-डॉ. सुधीर रा. देवरे
विव्दान
सर्वत्र पुज्यते! असा सुविचार आपल्याला सर्वत्र वाचून-ऐकून
बालपणापासून पाठ असतो. संस्कृतीचे गोडवे गातानाही हे ब्रीद नेहमी
अधोरेखीत केले जाते. मात्र वास्तवात सर्वत्र विव्दान पुजला जात
नाही हे सत्य आहे. निदान याचा प्रत्यय तुलनेने तरी निदर्शनास येत असतो. सत्ता
सर्वत्र पुज्यते! हा अनुभव मात्र सर्वत्र – सर्वदूर
दिसून येईल. बालपणाच्या पोपटपणातून आपण जसजसे वयाने, अनुभवांनी, विचारांनी
आणि ज्ञानाने मोठे होत जातो तसतसे आपल्याला वास्तवाचे भयाण रूप दिसू लागते आणि आपण सुविचारांच्या भोळ्या भाबड्या जगातून खडबडून
जागे होतो. सर्वत्र सत्ताच पुजली जाते हे कटू सत्य
आहे. शिकून विव्दान झालेल्या माणसाला समाजात स्थान नाही. तो
आपल्या पोटापाण्यासाठी कोणती नोकरी वा कोणता व्यवसाय
करतो याला जास्त महत्व दिले जाते. मग त्या व्यवसायाचा
आणि प्रत्यक्ष त्याच्या सामाजिक भूमिकेचा ती व्यक्ती जाणीवपूर्वक
काहीही संबंध येऊ देत नसली तरी समाज नेहमी खुर्चीला शरण जात असतो.
एखादा युवक आयएएस, आयपीएस वा एमपीएससी असला तरी समाजात
त्याचा सर्वत्र सत्कार केला जाईल. समाजात
त्याच्याबद्दल आदर निर्माण होतो. तो सन्माननिय ठरत असतो. मग तो युवक कितीही आत्मकेंद्रीत आणि पोटार्थी
असो. सामाजिक बांधिलकीशी
त्याला काहीही देणेघेणे नसो वा तो आपल्या
नोकरीत भ्रष्ट कामे करीत असो. या उलट एखादा
युवक ज्ञानाने उच्चविद्याविभूषित होऊन प्रपंचासाठी तृतीय-चतुर्थ श्रेणीतील नोकरी वा अन्य व्यवसाय पत्करून सामाजिक उत्थापनासाठी काही कार्य
करीत असेल, समाजाला नवीन दृष्टीकोन देत असेल, प्रबोधन करीत असेल तर अशा माणसाला समाजात - या
व्यवस्थेत मानाचे स्थान मिळत नाही. याचे कारण त्याच्याकडे
कोणत्याही प्रकारची तथाकथित सत्ता नसते. विचारवंताला
आपल्या व्यवस्थेत स्थान नाहीच. उलट विचारवंत
जाणीवपूर्वक अलक्षित-दुर्लक्षित केले जातात.
एखाद्या संशोधकाने वीस-पंचवीस
वर्ष सखोल अभ्यास करून
एखादे सैध्दांतिक मत मांडले वा संशोधनात्मक प्रबंध
लिहिला तर वृत्तपत्रात पाचव्या-सहाव्या पानावर
त्यांची पाच- सहा ओळीत संक्षिप्त अशी काहीतरी बातमी छापून
दखल घेतल्यासारखे दाखवले जाते. अशी बातमी दूरचित्रवाणींच्या
वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होणारच नाही, झालीच तर ती
कोणाला कळणार नाही, इतक्या संक्षेपाने होईल. मात्र-
एखाद्या दुय्यम-तिय्यम
राजकीय पुढार्याने एखाद्या प्रचार
सभेत एखादे भडक वा विवादास्पद विधान केले तर
वृत्तपत्रे ती बातमी पाहिल्या पानावर अर्धेपान देऊन छापून अशा शिवराळपणाला अनाठायी
प्रसिध्दी देतील. अनेक टीव्ही चॅनल्सवर तावातावाने अशा
उद्गारावर चर्चा होतील.
राजकीय पुढार्यांनी साहित्य संमेलनांपासून - संमेलनांच्या
मंचांपासून दूर रहावे असे दुर्गा भागवतांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून
ठणकावून सांगितले नसते तर आज साहित्य संमेलनातील व्यासपीठे साहित्यिकांपेक्षा राजकीय
नेत्यांनीच व्यापलेली दिसली असती. यदाकदाचित
राजकीय नेत्यांतले किंश्चिंत साहित्यिक लोकच अध्यक्ष म्हणून निवडून आले असते. नाहीतरी
आजही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बर्याचदा दुय्यम दर्जाचा निवडून येतो. म्हणून
काही व्रतस्थ आणि तत्वाधिष्ठित साहित्यिक अशा अध्यक्ष
पदाच्या भानगडीत पडत नाहीत.
गावागावात होणार्या इतर छोट्या मोठ्या साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांचीच
प्रामुख्याने व्यासपीठांवर हजेरी लागल्याचे दिसते. मान्यवर
साहित्यिक श्रोत्यांमध्ये बसलेले दिसतात तर स्थानिक राजकीय सत्ताधारी, लोकप्रतिनिधी, थातूरमातूर
संस्थेचे अध्यक्ष आणि देणगी देणारे दानशूर यांनी साहित्य
संमेलनाचा मंच व्यापलेला दिसतो.
अशा दुय्यम -तिय्यम
राजकीय पुढार्यांची उपस्थिती
सदर कार्यक्रमाला नसली तर सत्तेतली दुसरी फळी व्यासपीठावर बसवून व्यासपीठाला तथाकथित वजन आणण्याचा प्रयत्न केला जातो. या
दुसर्या फळीत प्रशासकीय सवेतील अधिकारी असतात. म्हणजे दुय्यम का होईना
व्यासपीठावर प्रशासकीय सत्ताकेंद्राचा समावेश होतो. सारांश, ज्यांच्याकडे
सत्ता आहे वा नावाबरोबर सत्ताकेंद्राचा उल्लेख करता येईल अशी खुर्ची आहे, अशांना
अनाठायी महत्व प्राप्त होऊन कलाक्षेत्रातल्या वा साहित्य क्षेत्रातील व्यासपीठांवर त्यांचा
उदोउदो केला जातो. अशा सत्ताकेंद्रांचा फायदा संमेलने आयोजित
करणार्या आयोजकांना वेगळ्या
प्रकारे करून घ्यायचा असतो आणि तो करून घेण्यासाठी ते मागेपुढे पहात नाहीत. अशा
फायद्यासाठीच आपल्याला निमंत्रित
करण्यात आले होते, म्हणून आयोजकांचे काम करून देणे आपले कर्तव्यच
आहे, अशा समजातून सत्ताकेंद्रही त्यांना अधिकारबाह्य सहकार्य करतात. थोडक्यात, हे जग दिल्याघेतल्याचे आहे. एकतर्फी इथे काही
दिले जात नाही. आपण हे दिले तर तिकडून काय मिळेल यावर देणार्याचा डोळा असतोच.
म्हणून काही घेतांना आपल्याला कोणती किंमत मोजावी लागेल याचे भान साहित्यिकांनी-
कलावंतांनी- विचारवंतांनी ठेवायचे असते.
सारांश, आज विद्वान पुजला जात
नसून सर्वत्र सत्ता पुजली जाते हे सत्य पावलोपावली अधोरेखित होत राहते.
(‘सहज उडत
राहिलो’ या पुस्तकातून साभार. या
ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही
विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा