गुरुवार, १ जुलै, २०२१

खडकफूल

 

 - डॉ. सुधीर रा. देवरे

        

            घरात काळा समार (मसाला) करायचा झाला तर लहानपणापासून कानावर पडलेलं एक नाव, खडकफूल. खडकफूल हा मसाल्यातल्या पदार्थातला एक घटक आहे. हा पदार्थ मला खूप आवडतो.  तो आवडण्याचं कारण त्याच्या रंगामुळं नाही, गंधामुळं नाही, चवीमुळं नाही की त्याच्या आकारामुळंही नाही. हा पदार्थ मला आवडतो त्याच्या विशिष्ट अशा खडकाळ नावामुळं. (आणि हाताला लागणार्‍या त्याच्या मुलायम स्पर्शामुळं.) हा पदार्थ दिसायला एकदम फुलासारखाच. या फुलाची एक बाजू पांढरी तर दुसरी बाजू काळी. खडकसदृश्य. (प्रत्येक माणसालासुध्दा अशा दोन बाजू असतात. कोणाला आपण आपल्या पांढर्‍या बाजूनं माहीत असतो, तर कोणी कायम आपली काळी बाजू लोकांना सांगत राहतो.) खडकफुलाची अशी ही काळी- पांढरी बाजू लांबून पाहिली तर हे एखादं फुलपाखरु आहे की काय असं वाटावं.  

            खडकफूल!’ हे नाव म्हणजे खडक आणि फूल या दोन परस्परविरुध्द शब्दांचा संयुक्‍त शब्दप्रयोग. मसाल्यासारख्या तिखट आणि उग्र पदार्थातील एक घटक असलेल्या ह्या फुलाला ज्यानं कोणी खडकफूल हे सामान्यनाम (का विशेषनाम) बहाल केलं असेल त्याच्या बुध्दीची नेहमीच कमाल वाटत आली. हे नाव ठेवणार्‍या या अज्ञात व्यक्‍तीबद्दल मला एखाद्या प्रेषिताबद्दल वाटावं असं प्रेम वाटतं.

            खडक म्हणजे चक्क पाषाणच. पाषाण हृदयी माणसासारखा खडक. आणि फूल म्हणजे निव्वळ फुलच - फूल ही उपमा देता येईल अशी क्ष नावाची कोमल व्यक्ती समोर उभी राहील अशी संज्ञा.

            खडकफुलाचा वास हवाहवासा वा सुखद आहे, असं मात्र मुळीच नाही. तरी हे फूल दिसतं तेव्हा प्रत्येक वेळी त्याचा वास घेऊन पहातो.  छाती भरभरुन वा फुप्फुस भरभरुन खडकफुलाचा गंध घेत बेभान होतो खूप खोल आतल्या अंत:र्नादात.

            का कोण जाणे पण खडकफूल हे मला माझं जितं जागतं प्रतीकच वाटतं. यदाकदाचित आत्मकथन कधीतरी लिहिलंच, तर त्याचं नाव खडकफूल असं ठेवणार. का, ते मात्र आत्मचरित्रातच नमूद करीन. (असं हा लेख पहिल्यांदा जेव्हा केव्हा मी लिहिला होता तेव्हा त्या वहीत लिहून ठेवलं आहे. खडकफूल वरचं हे छोटंसं टिपण १९९० च्या दरम्यान केव्हातरी लिहिलं असावं. तेव्हा आत्मकथन प्रकाशित झालं नव्हतं. आता दोन आत्मकथनं प्रकाशित असूनही त्यांची नावं खडकफूल ठेवलेलं नाही. कारण हे कायम आठवत असलं तरी आत्मकथनं वेगळ्याच कारणानं लिहीली आहेत. त्यामुळं हे नाव पुस्तकाला देता येत नव्हतं. कदाचित खडकफूल नावाचं माझं पुस्तक येईलही कधीतरी या पुढं. नक्की सांगता येत नाही.)

            खडक आणि फूल.  हे कट्टर परस्पर विरुध्द शब्द वा संज्ञा. तरीही एकाच संज्ञेत गुण्यागोविंदानं नांदतात. मग आपणच काबर केवळ फूल अथवा खडकच राहतो एकेकटं युगानुयुगं! आपण एखाद्या माणसाला एकतर खडक ठरवून मोकळं होतो, अथवा फूल’. पण खडकाची दुसरी बाजू फूलआणि फुलाची दुसरी बाजू खडक असू शकते हे गृहीत धरुन का चालू नये? म्हणजे वेळ येताच अपेक्षाभंग होत नाही.

        - आपल्याला खडकफूल सारखं प्रणामी होता येणारच नाही का आयुष्यात!

          (लिखाण : 1990. अप्रकाशित लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

          © डॉ. सुधीर रा. देवरे

          ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा