रविवार, २० मे, २०१२

सर्वात कमी लाच घेणारा : देव


     सर्वात कमी लाच घेणारा : देव

                          - डॉ सुधीर रा. देवरे

 भ्रष्टाचार होऊ नये असे वाटते ना आपल्याला? लाच देऊ नये- लाच दिल्याशिवाय आपली कामे व्हावीत असेही वाटते आपल्याला? ज्या ज्या लोकांचा अशा भ्रष्टाचाराला विरोध असेल त्या त्या लोकांनी प्रथम देवाला भ्रष्ट करणे देणे बंद करावे. कोणत्याही मंदिराच्या दानपेटीत दान म्हणून रूपया सुध्दा टाकायला नको. साध्या कारकुनाला हजारात लाच देणारे लोक ठिकठिकाणी देवांच्या दानपेटीत एक रूपयापासून दान टाकायला सुरूवात करतात. सध्या भिकारी सुध्दा एक रूपयाची भीक घेत नाही. मग देवाला आपण भिकाय्रापेक्षा कमी लेखतो की काय?   

याचा अर्थ असा नव्हे की लाखात करोडोत दान देणारे, साड्या कपडे दागिने, सोन्याचा मुकुट देवाला अर्पण करणारे लोक देवाचा सन्मान करतात. देवाला दान करणाय्रा इथल्या परंपरेनेच प्रथम येथे भ्रष्टाचार रूजवला आहे. तो समूळ नष्ट करायचा असेल तर देवाला लाच देणे आधी बंद करावे लागेल. लाच देऊन देव पावतो असे जर आपले तथाकथित बालपणापासूनचे संस्कार असतील- तसे जर बाळकडू मिळाले असेल तर पुढे मोठे झाल्यावर प्रत्येक ठिकाणी लाच देऊन आपले काम करून घेण्यात कोणालाच चुकीचे वाटत नाही.

म्हणून देवाला पैसे अर्पण करणे, कपडे अर्पण करणे, दागिने अर्पण करणे याला यापुढे आपण पुर्णपणे फाटा दिला पाहिजे. आणि नैवेद्य चढवताना सुध्दा तो देवाच्या निमित्ताने आपल्यासाठी आहे- देवाला नैवेद्य चालत नाही, तो फक्त भावाचा भुकेला आहे असेच संस्कार केले पाहिजेत.

 

- डॉ सुधीर रा. देवरे

         sudhirdeore29@rediffmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा