रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

सांस्कृतिक भारत : गोवा





- डॉ. सुधीर रा. देवरे
            गोमांचल, गोपाकापट्टम, गोपकपुरी, गोवापुरी, गोमांतक इत्यादी प्राचीन गोव्याची पूर्वीची नावे आहेत. गोवा हे ऐतिहासिक संचित स्थान म्हणून ओळखले जाते.
            उत्तर काळात गोव्याचा उज्वल इतिहास दिसून येतो. इसवी सनच्या पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्य होते. नंतर कदंब, महालखेडच्या राष्ट्रकुट राजाचे अधिपत्त्य. चालुक्य व पुढे सिल्हारांचेही राज्य. 14 व्या शतकाच्या शेवटी यादवांचे राज्य. नंतर दिल्लीच्या खिलजीची स्वारी. गोव्यावर मुसलमानी अंमल सुरू झाला. वास्को द गामा यांनी 1498 मध्ये पोर्तुगाल ते भारत समुद्रमार्ग शोधला, गोव्यावर वारंवार छोट्यामोठ्या स्वार्‍या होत राहिल्या, अनेक पोर्तुगिज नागरिक भारत भूमीवर हळूहळू वस्ती करून राहू लागले. 1510 मध्ये अल्फान्सो द अल्ब्युकर्क याने विजयनगरच्या सम्राटाच्या मदतीने गोव्यावर स्वारी करून गोवा जिंकले. ख्रिस्ती पाद्री फ्रांसीस झेव्हिअरचे आगमन झाले. 1542 ला गोव्यात मोठ्या प्रमाणात धर्मांतरास सुरूवात झाली. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात शिवाजी राजांनी गोव्याच्या आजूबाजूचा भूभाग जिंकला. 1947 भारतीय स्वातंत्र्यानंतरही गोवा पोर्तुगिजांकडे होते. गोवन नागरिकांनी गोवा मुक्‍ती आंदोलन करून 19 डिसेंबर 1961 ला गोवा पोर्तुगिजांच्या अधिपत्त्यातून मुक्‍त केले. गोव्याला दिव, दमन सोबत केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले गेले. 30 मे 1987 ला गोव्याला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळाली. गोवा भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम किनार्‍यावर स्थित आहे. गोव्याच्या उत्तरेस महाराष्ट्र व गोवा वेगळे करणारी तेरेखोल नदी आहे. दक्षिणेकडे कर्नाटकाचा कनारा जिल्हा, पूर्वेकडे पश्चिमघाट, पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. पणजी, मार्मा गोवा, वास्को, म्हापसा व पोंडा ही गोव्याची महत्वाची गावे आहेत. गोव्यात जवळजवळ 450 वर्ष पोर्तुगिज नियम होते.
            गोव्यात अनेक प्रकारची पारंपरिक लोकगीते प्रचलित आहेत. कोकणी गीते अभिजात अशा चार गटात दिसून येतात. या गीतात फुगडी आणि ढालो आहेत. दुसरा प्रकार देखणी हा आहे. हा नृत्य प्रकार पाश्चात्य आणि स्थानिक अशा सरमिसळीतून निर्माण झाला आहे. तिसरा प्रकार दुलपोड, चौथा मांडो. यात संगीत पाश्चात्य असते तर लय कोकणी दिसते. जवळजवळ 35 प्रकारच्या कोकणी गीतांत लोकगीतांचे वर्गीकरण करता येईल. त्यात वर ‍निर्दीष्ट केलेल्या गीतांसह बनवार्‍ह, दुवलो, फुगडी, कुन्नबी, लाऊनीम, ओवी, पालन्नम, ता‍घरी, तीयत्र, झागोर, झोती अशा प्रकारचे गीते आहेत.
            गोव्यातल्या कला आणि लोककला लक्षवेधी ठरतात. गोव्याला पूर्व जगातले रोम म्हटले जाते. गोव्याची लोकसंस्कृती, लोकगीते आणि ख्रिश्चन आर्कीटेक्चर मन वेधून घेते. घोडे मोंडी नावाचा नृत्य प्रकार हा हातात तलवारी घेऊन आणि पायाला घुंगरू बांधून ढोल आणि ताशांच्या नादावर केला जातो. या नाचातूर शूरवीरतेचे प्रदर्शन केले जाते. आपले पुर्वज कसे लढावू आणि शूर होते हे प्रदर्शित करण्यासाठी हा नाच असतो. मांडो हा भावनिक नृत्य प्रकार आहे. भजन, आरती आदी प्रकारात असणारा हा नृत्य प्रकार आहे. देखणी हा गाणे आणि नाचाचा संमिश्र प्रकार आहे. यात फक्‍त स्त्री नर्तिका असते. हा गीतबध्द नृत्य प्रकार घुमट या वाद्यावर होत असतो. या व्यतिरिक्‍त धनगर नृत्य, मुसळ नृत्य गोव्यात प्रचलित आहेत.
            गोव्यातील लोकवाद्य म्हणजे ढोल, मृदंग, तबला, घुमट, मादलेम, शहनाई, सुर्त, तासो, नगारा आणि तंबोरा हे आहेत. पोर्तुगिजांकडून आलेले पियानो, मांडोलीन आणि व्हायोलिन.

            गोव्याचे मुख्य अन्न तांदूळ आहे. डाळी, रागी व इतर धान्यांची लागवड होते. मुख्य पिक नारळ, काजू, ऊस, सुपारी आदी असून पोफळी, अननस, आंबे व केळी ही फळे गो्व्यात मोठ्या प्रमाणात पिकतात. अशा  उत्पादनातून अर्थलाभ होतो. गोव्याला भरपूर वनसंपदा लाभली आहे.
            राज्याच्या मुख्य केंद्रात कोलबा, कलंगुट, वाग्टोर तोर बागा, हरमाल, अंजुना, मिरा मार, समुद्र किनारा, बॉन जिझसचा बासिलिका, जुन्या गोव्यातील कॅथेड्रल चर्चेस, काविलम, मारडोल, मंगेशी, बंडोरदेवळे, अग्वादा, तेरेखोल, चापोरा, कागो द समा किल्ला, दूध साखर व हरवलेम हे धबधबे तसेच मायेम तलावाचा सुरम्य व देखणा परिसर आहे. चराओ येथील डॉ. सलीम अली पक्षी संग्रहालय पाहण्यासारखे आहे. तेरेखोल, चपोरा, बागा, मांडवी, झुआरी, साल, सालेरी, तालपोना व ‍‍गोलगीबाग या नऊ नद्या गोव्याच्या प्रमुख नद्या आहेत. पणजी, मडगाव हे गोव्याचे प्रमुख समुद्र किनारे असून जवळ जवळ एकुण 47 बीचेस गोव्याला लाभले आहेत. सर्वच बीचेसवर पर्यटक कायम गर्दी करत असतात.
            गोव्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 3702 चौरस किमी असून राज्याची राजधानी पणजी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार गोव्याची लोकसंख्या 1,457,723 इतकी आहे. गोव्याच्या प्रमुख भाषा कोकणी व मराठी या दोन्ही असून काही लोकभाषाही बोलल्या जातात.
            (या व्यतिरिक्‍त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात. महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या वेबसाईटवर महाभ्रमंती या विभागात सांस्कृतिक भारत या नावाचे माझे साप्ताहीक सदर सुरू झाले आहे. दिनांक 27 जून 2016 ला  प्रसिध्द झालेला हा लेख. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
संदर्भ सूची:
1) मराठी विश्वकोश, वार्षिकी 2005, प्रमुख संपादक: डॉ. श्रीकांत जिचकार, प्रकाशक: सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
2. आंतरजालावरून (Internet) शोधलेली माहिती.
3. ढोल नियतकालिक, (अहिराणी, अंक क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि मराठी वार्षिकांक, दिवाळी 2002), संपादक: डॉ. सुधीर रा. देवरे
4. संदर्भ शोध सहाय्य: दर्शना कोलगे.

1 टिप्पणी:

  1. बरेच शब्द- उच्चार चुकीचे आहेत.
    (गोवन) प्रीमो
    मिपावरची गोव्यावर लिहिलेली आमचें गोंय ही लेखमाला वाचलीत तरी बरेच योग्य उच्चार सापडतील

    उत्तर द्याहटवा