-
डॉ. सुधीर रा. देवरे
मध्यंतरी
एक बातमी वाचण्यात आली: हाँगकाँग मध्ये कबरस्थानात अंत्यसंस्कार करण्यासाठी पंधरा
दिवसांची प्रतिक्षा करावी लागत असून अंत्यसंस्कारासाठी पाच ते बावीस लाखापर्यंत
खर्च येतो. तिथे जागेच्या अभावामुळे बहुमजली इमारतींच्या धर्तीवर कब्रस्थान
बांधण्यात येत आहे... अशा आशयाची ती बातमी होती.
ज्या ज्या धर्मांत प्रेतांचे दफन करतात त्या
त्या धर्मातील आचार संहिता सांगते की प्रेतांच्या कबरी टिकाऊ करू नयेत. म्हणजे विशिष्ट
कालावधीनंतर ती जागा पुन्हा दुसर्या कबरीसाठी वापरता येऊ शकते. मात्र तसे होत
नसल्याने कालांतराने जागेचा प्रश्न भेडसावतो. जगातील कोणत्याच धर्माने प्रेतावर अग्निसंस्कार
करणे निषिध्द ठरवलेले नाही, हे ही लक्षात घेतले पाहिजे.
भारतातील
आणि विशेषत: हिंदु धर्मिय माणसाच्या मृत्यूनंतर त्याला सार्वजनिक स्मशानभूमीत- आता
आधुनिक नामकरणाच्या अमरधामात अग्निडाग दिला जातो. म्हणून माणूस खर्या अर्थाने पंचतत्वात
विलीन होतो. (कब्रस्थानात पुरलेलं प्रेत कोणी वेगळ्या हेतूसाठी बाहेर काढू शकतं
अथवा जंगली जनावरांच्या भक्षस्थानीही पडू शकतं. मात्र प्रेत जाळलं तर एखाद्या
दुर्धर रोगी प्रेताच्या शरीरातील जिवाणू विषाणूही नष्ट होतात. आता झाडे
वाचवण्यासाठी विद्युतदाहिनी संयत्र वापरणेही गरजेचे झाले आहे.)
अग्निडाग
दिल्यानंतर अस्थि वेचून झाल्या की त्याच जागेवर दुसर्या प्रेताला अग्निडाग दिला
जातो. म्हणून स्मशानभूमी आडव्या पध्दतीने वाढत जात नाही. तिथला अग्नी कोणी जपून
ठेवत नाही. पवित्र जागा म्हणून कोणी ती राखून ठेवत नाही – त्या जागेवर कोणी आपला हक्क सांगत नाही. स्मशानाबाबत
जनमानसात समज असलाच तर तो भीतीचा आहे, श्रध्देचा नाही. आपल्या माणसाचे स्मरण
म्हणून जर कोणाला चिरा बसवायचा झाला तर तो आपल्या शेताच्या बांधावर अथवा आपल्या
घरात- घराजवळ बसवतात, स्मशानात नाही. - ही थोर हिंदु परंपरा आहे.
देहदान-
किमान नेत्रदान करणे हा मरणोत्तर श्रेष्ठ परमार्थी पर्याय आज उपलब्ध आहेच.
नेत्रदानासाठी आपल्या नजीकच्या डोळ्यांच्या इस्पितळात, ब्लाइंड असोसियेशन संघात वा
आय डोनर बँकेत आपल्याला स्वत: फॉर्म भरून मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचा मानस
व्यक्त करता येतो. नेत्रदान इच्छुक व्यक्तीच्या मृत्यूनंतर वारसांनी ही प्रक्रिया
लवकरात लवकर पाठपुरावा करून पूर्ण करून घ्यायची असते. एखाद्याने नेत्रदानाचा फॉर्म
भरून नाव नोंदणी केलेली नसली तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याचे वारस त्या व्यक्तिचे
नेत्र दान करू शकतात.
देहदानाची नाव नोंदणी मात्र ती व्यक्ती हयात असतानाच तिने स्वत:
फॉर्म भरून त्यावर स्वाक्षरी केलेली असली पाहिजे. देहदानाची नोंदणी नजीकच्या
सरकारी वा खाजगी मेडीकल कॉलेजात वा मोठ्या इस्पितळांत (जे जे, टाटा, रूबी,
ब्रिचकँडी, ससून आदी आणि प्रत्येक जिल्हयातील इस्पितळातही) करता येते. देहदानाची
इच्छा व्यक्त केलेल्या आणि तसा फॉर्म भरलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नाव नोंदणी
झालेल्या मेडीकल कॉलेजला त्याच्या वारसांनी कळवायचे असते. मेडीकल कॉलेजच्या-इस्पितळाच्या
अँब्युलन्सने वा आपल्या खाजगी वाहनाने तो देह दान करून वारसांनी तिथून तशी रीतसर
पावती- पत्र घेणे जरूरी आहे.
-
डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
सुंदर ....अभ्यासपूर्ण लेखं सर ......खरचं देशाला अश्या विचारांची गरज आहे .
उत्तर द्याहटवाthanks
उत्तर द्याहटवामाझे ब्लॉग्स वाचून इमेलने प्राप्त झालेली प्रतिक्रिया (संक्षिप्त):
उत्तर द्याहटवाडॉ सुधीर देवरे, सप्रेम नमस्कार.
सर, आपले ब्लॉग नेहमी वाचतोच. पण काल सगळे ब्लॉग पुन्हा वाचले. अगदी सुरूवातीपासून. मुखपृष्ठावर सुरूवातीलाच आकाशात झेप घेणारे पक्षी नजरेस पडतात. किती विषय, किती अभ्यास, किती चिंतन, किती संयम. आपले प्रबोधनाचे आणि तळमळीचे शब्द सामाजिक बदल नक्कीच घडवू शकतील. आपला उपक्रम स्तुत्य आहे. आपले शब्द आणि वाक्य सुटसुटीत, भाषा सुबोध, कोणालाही आकलन होईल अशा मुद्द्यांची मांडणी. ही सगळीच रचना हेतुत: केलेली दिसते. आपले विचार कोणालाही प्रेरणादायी ठरतील. आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी प्रत्येक शब्दातून प्रतीत होते. हे ब्लॉग म्हणजे कोणाला केलेले उपदेश नसून समाजाचा एक घटक म्हणून स्वत:च केलेले चिंतन वाटते. दुसर्यांना आवर्जून सांगण्यासारखे असल्यामुळेच त्यातून सामाजिक उद्बोधन होताना दिसते. आपल्याला शुभेच्छा.
- डॉ देवेंद्र पाटील,
प्राचार्य, इथापे होमिओपॅथिक मेडीकल महाविद्द्यालय, संगमनेर.