- डॉ. सुधीर रा. देवरे
(१ ऑक्टोबरच्या लेखाचा पुढील भाग...)
लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या नात्यांचा वेध जवळपास चाळीस टिपणांतून या ग्रंथात (लोक आणि अभिजात) घेतला असून लोकगीते, लोककथा, म्हणी, वाक्प्रचार, श्रध्दा- समजूती आदींतून आलेली अभिजातता कशी आविष्कृत होते, याचा अवकाश शोध (काही प्रमाणात दुरूस्त करून वा जास्तीची भर घालून) महत्वपूर्ण ठरतो. अभिजात अशा अनेक साहित्यकृतींतून लोकजीवनाचा अनुबंध कसा आविष्कृत होतो हे या शोधातून तपासून पाहिलं जातं. संशोधन, समीक्षा, ललित, आस्वाद, संवेदनशीलतेची सूक्ष्मता आदी लेखनाची एकात्मता या लेखांतून होत राहते आणि शेवटी अर्थांचा अवकाश उलगडून दाखवण्यात येतो. लोकसंस्कृतीतून घेतलेला अशा प्रकारचा हा अभिजात शोध ठरावा हे नक्की.
लोकोक्तीकडून कवितेकडे, आख्यानातून लोककथेकडे, वाक्प्रचारातून पारंपरिक गोष्टींकडे अशी सहज वाट बदलण्याचा प्रयोग या ललित लिखाणातल्या प्रवासात होत राहतो. कथा, कादंबरी, कविता, दोहे, ओव्या, अभंग आदी सर्व प्रकारच्या अभिजात साहित्याची तुलना लोकजीवनातील आविष्कारांशी केली आहे. म्हणून हे लिखाण संदर्भसंपृक्ततेचा आणि संदर्भसंपन्नतेचा आनंद देतं.
पु.
शि. रेगे यांच्या ‘मनवा’ या कथासंग्रहात भेटलेली
बिंदूची तुलना लोकगीतातील राधेशी केली जाते. गोंदणवाल्याकडून आपल्या छातीवर मोर
गोंदवून घेताना तिला भर बाजारात जराही संकोच वाटत नाही, कारण
ही लोकसंस्कृती आहे. (म्हणून सार्वजनिक ठिकाणीही एखादी ग्रामीण महिला आपल्या
बाळाला आजही सहज स्तनपान देऊ शकते.) बा. भ. बोरकर, केशवसुत, भा. रा. तांबे, नारायण सुर्वे, ग्रेस, पु. शि. रेगे,
बालकवींसारख्या कवींच्या कविता वाचून ‘बाळपणीचा परिकथांमधला
स्वर्गीय सुंदरीचा कल्पनाबंध एका नव्या अर्थपूर्ण रूपात भेटणे’ आणि जाणिवेच्या कक्षा आपोआप विस्तारत नेणं, कुठं
एखाद्या लोककथेचा अंश जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेत दिसणं,
असे या लिखाणात अचंबीत करणारे धागे जोडण्याची कला सहज घडत राहते. संत चरित्रातील
स्त्रियांचं दुःख, महाभारतीय परंपरेतल्या नल- दमयंती कथेतली
स्त्री, लोकजीवनातील स्त्री आदींची दुःखाची भाषा एकच असते, असं लोकपरंपरेतील योग्य त्या संदर्भांसहीत, संयत
शब्दशैलीत या लिखाणात अधोरेखित केलं जातं.
‘सोमवारची
कहाणी’तलं वेळूचं बेट, अर्ध्या घटकेची
माहेरं, ‘उंबरघाट ओलांडणं कठीण रे
बाबा!’, भद्रा एखादीच बाकी सगळ्या जइता! अंगठीची खूण, लोककथेतल्या साळुंकीनं पिवळे पाय नाचवणं, वीरप्पा
धनगरी देवाची कथा आदी गोष्टींचा वेध घेत निष्कर्ष मांडले जातात. वीरप्पाचं धनगरी
गाणं म्हणजे मातृदेवांच्या प्रतिनिधी असलेल्या स्त्रियांची आठवण, अनुषंगानं नारायण सुर्वेंची ‘मास्तर तुमचंच नाव
लिवा’ कविता; या सगळ्या मूलगामी
चिंतनात लोक आणि अभिजातता एकमेकांत मिसळून जातात.
वामन पंडितांनी
बासरीसाठी ‘नादनटी’ हे विशेषण
वापरण्याची आठवण इथं मुद्दाम नमूद केली जाते. ‘वासावर येणं’ वाक्प्रचार, वयात येण्याचा वासाशी असलेला बंध, द्रौपदीच्या देह गंधाची विलक्षणता, संस्कृतीच्या
गाभ्यातच तो विलक्षण मधुर वास दरवळणं, तांब्यांची कविता,
निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, शरदबाबूंची नायिका, लक्ष्मी, ‘तिसरी कसम’ सिनेमातला महुआ घटवारनका घाट, भोळाभाबडा हिरामण गाडीवान- राजकपूर, नौटंकीत
नाचणाऱ्या हिराबाई- वहिदा रहेमान, पुराणकथा असे भेटतील तिथून
सगळे संदर्भ गोळा होत, विविध पातळ्यांवर उड्या घेत लिखाणात
निष्कर्ष नैसर्गिकपणे उपयोजित होत राहतात.
लोकांच्या नेहमीच्या बोलीत, म्हणींत, वाक्प्रचारांत आणि मनमोकळ्या गीतांत त्यांच्या भावनेचं (भावन) प्रतिबिंब पडत असतं. अभिजात कवींनी, लेखकांनी ज्या हृद्यपणे आणि सूक्ष्मपणे या ‘भावन’ला वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त केलं आहे, त्यापेक्षा वेगळं वास्तव आणि अधिक ठोस असं रूप लोकपरंपरेत दिसत असतं, हेही इथं मुद्दाम नमूद करावं लागेल.
‘आठवणींतले आंगण’ या लेखसंग्रहात विविध नियतकालिकांत आधीच प्रकाशित झालेले एकूण वीस लेख समाविष्ट झाले आहेत. कहाण्या, पोवाडा, जागरण, विधी नाट्य, दशावतार, लोकदैवतं, लोकगीतांतील स्त्री दर्शन, मरणसोहळा, पुराण, दासबोध, रामदास, कीर्तन परंपरा, नारदीय कीर्तन, नारायण वामन टिळक यांचं कीर्तन आदींवर प्रासादिक लिखाण या संग्रहात वाचायला मिळतं. पण लोकसाहित्यात चर्चा होणारे हे नेहमीचेच विषय आहेत. पिंगुळी, बाहुल्या, चित्रकथी अशा मोजक्याच तीन आदिवासी परंपरांवर लिखाण या पुस्तकात येतं, तेही अनेकदा चर्चेत येऊन गेलेलं वा उपयोजित झालेलं.
म्हणून या लिखाणात लोकसंस्कृतीतील अंधाऱ्या कोपऱ्यांवर जाणीवपूर्वक प्रकाश पडत नाही, असं दिसून येतं. लोकसाहित्यातील अंधारे कोपरे उजळून निघताना इथं दिसत नाहीत- नवीन कंगोऱ्यांवर प्रकाश पडत नाही. ‘अंधारे कोपरे’ हा मूळ शब्दसमूह तारा भवाळकर यांचा आहे. मी संपादित केलेल्या अहिराणी ‘ढोल’ नियतकालिकातील माझं ‘अहिराणी लोकपरंपरा’ हे सदर वाचून (आता पुस्तक स्वरूपात उपलब्ध) त्यांनी एकदा पत्र लिहीलं होतं, या पत्रात त्यांनी हा शब्द उपयोजित केला होता. पत्रातील त्यांचं मूळ वाक्य असं : ‘‘तुमच्या लिखाणात आतापर्यंत लोकसंस्कृतीतल्या राहून गेलेल्या अंधाऱ्या कोपऱ्यांवर उजेड पडताना दिसतो.’’ म्हणून हे अंधारे कोपरे पूर्णत: प्रकाशमय झाले नाहीत तरी हरकत नाही, पण असे काही किरण कुठं तरी पडायला हवेत.
आतापर्यंत कानाकोपऱ्यातलं जे लोकसाहित्य उजेडात आलं नाही, ते बाहेर खेचून आणण्याचा प्रयत्न या पुस्तकांतल्या लेखांत दिसून येत नाही. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांच्यावर एक लेख (आठवणींतले आंगण) पुस्तकात आला असला तरी यापेक्षा जास्त असा आदिवासी लोकसंस्कृतीचा स्पर्श पुस्तकातल्या लेखांत झालेला नाही. कमी अधिक प्रमाणात ‘लोक आणि अभिजात’ या ग्रंथातही असंच चित्र पहायला मिळतं, याचीही नोंद घेणं इथं आवश्यक वाटतं. मुख्य प्रवाहातील केवळ चाकोरीबध्द लोकसाहित्याचा विचार या पुस्तकात जास्तकरून आला आहे. तरीही आस्वाद, परस्पर अनुबंध आणि लिखाणातील लालित्यामुळं हे लिखाण महत्वाचं ठरतं.
वेळोवेळी दिवाळी अंक वा नियतकालिकांसाठी मागवलेल्या लेखांचा तसंच वृत्तपत्रांतून आलेल्या सदरांचं नंतर संग्रहरूपी पुस्तकं प्रकाशित झाल्यानं पुस्तकांना लोकसाहित्याचं विशिष्ट सूत्र असूनही या सुसूत्रतेत काही प्रमाणात विस्कळीतपणा जाणवल्याशिवाय रहात नाही. पुस्तकं प्रकाशित करताना लेखांचं संपादन केल्यामुळं हा विस्कळीतपणा काही प्रमाणात कमी झाला आहे हे नक्की.
याचा अर्थ या लिखाणात हे दोष आहेत, असं मात्र मुळीच नाही. लेखकाचा परिवेश लेखकाला घडवत असतो. आपल्या परिवेशात येणारं दर्शनच लेखक चित्रित वा उपयोजित करीत असतो. म्हणून अहिराणी- ग्रामीण भागात बालपण गेलेला मी जसा मंगळागौरवर (इकडे मंगळागौर होत नाही) खूप लिहू शकणार नाही, तीच अडचण आदिवासींच्या ‘डोंगर देवा’वर लिहिताना अरूणाताईंना येऊ शकते. म्हणून अमूक एका लोकसाहित्य अभ्यासकानं सर्वच क्षेत्रातील लोकसाहित्यावर अधिकारानं लिहिलंच पाहिजे असा आग्रह कोणी धरणार नाही. असा आग्रह धरणं अप्रस्तुत ठरेल.
‘कवितेच्या शोधात’ हे पुस्तक व्यापक अर्थानं कवितेचा शोध घेणारंच आहे. यातले लेखसुद्धा निमित्तानिमित्तानं लिहिलेले आहेत. कवी, कविता, अभंग, ओव्या यांसोबत क्वचित लोकगीतं- लोककथाही या पुस्तकात उपयोजित झाले आहेत. सामाजिक- सांस्कृतिक जीवनातून आलेले काही सुंदर विचार यात समाविष्ट आहेत. लेखसंग्रहात एकूण वीस लेखांचा समावेश असून हे लेख वेळोवेळी वेगवेगळ्या कारणानं लिहिलेले आहेत. पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्याआधी काही परिष्करणं केलेली असली तरी या पुस्तकाचंही एकूण सूत्र विस्कळीत वाटतं.
यात लोकपरंपरा मोजक्याच
लेखात उपयोजित झालेल्या आढळतात. ‘मोराचे अश्रू’, ‘नामदेवाचे लग्न’, ‘रेणुकेचे गाणे’, ‘निळावंतीची
लावणी’, ‘सोनू आणि गौरा’, ‘दृष्ट हिला लागली’ अशा केवळ
पाच- सहा लेखात लोकसंस्कृतीचे पडसाद उमटतात. ‘नामदेवाचे लग्न’ हा लेख संत नामदेवांच्या बालपणीच्या दंतकथेवर- एक लोककथा- लोकगीतावर
आधारीत आहे. ‘रेणुकेचे गाणे’ हा
लेखसुद्धा लोकगीताचा आस्वाद आहे. ‘निळावंतीची लावणी’, ‘सोनू आणि गौरा’, ‘दृष्ट हिला लागली’ आदी कथा- गीत- लावणी-
काव्यांविषयीचे लेख ‘लोक आणि अभिजात’
या ग्रंथातल्या लेखांना साजेसे- समांतर ठरावेत असे हे लेख आहेत. परंतु ‘लोक आणि अभिजात’ या ग्रंथात जी संदर्भसंपृक्तता
दिसते, तितकी इथं दिसून येत नाही. ‘मोराची
कथा’ (लोककथा) आणि ‘हयवदन’ नाटक (अभिजात) यांचा अनुबंध इथं तपासून पहायचा प्रयत्न झालेला आहे, पण तो वरवरचा- ओझरता उल्लेख केल्यासारखा.
लोककथेतल्या वा
लोकगीतातल्याच नव्हे तर कवितेतल्या आणि संतसाहित्यातीलही समग्र महिला वर्ग अरुणा
ढेरे यांच्या चिंतनाचा विषय होतो, हे या पुस्तकातूनही दिसून
येतं. तिन्हीही पुस्तकांच्या गोळाबेरजेतून शालिन, सोशिक, निष्कपटी, सरळ आणि साध्यासुध्या ग्रामीण- आदिवासी
बायांबद्दलची लेखिकेची समंजस अनुकंपा वाचकांकडूनही प्रतिसाद मागते. त्यांच्या इतर
पुस्तकांप्रमाणे या पुस्तकातही ओळीओळीतले शब्दलालित्य,
नादलालित्य भुरळ घालते. विवेचनाची साधी सोपी भाषा कायम रसाळ आणि प्रसादिक राहते. ‘कवितेच्या शोधात’ हे पुस्तक कवितेच्या रसग्रहणावर-
आस्वादात्मकतेवर असलं तरी काही लेखांत लोकश्रद्धा, लोकजाणिवा, लोकजीवन अधोरेखित होताना दिसलं. म्हणून वरील दोन पुस्तकांच्या सोबत या
पुस्तकाचाही या लेखासाठी विचार केला.
भारतीय वाड्.मयातील स्त्रीचा संघर्ष, समर्पण, सोशीकपणा, पुरूषाच्या अधीन असणं आणि बंडखोरीही डॉ. अरूणा ढेरे यांच्या चिंतनाचा विषय ठरतो. लोकजीवनाचा धांडोळा घेत असताना भारतीय स्त्रीचं हे जगणं त्या अधोरेखित करतात. डॉ. रामचंद्र चिंतामन ढेरे यांच्या पितृछायेत वाढलेल्या आणि संशोधनाचे बाळकडू मिळालेल्या अरूणा या लोकसाहित्य- लोकसंस्कृतीच्या वाटेवरून चालताना, संशोधनासोबत थेट चिंतन करताना, आपली ललित रसाळ भाषा कधीही सोडत नाहीत. हा सर्व विचार म्हणजे डॉ. रा. चिं. ढेरे यांचं संशोधन कार्य पुढं घेऊन जाण्याचं व्रत आहे आणि तो विडा त्यांनी यशस्वीपणे उचललेला दिसतो.
डॉ. रा. चिं. ढेरे हे लहानपणी एका खेड्यातून पुण्यात स्थायिक झाले. मात्र त्यांनी आपली ग्रामीण नाळ लोकसंस्कृतीपासून तुटू दिली नाही. पुढच्या पिढीच्या अरूणाताईंनीही परंपरेची ही नाळ घट्ट जोडून घेतलेली दिसते. म्हणूनच त्या, या सर्व घटनांच्या अभ्यासू साक्षीदार ठरतात. वडिलांसोबत ग्रामीण सांस्कृतिक प्रवासाच्या भेटी गाठीत त्यांनी या जीवन- जाणिवा आपल्यात खोल रूजू दिल्या आणि पुढं आपल्या स्वतंत्र विचारसरणीतून ते आपल्या लिखाणात त्या उपयोजित करू शकल्या.
डॉ. अरूणा ढेरे यांचं हे लिखाण काही अंशी संशोधनात्मक म्हणता येईल. त्यापेक्षा समीक्षणात्मकही म्हणता येईल. आस्वादात्मक म्हणता येईल आणि ललितही म्हणता येईल, असं त्यांच्या लोकसाहित्यावरच्या लिखाणाच्या एकूण स्वरूपावरून लक्षात येतं. त्यांच्या लिखाणाची धाटणी साधी सोपी असून संशोधनात्मक अशा एखाद्या मांडणीतल्या आपल्या विशिष्ट प्रतिपादनावर त्या आग्रही वा ठाम विधान करत नाहीत. चिंतनातून शोधता शोधता गवसलेल्या कलात्मक सत्यात त्या वाचकालाही सहज सहभागी करून घेतात. समन्वयवादी विचार, अनाग्रही शैली आणि सहमतीदर्शक प्रवाही संवाद यामुळं हे लिखाण अतिशय प्रसादिक होत जातं. म्हणूनच त्यांची या लिखाणातील प्रासादिक ललितबंध अधोरेखित करणारी काही निवडक अवतरणं मुळातून वाचावीत अशी आहेत.
(या विषयासाठी ‘लोक आणि अभिजात’, ‘आठवणींतले आंगण’, ‘कवितेच्या शोधात’ ही तीन पुस्तकं उपलब्ध झाली. ‘कृष्णकिनारा’ ह्या पुस्तकाचाही शोध घेतला, पण ते वेळेवर उपलब्ध होऊ शकलं नाही.)
संदर्भ ग्रंथांची सूची :
1. लोक आणि अभिजात - डॉ. अरुणा ढेरे, ११ जानेवारी २०१९, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
2. आठवणीतले आंगण - डॉ. अरूणा ढेरे, १६ ऑगष्ट १९९९, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
3. कवितेच्या शोधात - डॉ. अरूणा ढेरे, जानेवारी २०१९, अभिजित प्रकाशन, पुणे.
4. कला आणि संस्कृती : एक समन्वय - डॉ. सुधीर रा. देवरे, ३ जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.
5. लोकधाटी - द. ग. गोडसे, १९७९, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
6. मातावळ - द. ग. गोडसे, १९८१, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
7. ‘ढोल’ नियतकालिक, अहिराणी - अंक क्रमांक १, २, ३, ४, ५ ; संपादक - डॉ. सुधीर रा. देवरे, सटाणा.
(लेख पूर्ण. ‘साहित्य : जाणिवा, मीमांसा आणि समीक्षा’ या ग्रंथातल्या दीर्घ लेखाचा तिसरा आणि शेवटचा भाग. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/