गुरुवार, १५ जानेवारी, २०१५

धर्म कालबाह्य झालीत का?



 
-         डॉ. सुधीर रा. देवरे

       भावना सांभाळायला हव्यात. आज लोकांच्या भावना दुखावून चालणार नाही. कोणाच्या भावना कश्याने दुखावून भडकतील ते ही नेमके सांगता येत नाही. म्हणून अमूक एक कृती करताना वा अमूक एक लेख लिहिताना अमूक अमूकच्या भावना दुखावतील की काय, असा या पुढे आपल्याला सारखा विचार करत रहावा लागेल. ( हा लेख लिहिताना मी तोच विचार करतोय.) कारण कोणाच्या भावना दुखावणे म्हणजे आपला मृत्यूच ओढवून घेणे. मुले शाळा शिकतात म्हणून कोणाच्या भावना दुखावतात आणि त्या मुलांनाच ठार मारले जाते. काही लोक चित्र काढून प्रबोधन घडवण्याचा प्रयत्न करतात आणि कोणाच्या तरी भावना दुखावून चित्र काढणार्‍यांना आपला प्राण गमवावा लागतो. कोणी धर्ममार्तंड चित्रपटांना घाबरतो तर कोणी नाटकांना बंदी घालतो. अजून कोणी आपल्या मताच्या नाटकांना अभय देतो. आपल्या धार्मिक भावना किती कमकुवत आहेत पहा. सावधान, कोणत्याही लेखकाला- कलावंताला आता आपला प्राण केव्हाही गमवावा लागू शकतो. कारण त्याच्या कोणत्या कलाकृतीने कोणाच्या भावना कशा दुखावतील सांगता येत नाही.
         शाळा शिकल्याने धर्माचे नुकसान होत असेल तर तो धर्म इतका ठिसूळ पायावर उभा आहे का की, मुलांनी शिक्षण घेताच तो नामशेष होईल? एवढा मोठा जगभर पसरलेला धर्म दोन चार लोकांच्या आडव्या उभ्या रेषांच्या व्यंगचित्रांनी नामशेष होईल, अशी कोणाला भीतीच का वाटावी? इराक मध्ये कोणत्या धर्माचे आतंकी कोणत्या धर्माच्या लोकांना ठार मारताहेत? पेशावरमधील मुले कोणत्या धर्माची होती? त्यांनी आपल्या धर्माविरूध्द नेमकी कोणती कट कारस्थाने रचली होती? नायजेरीयात काय चाललंय. भारत कायम दहशतवादाच्या छायेत वावरतोय. हे सगळे मानवी बुध्दीच्या आकलनापलिकडे आहे.
         कोणी उपटसुंभ म्हणतो, बायकांनी चार मुले जन्माला घालावीत. (बायका मुले जन्माला घालण्याचे कारखाने आहेत का? ह्या मुलांचे संगोपण कोण करील, त्यांचे शिक्षण, राहण्याची सोय, घर, चरितार्थाचे काय? भारताची लोकसंख्या किती आहे? लोकप्रतिनिधी असून हे या महाशयाला माहीत नसेल तर मतदान करणार्‍यांनी संसदेतून या खासदाराला परत बोलवायला हवे.) कोणी एखाद्या प्रेषिताच्या आविर्भावात म्हणतो, जगातील सर्व मुले विशिष्ट अमूक या धर्माची म्हणूनच जन्माला येतात. (असे म्हणणारी व्यक्‍ती त्या धर्माची प्रेषित आहे का? कोणत्या विज्ञानाच्या आधाराने असे म्हटले गेले. आतून नास्तिक असल्याशिवाय असे कोणी बोलणार नाही. आपल्याच देवाचा धाक या व्यक्‍तीला वाटत नाही. म्हणून त्या व्यक्‍तीने असे बोलण्याचे धाडस केले. अशा संधीसाधूंना आपल्या धर्माचा फक्‍त राजकीय फायदा घ्यायचा असतो.) कोणी म्हणतो, दोन हजार एकवीस पर्यंत भारत फक्‍त अमूक एक धर्माचा होईल. कोणी म्हणतो, घर वापसी कार्यक्रम राबवायचा आहे, तर कोणी म्हणतो, अमूक ओबीसी हे अमूक धर्माचेच आहेत, म्हणून त्यांना आमच्या धर्मात घ्यायचे आहे. अजून कोणाला कुठे लव्ह जिहाद दिसतो. एका धर्मातील गुरू धर्म कट्टरता शिकवण्यासाठी दुसर्‍या धर्माच्या कट्टरतेचा आदर्श घ्यायला शिकवतो. असा आदर्श घेणे म्हणजे आपण तो परधर्म स्वीकारणे, इतकीही साधी गोष्ट त्याला कळत नाही. 
         कोण आहेत हे लोक? हे लोक देवाचे अवतार आहेत का? प्रेषित आहेत का? यांना कोणी दिला देवाची दलाली करण्याचा अधिकार? यांना धर्माचा पुळका का आलाय? यांना नेमकी कशासाठी आपापल्या धर्मातील लोकसंख्या वाढवायची आहे? (म्हसोबा ऐवजी ठकोबा पुजणे म्हणजे धर्मांतर नव्हे, विचारांतर व्हायला हवे. ते होत नाही.) कोणत्याही धर्मातील विष पेरणार्‍या लोकांपासून सर्वसामान्य लोकांनी सावध रहायला हवे. हे लोक जहरी होत आहेत. आतंक वाढवत आहेत. आतंकी लोक रॅबीज झालेल्या श्वानासारखे आपणहून मरायला का तयार होतात? या लोकांनी त्यांच्या डोक्यात कशा पध्दतीने जहर भिनवलेले असते, ते पहा : आतंकी करताना मेल्यानंतर एकदम स्वर्ग मिळतो. सेवेसाठी अस्पर्शीत पर्‍या मिळतात. इथले जग मायावी आहे. खरे जीवन मेल्यानंतरच सुरू होते. म्हणून स्वर्गात जायला घाबरू नका. म्हणजे आतंकीचे काम करताना मरायला घाबरू नका. तसे मेलात की स्वर्गात तुमचे खरे जीवन सुरू होईल.
         परंतु असे शिकवणारे इथे पृथ्वीवरच ठाण मांडून स्वर्ग सुख मिळवतात. वास्तव जीवन उपभोगतात. राजकारण करतात. सत्ता उपभोगतात. खरे तर आतंकी लोकांनी अशा ट्रेनिंग देणार्‍या लोकांनाच प्रथम स्वर्गात पाठवायला हवे. तुम्ही पुढे चला, आम्ही मागून येतो स्वर्गात असे त्यांना सांगायला हवे. अथवा असे स्वर्गीय जीवन जगायला आपणच का आधी जात नाहीत, असे आतंकी होणार्‍यांनी त्यांना जाब विचारायला हवा. पण हे लोक इतके सुज्ञ असते तर आतंकी कशाला झाले असते?
         राजकीय सत्तेपर्यंत पोचायला धर्म आपल्याला काहीही उपयोगाचा नाही हे जेव्हा राजकीय लोकांना कळेल तेव्हा हे लोक धर्माकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. (म्हणून सर्वसामान्य लोकांनी धर्मांध होऊ नये.) आज जगातील सर्व धर्म कालबाह्य झाली आहेत. मानवता हा एकच एक धर्म असून त्यात स्त्री आणि पुरूष या दोन जाती आहेत. धर्म ह्या शब्दाचा अर्थ विशिष्ट तत्वज्ञान, कर्तव्य, जबाबदारी असा आहे. ज्या काळात मानव प्राथमिक अवस्थेत व विखुरलेला होता, त्या काळी काही संघटकांनी त्याला एकत्र करण्यासाठी नीती- नियम घालून दिले, ते त्या त्या धर्माच्या नावाने त्या त्या भौगोलिक क्षेत्रात ओळखले जाऊ लागले. ह्या पेक्षा कोणत्याही धर्माला जास्त महत्व नाही. (आपल्या विशिष्ट तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी काही ग्रंथ लिहिले गेले, त्यापैकी काहीत कलागुण उतरल्याने ती काव्य म्हणून, काही महाकाव्य म्हणून चिरंजीव ठरली.) त्या त्या धर्मातील नियम- कायदे हे तात्कालिन सामाजिक- भौगोलिक परिस्थितीवर आधारीत आहेत. म्हणून ते आज कालबाह्य ठरतात. 1935 सालातले भारतातील इंग्रजांचे कायदे आपल्याला आज 2015 साली फक्‍त 80 वर्षांत निरर्थक वाटत असतील, तर हजारो वर्षांपुर्वी धर्माने सांगितलेल्या काही गोष्टी आज कालबाह्य का ठरू नयेत? आजचे धर्म म्हणजे प्राचीन काळातील टोळ्या होऊ नयेत.
         सारांश, आज सर्व धर्म कालबाह्य झालीत का, हा प्रश्न धर्ममार्तंडांनाच सतावत असावा. म्हणून धर्मांच्या नावावर आपली दुकाने चालवण्यासाठी (त्यात सरकारं चालवणं आलंच) ते इतके अधर्म कृत्य करीत आहेत. 
       (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या
ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) 

     -  डॉ. सुधीर रा. देवरे
     
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

२ टिप्पण्या: