- डॉ. सुधीर रा. देवरे
बालपणी
दिवाळी आली की नव्या कपड्यांपेक्षा फटाकड्यांचीच जास्त ओढ लागायची. पंधरा
दिवस दिवाळी पुढे रहायची अशा बेताने मी
आण्णांच्या मागे फटाकडे आणण्याचे टुमणं लावत असे. दुसरीकडे माझी आकाशदिव्याची
तयारी सुरू व्हायची. तेव्हा सुध्दा विरगावला व्यापार्यांच्या दोन तीन घरांमध्ये रेडीमेड
आकाशदिव्यांची फॅशन सुरू झाली होती. पण सर्वच
गाव टोकरांच्या कामड्यांपासून तयार केलेल्या घरगुती आकाशदिव्यातच समाधान मानणारे होते. मला विमान आणि चांदणीचे आकाशदिवे करता
येऊ लागले होते. म्हणून एका वर्षाआड मी आकाशदिवा करत
असे. सलग दोन वर्ष मी तोच आकाशदिवा लावत असे. दिवाळी
झाली की तो व्यवस्थितपणे अडकड्याला सरीला बांधून
ठेवीत असे.
टोकरांच्या
बारीक कामड्या तयार करून त्या चांदणी अथवा विमानाच्या आकाराने दोर्याने बांधायच्या. खाली
पणती ठेवायला लहान चौक तयार करावा लागायचा. चहू बाजूने
लाल, पिवळा, जांभळा, निळा, हिरवा
असे पातळ घोट्याचे कागद डकवायचे. धाब्यावर
एक काठी बांधायची. तिच्या वरच्या टोकाला फिरता दोराचा रीळ बसवायचा. त्यावरून
दोरीने आकाशदिवा खाली वर घेऊन जाता येत असे.
दररोज
संध्याकाळी आकाशदिवा दोरीने खाली सोडून घ्यायचा आणि त्यात मातीची पणती ठेवायची. पणतीत
कापसाची वात, गोडेतेल टाकून पणती पेटवायची. दोरी
ओढली की आकादिवा वर जायचा. विशिष्ट
उंचीवर आकाशदिवा गेला की दोरी खालच्या खुंटीला बांधून ठेवायची. हा
ही एक खेळच होऊन गेला होता लहानपणी. पणतीत तेल
असेपर्यंत आकाशदिवा उजेड द्यायचा.
दिवाळीची
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फटाकडे फोडणे असे
वाटायचे. सारखं सारखं सांगितलं तरच एखाद्या शनिवारी (बाजाराचा दिवस) आण्णा सटाण्यातून फटाकडे घेऊन येत. त्या
फटाकड्यांमध्ये बरेच प्रकार रहायचे. लवंगी
फटाकडे, मध्यम आकाराचे फटाकडे, लाल
तोटा, अँटमबाँब, तारकाडया, विमान, भुईनळा, टिकल्यांच्या
डब्या असे सर्व प्रकारचे फटाकडे आणून आण्णा आम्हा भावंडांना ते सारखे वाटून द्यायचे. मग
आम्ही ते पुरवून पुरवून दिवाळीपर्यंत थोडे थोडे फोडायचो. अहिराणीमध्ये
लावून लावून जेवण कर अशी म्हणायची पध्दत आहे. म्हणजे
एखादी भाजी जास्त आवडत असली तरी ती सर्वांना पुरावी म्हणून जास्त न खाता भाकरीने
लावून लावून म्हणजे थोडी थोडी खायला
सांगीतले जायचे. तसे
आम्ही फटाकडे लावून लावून फोडायचो.
एकदा
दिवाळी दोन चार दिवसावर आली
तरी आण्णा काही फटाकडे आणत नव्हते. टुमणं लावून
लावून मी ही कंटाळलो पण आण्णा लक्ष देत नव्हते. मनात
म्हटलं, आपण काय
केलं म्हणजे आण्णा फटाकडे आणतील? मग मला
आयडीया सुचली. आण्णा सकाळी अंघोळ करून ओसरीत कपडे
घालायला येत. तोपर्यंत मी झोपलेलाच असायचो. बर्याचदा जागा असूनही मी अंथरूनातच पडलेला असायचो. एका
सकाळी आण्णा कपडे घालायला ओसरीत आले आणि मला जाग असूनही मी झोपेचं सोंग घेऊन झोपेत
बरळतोय असे दाखवत म्हणालो, माले फटाकडा
पाहिजेत व्हय अंहं.. आणि तसाच
मटराऊन गोधडीत पडून राहिलो.
दुसर्या दिवशी मला फटाकडे मिळालेत खरे पण मी
बरळायचे नाटक केले हे आण्णांनी बरोबर ओळखलं होतं. आण्णा
मला शिव्या द्यायला लागले तेव्हा माझ्यासहीत सर्व घर हसायला लागलं. असं काही माझ्याकडून झालं की आण्णा मला नेहमी म्हणायचे, भयान
जातवान शे हाऊ.
आम्ही
थोडे फटाकडे रात्री आणि थोडे पहाटेला
फोडायचो. फटाकडे फोडण्यासाठी चुलीतले एक विस्तवाचे लाकूड-भितूक
हातात घ्यायचे. ओट्यावर उभे राहून फटाकड्याची वात
विस्तवाला लावून फटाकडा गल्लीत फेकायचा. काही फटाकडे
फुटायची. काही फुसके निघत. फुसके
फटाकडे उचलायला आण्णा जाऊ देत नसत.
विमान, भुईनळा, रॉकेट, मोठे
तोटे असे फटाकडे वडील भाऊ बहिणी लावायचे. असे फटाकडे
फोडायला फटाकड्याच्या वातीला भितूक लावून दूर पळावे लागत असे. असे
दूर पळायला असमर्थ असल्याने मी लवंगी फटाकडे, तारकाड्या, टिकलींच्या
डब्या फोडायचो. आमच्यासोबत आण्णाही फटाकडे फोडायचे.
एकदा
आण्णांनी तोटा फोडला. लाकूड धरलेल्या हातातही एक फटाकडा होता. दुसर्या हातातल्या फटाकडयाच्या वातीला विस्तव लावून तो ओट्यावरून
आण्णांनी खाली फेकला. पण तोपर्यंत लाकूड धरलेल्या हातातील
तोट्याची वात हालचालीत विस्तवाला लागली होती. दुसर्या हातातील तोटा आण्णांना न कळत फटकन
त्यांच्या हाताच फुटला. धडाम.
आण्णांच्या
हाताला खूप चटका बसला. हात लालभडक होऊन सुजून आला. हातावर
पाणी ओतले. मध लावले. पण
आग काही कमी होत नव्हती. आण्णांचा
हात जसजसा सुजत होता तसतसे आण्णा मला शिव्या द्यायला लागले. या
भडव्याचंच खूप चालतं. फटाकडे आणा, फटाकडे
आणा अं. हा फटाकडा आता जर तुझ्या हातात फुटला
असता तर काय झालं असतं.? बरं तर बरं
तो माझ्या हातात फुटला. फटाकडे
मिळाले नाही तर भडवा खोटं खोटं बरळतो. पहाय
हाऊ हात मन्हा? फटाकडा पाहिजेत नही का तुले? पहाय हाऊ हात मन्हा. जातवान कुठला. आण्णांच्या
शिव्या ऐकून ऐकून माझ्याच हातात फटाकडा फुटला की काय असे मला वाटू लागले.
ह्या
गोष्टीला दोनेक वर्ष झाली असतील. वयाने मोठे
असलेले लोक भुईनळा हातात लावायचे हे मी पहायचो. ते पाहून मी ही एक भुईनळा हातात लावायचं ठरवलं. ते लोक इतका मोठा
भुईनळा हातात लावतात तर मी हा छोटासा भुईनळा हातात लावला तर काय
होईल, असे वाटून मी हातात भुईनळा लावला. त्यातून
थोड्याश्या आगीच्या चिंग्या
उडाल्या आणि तो माझ्या हातातच फटकन फटाकड्यासारखा फुटला. हाताला
आधी प्रचंड झिनझिन्या आल्या आणि नंतर हाताची खूप आग होऊ लागली. हात थोड्या
वेळातच भप्प सुजून आला. सगळा हात
पांढर्या दारूचा पांढराफटक पडला होता. बरं
तर बरं तो डावा हात होता. नाहीतर
आता काही दिवस शाळेत लिहिण्याचे जमलेच नसते. मी आण्णांना
कळू दिलं नाही. वडिलांना
माहीत झालं असतं
तर खूप शिव्या दिल्या असत्या त्यांनी. हातावर घरच्याघरी उपचार
करून घेतले. आणि फटाकडे फोडण्याची तेव्हापासून
कानाला खडी लावली.
कळायला
लागलं तसं फटाकड्यांबद्दल बर्याच
वाईट गोष्टी कळायला लागल्या म्हणून मी आता फटाकडे
फोडण्याचं बंद करून
टाकलं. चटका बसला
म्हणून नाही तर एक तत्व म्हणून मी आता फटाकडे फोडत नाही. फटाकड्यांच्या
कारखान्यात बालकामगारांकडून चोरूनलपून
काम करून घेतलं जातं. कमी पैशात
काम होतं म्हणून बालकामगार ठेवले जातात. फटाकड्यांच्या दारूमुळे बालकामगारांचे आयुष्य
बरबाद होतं. फटाकडे
फोडणं म्हणजे बालकामगार राबवायला उत्तेजन देणं. दरवर्षी फटाकड्यांमुळे कोणाचे डोळे
जातात तर कोणी होरपळून मरतं. कोणी जखमी
होतं. कुठे आगी लागतात. फटाकड्यांच्या
आवाजामुळे ध्वनी प्रदुषण होतं. दारूमुळे
हवेचेही प्रदुषण होतं. बाजारात विकले जाणारे फटाकडे अनेक अवैध कारखान्यातून येत
असतात.
मी
लहानपणी दिवाळी खूप साजरी केलेली आहे. भरपूर फटाके
फोडून घेतले आहेत. भरपूर म्हणजे बालमनाला जितके पुरेसे
वाटतात तितके. स्वस्तातले. परवडणारे. बारीक बारीक फटाकडे. पण खूश होऊन
जायचो.
नोकरीला
लागलो तेव्हा दिवाळीला फक्त एक दिवस
सुट्टी असायची. नोकरी आवश्यक सेवेतील म्हणून
दिवाळीच्या दिवशी बळजबरी ओव्हरटाईम करावा लागायचा. तालुक्याच्या
गावालाच पोस्टींग म्हणून सुट्टी मिळायची नाही. लांबच्या
लोकांना दिवाळीला सुट्टी मिळायची. आम्हाला
ओव्हरटाईम करावा लागायचा. ओव्हरटाईम
म्हणजे आठ तास ड्युटीसाठी एकशे साठ
रूपये मिळायचे. त्यातल्यात्यात समाधानाची गोष्ट एकच की, ड्युटी
शिप्टवाईज असल्याने अडजेस्टमेंट करता यायची. दिवाळीच्या
दिवशी मी नाईट अथवा दुपारची ड्युटी लावून घ्यायचो आणि दिवाळीला सटाण्याहून
विरगावला जायचो. घरी सर्व कुटुंब आलेले असायचे. कुटुंबात
रहायला मिळायचे. मित्रांबरोबर प्रत्येकाच्या घरी
फराळाचे खायचे. आम्ही गावात वाचनालय स्थापन केलेले
असल्याने आणि दिवाळीला सर्वच मित्र गावात आलेले असतात म्हणून दिवाळीच्या दिवशीच
आम्ही वार्षिक मिटींग घ्यायचो.
दिवाळीच्या दिवशी एवढे सर्व
जगता जगता वेळ कुठे निघून जात होता कळत नव्हतं. दुपारी मला लगेच सटाण्याला जावे लागे. ड्युटी
असायची. ह्या थोड्या वेळेचाही मी जास्तीत जास्त
सदुपयोग करून घेत असे. मला दुपारी ड्युटीला जायचे म्हणून मित्रही आपले कार्यक्रम
पुढे ढकलून जास्तीत जास्त वेळ माझ्याबरोबर रहात. माझ्या
जाण्याच्या वेळी सर्व जण एस टी स्टँडपर्यंत मला सोडवायला येत असत. मी
गाडीत बसून सटाण्याला यायला निघालो की ते परत गावात जात. हवेवर स्वार होऊनच माझी दिवाळी आनंदात
जात होती. आणि एवढा एवढा वेळ दिवाळीसाठी देऊनही
मी तुडुंब आनंदांने -मनाने ड्युटीवर येत असे.
पुढे
आम्हा ऐकेक मित्राचे लग्न होऊ लागले. माझेही झाले. आता
आम्ही सर्वच मित्र विवाहित. पैकी
तिघांना नोकर्या नाहीत पण
वय तरूण झाल्याने
नैसर्गिक नियमानुसार नोकरी नसली तरी छोकरी सगळ्यांनीच मिळवली आहे.
दरम्यान
टेलिफोन
काँप्युटराइज्ड झाल्यामुळे मानवी आवश्यकता कमी झाली. यामुळे
ओव्हरटाइम बंद झाला. दिवाळीला
दिवसभर सुटीही आता सहज मिळू शकते. दिवसभर मित्रांबरोबर विरगावला राहू असा बेत
आखून मी एका दिवाळीला विरगावला
गेलो. ऐकेक मित्राच्या घरी जावून त्यांना शोधू लागलो. पण
कोणीही घरी आलेले नव्हते. दिलीप आणि
त्याच्या भावांची जमीन वाटणी
झाल्यामुळे तो यावेळी घरी आलेलाच नव्हता. विरगावला गेलोत तर रहायचे कोणाकडे अशी त्याची
अवस्था होणार होती. भास्करचेही तेच. रमेश
पुण्याला स्थायिक झालेला. प्रभाकर शेतात आणि द्राक्षांच्या बागेत इतका गुंतला की तो म्हणतो, द्राक्षे मार्केटला नेली आणि पैसे
हातात आले की तेव्हाच मी दिवाळी साजरी करतो. राजूचे
गावातील घर पडल्यामुळे दिवाळीला तो प्रवासात सुट्टी खर्च करतो. राहिला
कडू. त्याचे खरे नाव रमेश सोनवणे. त्याच्याकडे
गेलो. तो होता. त्याला
नोकरी नाही. गावातच शेतकरी सोसायटीच्या सेक्रेटरीचा असिस्टंट म्हणून
काम करत असल्याने तो कुठे जाऊही शकत नाही. मी
त्याच्याकडे चहा घेतो.
आम्ही
वाचनालय उघडतो. वाचनालयात खूप धुळ, जाळी साचलेले असते. आधी
तिथे बसतो. वाचनालयातील आम्ही स्थायी सदस्यांची
पाटी वाचत एकेकाची आठवण काढत राहातो. वाचनालयाला
आम्ही स्वतंत्र ग्रंथपाल ठेऊ शकत नाही. कारण ग्रंथपालाला पगार देण्यासाठी शासन ग्रँट देत नाही. कोणी देणगी
देत नाही. कधीकाळी विरगावला कोणाचे तरी वाचनालय होते. ते ग्रँट घेत होते. मग
ते कुठे गेले अशी शासनाकडून आम्हाला विचारणा केली जाते. पण
ते वाचनालय कागदोपत्री सापडले तरी आम्ही त्यांच्याकडून तसा ठराव घ्यायला अयशस्त्ती
ठरलोत.
दिवाळीचा
दिवस सरकत नाही. काळ पुढे जात नाही. मला
दिवाळी साजरी करायला वेळ मिळत नव्हता तेव्हा सर्व जण मोकळे होते व वेळ द्यायला
तयार होते. आता मला वेळ आहे तर माझे मित्र पोटापाण्याच्या
कामानिमित्त इकडेतिकडे पांगलेत. आता त्यांना
एकत्र कसे कुठे करता येईल हा माझ्यापुढे प्रश्न आहे.
(नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘सहज उडत राहिलो’ या पुस्तकातून साभार. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या
नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा