- डॉ. सुधीर रा. देवरे
‘उत्तर-आधुनिकता आणि मराठी कविता’ हा डॉ. मीनाक्षी पाटील यांचा समीक्षणात्मक ग्रंथ मुद्दाम वेळ काढून वाचला. ‘मराठी कवितेतील आधुनिक ते आधुनिकोत्तर जाणिवांपर्यंतचा अभ्यासपूर्ण आढावा घेणारा ग्रंथ’ असे उपशीर्षकही या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर दिले आहे. मुंबई विद्यापीठात पीएच. डी. साठी सादर केलेल्या प्रबंधाचे हे पुस्तकरूप पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केले. (प्रकाशन वर्ष : २०२४). डॉ. मीनाक्षी पाटील या कवयित्री, चित्रकार व साहित्यिक म्हणून आपल्याला माहीत आहेतच पण लघुपट लेखन, अभिनय व दिग्दर्शन या क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
ह्या पुस्तकात एक़ूण पाच प्रकरणे असून सुरुवातीच्या पहिल्या प्रकरणात ‘उत्तर आधुनिकता म्हणजे काय’ याचे विविध संदर्भांसह अतिशय सुस्पष्टपणे सोप्या वाक्यरचनेत विवेचन करण्यात आले आहे. यात झां – फ्रान्सुआ ल्योतार, फ्रेडरिक जेमसन, युर्गन हाबरमास या विचारवंतांनी केलेल्या उत्तर- आधुनिकतेच्या व्याख्यांसह (या व्याख्या बऱ्याच असल्याने इथे मुळातून त्या सगळ्या देणे अप्रस्तुत ठरेल. मूळ पुस्तकात त्या आहेतच) संकल्पनांची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. केवळ कवितेतीलच नव्हे तर समग्र वाड्.मयीन आविष्कारांसह नाट्य, चित्रपट, नृत्य, संगीत, दृश्यकला, वास्तुकला, तत्वज्ञान, इतिहासमीमांसा आदींवरही या उत्तर- आधुनिकतावादी समर्थक विचारवंतांनी भाष्य केले आहे. (आणि हे भाष्य उपरोक्त ग्रंथातही थोडक्यात देण्यात आले आहे.) झाक देरिदा या फ्रेंच विचारवंताच्या ‘विरचना’ संकल्पनेसह बी. रंगराव यांनी सांगितलेली उत्तर- आधुनिकेतेची वैशिष्ट्येही पुस्तकात सविस्तर आली आहेत. इहाब हसन यांनी प्रतिपादलेला आधुनिक आणि उत्तर- आधुनिकतेतला सूक्ष्म भेद सांगण्यात आला आहे. याव्यतिरिक्त अनेक समीक्षकांचे संदर्भही नावग्रंथनिर्देशांसह या ग्रंथात इतरत्र आले आहेत. हे सर्व विवेचन नेमके, संदर्भ संपृक्त आणि योग्य त्या उदाहरणांसह आल्याने या सर्व मांडणीला परिपूर्ण असे सैध्दान्तिक स्वरूप प्राप्त झाले आहे. या अभ्यासक्षेत्रांत नव्याने काम करू पाहणाऱ्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ म्हणूनच अतिशय उपयुक्त व मार्गदर्शक ठरू शकेल यात शंका नाही.
पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणात आधुनिक ते आधुनिकोत्तर जाणिवांचा आढावा आहे. यात मराठीतली १९६० नंतरची कविता ही आधुनिक तर १९९० नंतरची कविता उत्तर- आधुनिक (सर्वच कवींच्या सर्वच कविता नव्हेत.); अशी ढोबळ (ढोबळ हा शब्द मूल्यात्मक आहेच. याचे कारण १९६० नंतरची सर्वच कविता आधुनिक भूमिका घेऊन लिहिली गेली नाही. आणि १९९० नंतरची समग्र कविताही उत्तर-आधुनिकतेत आविष्कृत झालेली नाही. म्हणून हे वर्गीकरण ‘ढोबळ’) भूमिका घेऊन नामदेव ढसाळ, श्रीधर तिळवे, हेमंत दिवटे, वर्जेश सोलंकी, सचिन केतकर, संजीव खांडेकर, मन्या जोशी व सलील वाघ या आठ कवींच्या रचनांवर उत्तर-आधुनिकतेच्या दृष्टीकोनातून साक्षेपी मीमांसात्मक भाष्य करण्यात आले आहे. (नामदेव ढसाळ यांची महत्वाची कविता १९९० आधीच लिहून झाली आहे, असे प्रस्तुत अभ्यासकाला वाटते.)
तिसऱ्या प्रकरणात मराठीत लिहिल्या गेलेल्या उत्तर आधुनिक कवितेचे (याच कवींच्या कवितांचे) विर्स्तृततेने उपयोजन केलेले आहे तर चौथ्या प्रकरणातही याच कवितेच्या आशयाची ‘भाषाभिव्यक्ती’ तपासली आहे. चौथे प्रकरण हे तिसऱ्या प्रकरणाचेच विस्ताररूप म्हणता येईल. पाचवे समारोपाचे शेवटचे प्रकरण इतर प्रकरणांच्या तुलनेत संक्षिप्त असे केवळ १० पानांत असले तरी यात समीक्षात्मक संपृक्ततेने आलेली निरिक्षणे, अनुमाने आणि ठोस निष्कर्ष महत्त्वाचे ठरतात. या प्रकरणात उत्तर आधुनिकतेच्या व्याख्येत बसतील अशा या आठ कवींच्या कवितांच्या काही ओळींचे उपयोजनात्मक विवेचन, विश्लेषण व अर्थनिर्णयन केले असल्याने ह्या कविता कशा तऱ्हेने उत्तर आधुनिक ठरतात, हे साधार मांडण्यात आले आहे. चौथ्या प्रकरणात याच कवींच्या काही कवितांमध्ये आशयाची ‘भाषाभिव्यक्ती’ नेमकी कशी झाली आहे- कशी राबवली गेली आहे, याचे नेमके विश्लेषणात्मक वर्णन करून ह्या कविता उत्तर-आधुनिकतेला अनुसरतात, हे स्पष्ट केले आहे.
पुस्तकात उपयोजित केलेल्या सगळ्याच कवितांचे आकलन, संज्ञा विश्लेषण, संश्लेषण, रसग्रहण, अर्थनिर्णयन व कलात्मक मूल्यमापन वाचकाच्या पचनी पडेल हे नक्की. या आठ कवींच्या कविता उत्तर आधुनिकतेच्या त्या त्या विशिष्ट व्याख्यांच्या चौकटीत अभिव्यक्त होतात आणि म्हणूनच त्या जागतिक उत्तर- आधुनिक जाणिवा कशा अधोरेखित करतात याचे थेट उपयोजन- विवेचन अभ्यासपूर्ण झाले आहे. आणि या आठ कवींच्या कविता निर्विवादपणे उत्तर- आधुनिक संज्ञेत वर्गीकरण करता येतील अशा आशयात आहेतच.
मात्र तत्कालीन विशिष्ट युगजाणिवा या एकाच काळात सर्वदूर एकसमान नसतात, एकाच परिवेशातही सर्व मानवी समुह एकसमान जीवन जगत नसतात. त्यांचे जीवनमान व राहणीमान भिन्न असते. आर्थिक स्तर वेगवेगळे असतात. (उत्तर-आधुनिकतेच्या भाषेत बोलायचे झाले तर एका कॉलनीत राहणाऱ्या वा एकाच सोसायटीत राहणाऱ्या लोकांच्याही जाणिवा एकसारख्या नसतात. अलग अलग असतात.) म्हणून याच समकाळात पारंपरिक वा वेगळ्या कविता लिहिणारे कवीही आढळतात.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे ‘केंद्राला नाकारून परिघावर लक्ष देणे’ (पृ. १६१) ही फ्रेंच विचारवंत झाक देरिदा यांची उत्तर आधुनिकतेची व्याख्या आपल्या महाराष्ट्र- मराठीसाठी प्रमाणित ठरावी. कारण मराठी सारस्वतात अजूनही परिघावर हवे तसे लक्ष दिले जात नाही. उत्तर- आधुनिक भान असलेले केंद्रीय कवी पुस्तकात उपयोजनार्थ आले, पण हेच मूल्यभान असलेले परिघावरचे इतर कवीही यात यायला हवे होते. अशा कवींची दखल घेतली गेली नसल्याची चुटपूट अभ्यासीला आहे, हे या ग्रंथात नमूद आहेच. तरीही या इतर कवींच्या यादीतही उपेक्षित, बोलीभाषक व महिला कवींची- कवयित्रींची नावे आढळत नाहीत.
या विषयावर वा विषयसाम्य असलेले अजून काही पीएच. डी. प्रबंध इतर विद्यापीठांतही सादर झालेले आहेत हे नक्की. नावात थोडाफार बदल केला की विद्यापीठांकडून शीर्षक मंजुरी मिळते आणि अशा थोड्याफार फरकाने प्रबंध सादर होत राहतात. कोणी नव्वदोत्तरी कविता, कोणी महानगरीय जाणिवांच्या कविता, तर कोणी आताच्या जागतिक जाणिवेच्या समकालीन कविता म्हणून (नामदेव ढसाळ वगळता) याच कवींची दखल अभ्यासक वेगवेगळ्या अंगाने अलीकडे घेत असल्याचे लक्षात येते. म्हणूनच हा प्रबंध पुस्तकरूपात येताना समष्टी होऊन यायला हवा होता अशी अपेक्षा करता येते. मात्र तरीही हा प्रबंध- म्हणजेच ‘उत्तर- आधुनिकता आणि मराठी कविता’ हा ग्रंथ विशेष परिश्रमाने, मुलभूत संदर्भांसह, समीक्षात्मक परिमाण युक्ततेने सिध्द झाला आहे, हे हा ग्रंथ अभ्यासताना तज्ज्ञ वाचकांच्या लक्षात येईल.
नामदेव ढसाळ यांची ज्येष्ठता वगळता बाकी कवी हे समकालीन म्हणजे जवळपास समवयोगटात बसणारे आहेत. ढसाळांव्यतिरिक्त अजून काही अलक्षित कवी यात समाविष्ट असायला हवे होते असे प्रकर्षाने वाटू शकते. उपयोजित ठळक व्याख्यांशिवाय ‘…दलित साहित्यातील विद्रोही विचार हा खऱ्या अर्थाने उत्तर-आधुनिक जाणिवेचा ठरतो...’ (पृ. ६०) अशीही (खुद्द अभ्यासीची) एक व्याख्या या पुस्तकात आली असल्याने असे वाटणे साहजिक आहे. मराठीत प्रचंड म्हणता येईल अशी विद्रोही कविता लिहिली गेली, लिहिली जात आहे. तसेच विद्रोही म्हणता येईल अशी कविता फक्त दलित कवींनीच लिहिली नसून अनेकार्थाने (केवळ भाषिक अंगानेच नव्हे) मराठीत रूळली आहे. म्हणून पुस्तकात उपयोजित केलेले कवीच फक्त उत्तर- आधुनिक जाणिवेचे कवी ठरतात असे म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ, विलास सारंग उत्तर- आधुनिक कवी नाहीत का?
ह्या पुस्तकातील दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या प्रकरणांत अनुक्रमे उत्तर आधुनिक कवितेची ओळख करून देण्यासाठी, प्रत्यक्ष उपयोजनासाठी व आशयाच्या भाषाभिव्यक्तीसाठी याच आठ कवींच्या कवितेची उदाहरणे पुन्हा येत राहतात. यासाठी अन्य काही कवींचीही उदाहरणे वाचकाला अपेक्षित असू शकतात, अशीही शक्यता आहेच. ह्या तीन प्रकरणात या आठ कवींव्यतिरिक्त प्रकरणनिहाय उपयोजनासाठी अजून इतर कवींचा विचार झाला असता तर मराठी समीक्षेतील प्रातिनिधीक ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे संदर्भमूल्य अजून कितीतरी पटींनी वाढले असते.
यातल्या (नामदेव ढसाळ वगळता सात कवींच्या) बहुतांश कवितांत जवळपास ५० टक्के शब्द आणि काही वाक्य- ओळीही इंग्रजी आढळतात. जे इंग्रजी शब्द मराठीत रूळलेत ते ठीक, पण जे रूळले नाहीत ते नव्याने मराठीत रूळवण्याचा प्रयत्न होतोय का? केवळ ‘संगणक युगातील प्रतिमा’ वापरून वा ‘मॉल संस्कृतीवर लिहून’ उत्तर- आधुनिक जाणिवा कवितेत दिसून येतील का? केवळ मराठी व्याकरण चालवत इंग्रजी लिहिणे म्हणजे मराठी कविता उत्तर-आधुनिकतेत उडी घेईल का? ‘बोलीत अभिव्यक्त होणारे साहित्य उत्तर- आधुनिकतेशी जास्त जोडलेले असेल’ (पृ. १५७) तर आपल्या भाषेतून- बोलीतून आविष्कृत होऊनही कवितेत उत्तर आधुनिकता का दिसू नये? या व्याख्येच्या उपयोजनेसाठी मराठीतल्या काही प्रमुख बोलीभाषेंतल्या कविताही इथे उपयोजित करता येऊ शकल्या असत्या. (उत्तर- आधुनिकतेत व्यक्त होणाऱ्या कवीला- विशेषत: त्याच्या कवितेला स्वत:ची ओळख- Identity नाही, अनेक आवाजात ही कविता बोलते, हे साहजिक होत आहे की ओढूनताणून, हेही बघावे लागणार.)
कवींनी त्यांच्या कवितेत उत्तर आधुनिकतेची भूमिका ठरवून घेतली आहे काय? अथवा ठरवून नव्वदोत्तरी भूमिका घेत- गाजावाजा करत आपली कविता मिरवली आहे काय? अशा शंका अभ्यासीने उपस्थित करून तसे विवेचन- उपयोजन या ग्रंथात व्हायला हवे होते का? हो, नक्कीच व्हायला हवे होते. यात कवी म्हणून सर्व पुरूष आहेत. उत्तर- आधुनिक जीवन जाणिवांत समावेश करता येईल अशी एकही महिला कवी- कवयित्री महाराष्ट्रात सापडणार नाही का? स्वत: डॉ. मीनाक्षी पाटील यांच्या काही कवितांत उत्तर- आधुनिक जीवन- जाणिवा दिसतात. अभ्यासी (ग्रंथाच्या लेखिका, जसे, पुरूष- अभ्यासक, स्त्री- अभ्यासी) स्वत: आपल्या कवितांचा आपल्या संशोधनात समावेश करणार नाही हे खरे, पण अन्य कवी असलेल्या महिलांचा या ग्रंथात समावेश व्हायला हवा होता असे वाटते. उदाहरणार्थ, मल्लिका अमरशेख.
घोळक्यात वा कळपात नसलेल्या कवींचे काय करायचे? म्हणजे जे स्वत: स्वतंत्र विचारसरणीचे नियतकालिक काढून- संप्रदाय तयार करत नाहीत, मठ- पीठ चालवत नाहीत. ‘एकला चलो रे’ म्हणत कोपऱ्यात राहून स्वजीवन- जाणिवेतून तत्त्वनिष्ठता पाळत लिहीत असतील त्यांची दखल कशी घेतली जाईल? अथवा याच काळात- एकोणावीसशे नव्वदपासून आतापर्यंत कविता लिहीत असूनही संग्रहरूपी उपलब्ध नाहीत (अथवा आता उशीरा प्रकाशित होत असतील) अशा कवींच्या कविताही उत्तर- आधुनिक युगजाणिवेच्या असू शकतात. केवळ पुस्तक रूपाने अवतरली तरच अशा कवितेची दखल घेतली जाईल का, वगैरे शंका निर्माण होत राहतील.
तत्कालीन युगजाणिवांसंदर्भात कलासमीक्षक द. ग. गोडसे यांच्या म्हणण्यानुसार, विशिष्ट जीवन जाणिवांचा ‘वारा प्यालेल्या’ कलावंताला या जीवन जाणिवा प्रतीत होतात आणि तो त्या जाणिवांत कलाविष्कार आविष्कृत करण्याचा प्रयत्न करतो. बाकी प्रतिभावंत मात्र परंपरेच्या जीवन जाणिवांतच व्यक्त होत राहतात. उत्तर- आधुनिकतेच्या आताच्या युगजाणिवेबद्दल असेच म्हणता येईल. साहित्यातल्या वा कलेतल्या उत्तर आधुनिकतेला भारतात आज काही विचारवंतांचा विरोध आहे. अजून आपल्या देशात आधुनिकताही रूळली नाही तर उत्तर आधुनिकता कशी येईल? असेही काही आक्षेप घेतले जातात.
मात्र तरीही जागतिक पातळीवर उत्तर आधुनिकता म्हणजे नेमके काय, हे मराठीत यापुढे कोणाला मुळातून समजून घ्यायचे असेल, त्यांच्यासाठी समीक्षेतील हा अतिशय महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ ठरणार आहे. कवितेतील उत्तर- आधुनिक युगजाणिवांचा महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे स्वागत आहे. ग्रंथाला सलील वाघ यांनी केलेले मुखपृष्ठ लक्षवेधी आहे.
(हा समीक्षा-लेख दोन भागात, दोन नियतकालिकांत प्रकाशित झाला आहे. इथे एकत्रित लेख. ‘अभिधा नंतर’, दिवाळी अंक, २०२४ व ‘मुक्त-संवाद’, नियतकालिक, ऑगस्ट २०२४. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/