-
डॉ. सुधीर रा.
देवरे
लहानपणी
मी शंकराचा भक्त होतो. रोज
सकाळी देवपूजा करायचो. शिवलीलामृत पोथीचे वाचन करायचो. मग
बाकीचा अभ्यास- शाळा वगेरे. मी
आमच्या मागच्या दारी ऐसपैस असलेल्या जागेत महादेवाचे
लहान मंदिर बांधले होते. आधी काडीपेटीच्या
खोक्याने चिखलाच्या विटा पाडल्या. त्या विटांच्या
चिखलाने भिंती बांधल्या. वर छपराला उतार
देण्यासाठी काडक्या ठेवल्या, काडक्यांवर जुन्या
वह्याची पृष्ठे ठेवली आणि त्यावर चिखल अंथरला होता. अशा
या देवळात माझ्यासह अजून एक जण सहज आत बसत असे.
या
देवळात मी चिखलाचीच महादेवाची पिंड तयार करून बसवली होती. रोज
सकाळी पिंडीची अंघोळ घालण्यासाठी पिंडीवर पाणी टाकत असे. पिंड
मातीची असल्यामुळे पाण्याने भिजून जायची. भिजलेल्या पिंडीला
धक्का लागला तर ती फुटूनही जात असे.
विरगावला
जिकडे लोक सकाळी हातात डबा घेऊन परसाकडे
जायची तिकडे नाथबोवाची समाधी होती. त्या समाधीजवळ
एक लहान महादेवाची दगडाची पिंड मला कधीची
दिसत होती. कोणी तिची अंघोळ घालत नव्हते आणि पूजाही
करत नव्हते. तिच्यावर पालापाचोळा पडायचा. येताजाता
पिंडीला कोणाचा पायही लागून जात असे. पिंडीच्या आजूबाजूलाच
लोक परसाकडे बसायचे. अशा पिंडीची मला कधीची किव येऊन राहिली
होती. मला सहज उचलता
येईल अशी ती लहान पिंड होती आणि माझ्या चिखलाच्या पिंडी ऐवजी तिची स्थापना मी केली
तर मला नीट पूजाही करता येईल असे मला वाटू लागले होते. पिंडीचीही निगा
राहील असा विचार करून मी एके दिवशी ती
पिंड तिथून उचलून आणली.
मी
विचार करत होतो. माझी चिखलाची पिंड पाण्याने भिजून जाते. तिच्या
ऐवजी ही दगडाची पिंड बसवली तर मी
कुठे वाईट करतोय? उलट
गुखडीतून देव देवळात आणल्याने मला पुण्यच मिळेल. मी
ती पिंड उचलून आणून माझ्या चिखलाच्या पिंडेच्या
जागेवर पूजा करून स्थापना केली. अंघोळ घातली. हळद
कुंकू फुले वाहिली. शिवलीलामृत पोथीचा अकरावा
अध्याय वाचून शंकराची आरती म्हटली.
मी
खूप चांगले काम केले असे वाटून मी स्वत:वरच
खूश झालो होतो. संपूर्ण दिवस मी पिंडीजवळ बसूनच अभ्यास
केला.
संध्याकाळी
वडील शाळेतून घरी आल्यावर माझ्या
देवळातली ती दगडी पिंड त्यांनी पाहिली
आणि मला जोरात हाक मारली, सुधीरऽऽऽ. मी जवळ गेलो. ही महादेवाची
पिंड कुठून आणली तू? मी म्हणालो, नाथबोवाच्या
समाधीजवळून.
वडील म्हणाले, ही
पिंड आत्ताच्या आता ताबडतोब त्या समाधीजवळ ठेऊन ये. देव
जिथल्या तिथेच बरा असतो, मग
तो गुखडीत का असेना. समजलं का?
मी हो ची मान हलवली. आणि लगेच पिंड
उचलून पुन्हा जिथल्यातिथे ठेऊन आलो. दुसर्या दिवशी पुन्हा
चिखलाची दुसरी पिंड तयार केली आणि वाळवून देवळात बसवली.
वडलांचा तो सहज निघालेला
उद्गार अजूनही मला वाट दाखवतो. देव जिथल्या
तिथेच बरा असतो! आजच्या तथाकथित बुवांच्या बुजबुजाटात कोणी
देवाला साज चढवायला पाहतं. कोणी देवाला
माणसाळवण्याचा प्रयत्न करतो. कोणी देवाचा
अडत्या- दलाल होऊ
पाहतो. तर कोणी आपणच देव असल्याचे आडमार्गाने सुचवू पाहतो. हा
सर्व गुंता नीट सोडवायचा असेल तर
प्रत्येकाला समजाऊन सांगावं लागेल, बाबारे, देव
जिथल्या तिथेच बरा असतो.
आज
रोज नवी नवी देवळं उभी राहत आहेत- बांधली जाताहेत. त्यात
लोक नवनवे देव बसवताहेत. आता तर देवांच्या डमीसुध्दा स्थापन होऊ लागल्यात.
उदाहरणार्थ, प्रतिसाईबाबा, प्रतीबालाजी वगैरे. देवळांची संख्या
वाढूनही देवपण मात्र वाढत नाही. देवपण ही खूप लांबची गोष्ट झाली. आता माणूसपणच
दिवसेंदिवस खुजे होताना दिसतं.
देव
जसा जिथल्यातिथे बरा असतो
तसा माणूसही माणसात असलेलाच बरा दिसतो. त्याला उसनं
देवपण वरून कितीही चिटकवलं तरी त्याचे पाय मातीतच - गाळातच
फसलेले वेळोवळी दिसून येतं.
आपले
पाय असे गाळात फसलेले पाहून लोक देवाचा आसरा घेत असतील. लोक
आपलं ध्येय साधून घेण्यासाठी देवाला वापरून घेतांना दिसतात. ह्या
प्रयत्नामुळे मग रामजन्मभूमीचा मुद्दा आपल्या रोजच्या मूलभूत गरचेचा होऊन जातो. एखाद्या
दगडी मूर्तीवर चुकून घाण बिन पडली तर आख्ख गाव, तालुका, जिल्हा, राज्य
अथवा पूर्ण देशही पेटून उठतो. जाळपोळ होते. माणसं
मारली जातात. पण
जिवंत आणि बुध्दीने सजग असलेल्या माणसावर रोज कोणी नाहीतर कोणी कशाची ना कशाची घाण
टाकत असतो. त्याचे त्याला काहीच वाटत नाही. आपल्याला
सर्व प्रेम -अस्मिता असते
ती फक्त दगडी
मूर्तींसाठी. दगडी पुतळ्यांसाठी. ज्या गोष्टी
आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत
अशा अमूर्त गोष्टींसाठी आपण जीव ओवाळून दंगली करतो. ज्या
सोन्यासारख्या माणसासाठी माणसानेच काहीतरी केलं पाहिजे त्यांना मात्र आपण दंगलीत जींवत जाळून टाकतो. देव
जिथल्या तिथे ठेवला नाही तर ह्या गोष्टी घडतच राहतील. देव
जिथल्या तिथं ठेवला तर माणूस, माणूसच राहील. तो
हैवान होणार नाही. (‘माणूस जेव्हा देव
होतो’ या माझ्या ग्रंथातील एका प्रकरणाचा संपादित अंश. या
ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर
संदर्भ द्यावा ही विनंती.)
- डॉ. सुधीर रा. देवरे
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा"तर कोणी आपणच देव असल्याचे आडमार्गाने सुचवू पाहतो." बरोबर म्हणालात साहेब
उत्तर द्याहटवा