतो. भरलेल्या कटोर्‍यातून दुधाचे थेंब पृथ्वीवर सर्वांना वाटत फिरतो. पुढे कविता सांगते, ‘म्हणूनच/इतके सारे होऊन/होत असून/माणसाची जात अद्यापही जीवंत आहे.’
      पूर्वार्धात हा याचक वेगळा आहे हे लक्षात येतं. पण शेवट वाचल्यावर माणसाची जात जीवंत ठेवणारा आणि याचकाचा दाता झालेला हा माणूस साधासुधा याचक कसा असेल? याचक नुसता आगळावेगळाच नसून माणूस नावाची जात जीवंत ठेवणारा दाता - प्रचंड मोठी विभूती होत महामानव होत जातो. या याचकाची भूमिका काय, हे शोधून काढण्यासाठी पुन्हा एकदा कविता पहिल्यापासून नीट आस्वादावी लागते.
      कवितेच्या सुरूवातीलाच, याचकाच्या हातातील कटोरा कशानेच भरत नसल्याचा उल्लेख आहे. पहिल्या कडव्यात कटोरा नृपाळांच्या सिंहासनांनी भरत नाही. कुबेराच्या सुवर्ण भांडारांनी भरत नाही. म्हणून हा लोकव्यवहारात मोजल्या जाणार्‍या वस्तूंची वा चलनाची याचना करणारा याचक नाही हे स्पष्ट होते. 
      याचकाच्या हातातील हा कटोरा कवितेच्या दुसर्‍या कडव्यात पंडितांच्या शब्दांनी भरत नाही. पुरोहितांच्या धर्मांनी भरत नाही. साधूंच्या सत्वांनी भरत नाही आणि वीरांच्या कर्मांनीही भरत नाही. उपरोक्‍त संज्ञा तर चाकोरीबध्द व्यवहारी नाहीत. मग या कटोर्‍याला भूक कसली लागली आहे? हे शोधून काढण्यासाठी आधी हा कटोरा शब्द, धर्म, सत्व, कर्म या संकल्पनांनी का भरत नाही हे ठरवून घेतले पाहिजे.
      कटोरा शब्दांनी का भरू नये? हा पहिला प्रश्न. कवी म्हणतात, पंडितांनी शब्द टाकले. म्हणजे हे नुसते शब्द नाहीत तर ते पंडितांचे शब्द आहेत. म्हणून हा शब्द तत्वज्ञान आहे, शब्दप्रामाण्य आहे. कोरड्या तत्वज्ञानाने पोटाची भूक तर जात नाहीच पण आत्मिक- भावनिक भूकही भागत नाही. म्हणून अशा शब्दांनी कटोरा भरत नसावा.
      याच कडव्यातील दुसरी ओळ, पुरोहितांनी धर्म टाकले तरी कटोरा भरत नाही. धर्म म्हणजे नेमका कोणता धर्म? नुसता धर्म नाही तर हा पुरोहितांचा धर्म आहे. म्हणजेच हा विशिष्ट चौकटीतला धर्ममार्तंडांचा पोटभरू धर्म आहे. एखाद्या कर्मकांडामागची कारणमीमांसा न तपासता धर्मात आहे म्हणून कराव्या लागणार्‍या आचरणात आत्मिक तादात्म्य कसे राहील? म्हणून या धर्मानेही कटोरा भरत नसावा.
      पुरोहितांच्या धर्माप्रमाणेच साधूंच्या सत्वानेही कटोरा कसा भरेल? साधुंच्या गूढ सत्वाविषयी सामान्य माणूस भितीयुक्‍त आदर दाखवेल तरी भावनिक एकतानता कशी निर्माण होईल? आणि शेवटी वीरांच्या कर्मानेही कटोरा भरत नाही. इथे मात्र याचकाची मनोवृत्ती नीट तपासून घ्यावी लागते. वीरांच्या कर्माने कटोरा का भरू नये? हा प्रश्न कोड्यात टाकतो. पण पुढचा भाग वाचून कविता समजून घेतली की हा प्रश्नही लगेच सुटतो. हे कर्म वीराचे आहे. वीराचे कर्म कितीही शूर वा उदात्त असो पण ते क्रौर्याचे- हिंसेचे कर्म आहे. कारण वीराचे कर्म हे शत्रूला मारण्याशिवाय आणखी कोणते कर्म असणार? आणि हा याचक तर देव, धर्म, सिमा, शत्रू, लिंग, रंग, जात यापलिकडे पाहणारा विशाल दृष्टीचा मानव आहे- हे ही समग्र कविता आस्वादताना स्पष्ट होत जातं. म्हणून वीराच्या संकुचित शौर्यानेही हा कटोरा भरत नाही.
      लक्षात येतं, ज्या ज्या गोष्टी वा वस्त़ू त्याच्या कटोर्‍यात टाकल्या गेल्या त्या स्वयंभू नाहीत. त्या तथाकथित मौलिक भौतिक वस्तू वा अमूर्त संकल्पना आहेत. ज्यांनी ज्यांनी वैभवी वस्तू कटोर्‍यात टाकल्या त्यांनी त्या वस्तू जन्माला आल्यावर प्राप्त केल्या आहेत. जन्माला येतांना त्यांनी त्या वस्तू आपल्या शरीरासोबत आणलेल्या नाहीत. किंवा ज्या वस्तू त्यांच्या शरीराचा भाग नव्हत्या त्या मौलिक असल्या तरी निर्जिव वस्तू कटोर्‍यात टाकल्या गेल्या. ज्या गोष्टी आपण चलनी व्यवहारात मोजतो त्या वस्तूंची याचना करणारा हा क्षुद्र याचक नाही. या याचकाचा कटोरा वेगळ्याच गोष्टींसाठी भुकेला आहे हे स्पष्ट होतं. व्यवहारी गोष्टी ज्या आपण मौल्यवान समजतो त्या या याचकाला नको आहेत.
      मग याचक भिकारणीच्या दाराशी आल्यावर भिकारीण दूध पिणार्‍या आपल्या पोराला बाजूला सारून स्वत:च्या शरीरातले दुधाचे दोन थेंब कटोर्‍यात टाकते आणि कटोरा शिगोशिग भरून जातो. दुधाच्या दोन थेंबांनी हा कटोरा शिगोशिग का भरून जावा? हा मूलभूत प्रश्न. एकतर हे दूध भिकारणीचे स्वत:चे आहे. ते दूध तिच्या शरीरातलाच एक स्वयंभू भाग आहे. सिंहासन, सुवर्ण, शब्द, धर्म, सत्व, कर्म यांच्यासारखे ते उपरे नाही, असा एक अन्वयार्थ सुचीत होतो.
      आता दुधाचा लक्षणार्थ घेऊ या. पहिला अर्थ म्हणजे दुधाला आपण अमृत म्हणतो. याचकाला अमृत प्राप्त होते. दुसरा लक्षणार्थ म्हणजे हे दूध एका आईचे आहे. दूध हे संगोपणाचे प्रतिक. म्हणजे हा याचक माया, ममता, वात्सल्य प्रेमासाठी भुकेला आहे, तहानलेला आहे हे लक्षात येतं.
      त्याची ही प्रेमाची भूक तृप्त झाल्यावर तो एकाचजागी स्वस्थ बसत नाही. याचकाचा आता तो दाता होतो आणि त्याला मिळालेले प्रेम, वात्सल्य, माया, ममता संपूर्ण पृथ्वीवर वाटत फिरतो. इथे कवीने पृथ्वी हा शब्द फार सुचकतेने योजलेला दिसतो. हा याचक कोणत्याही एका धर्मात, एखाद्या देशात वा एखाद्या जातीत बंदिस्त नाही. कोणत्याही एका देशाला, धर्माला वा जातीला तो प्रेम वाटत नाही तर पृथ्वीच्या पाठीवर जिथे जिथे माणूस नावाची जात आहे, तिथे तिथे तो प्रेम वाटत फिरतोय. हा याचक महामानव वा मानवतावादी धर्माचा प्रेषित ठरतो. म्हणून तर कवितेचा शेवट होतो,
’इतके सारे होऊन/होत असून/माणसाची जात/अद्यापही जीवंत आहे!’
      इतके सारे होऊन म्हणजे नेमके काय? हे स्पष्ट करण्याची आवश्यकता नसावी. आज जगात काय काय होत आहे हे तर नव्याने सां‍गण्याची गरज नाही. ते सर्वांना ज्ञात आहे. मानवातले दानवपण नियमितपणे प्रत्येकाच्या प्रत्ययाला येत असले तरी मानवतावाद, प्रेम, वात्सल्य, माया, ममता क्वचित का होईना पण ते आहे वा राहील अशी आशा कवी व्यक्‍त करतात. जगातील प्रेम आटलेले नाही. ते दुर्मिळ असेल पण आहे. म्हणून हा साधासुधा याचक नसून मानवाचे मानवपण टिकावे यासाठी तो हाती कटोरा घेऊन हिंडणारा रक्षक आहे.
      शेवटी कवीला हेच सांगायचं आहे की, मनुष्याच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांइतकीच किंबहुना त्याहूनही अधिक प्रेम ही तेवढीच महत्वाची आस आहे, प्रेम ही मानवाची सर्वात मोठी व आदिम तहान-भूक आहे.
      (‘कवितारती’ जाफेमाए-2017 च्या अंकात प्रकाशित झालेले मर्मग्रहण. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा