- डॉ. सुधीर रा. देवरे
(मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाकडून लवकरच प्रकाशित होत असलेल्या ‘...सहज उडत
राहिलो’ या माझ्या आत्मकथनातून...)
मी
तसा आज आमच्या विरगावपासून
खूप लांबवर राहतो असे नाही. मी स्थायिक
झालेल्या सटाण्यापासून अवघ्या दहा किमी अंतरावर विरगाव आहे. तरीही
विरगावातल्या आठवणींनी मी व्याकुळ होतो. आज मनात आले
तेव्हा मी दहा मिनिटात विरगावला जाऊन येऊ शकतो. मात्र
बालपणीचे हरवलेले दिवस आज विरगावला जाऊनही सापडत नाहीत, हे
माझं खरं दु:खं आहे. बालपणी
विरगावात मित्रांसोबत जे दिवस घालवले ते पुन्हा येणे आज शक्य नाही. गाव
तेच असले तरी बालपणीचे मित्र दूर गेले आहेत. जे विरगावात
आहेत ते आपल्या संसारात इतके तुंडुब बुडालेले आहेत की तासभर बसून त्यांच्यांशी
गप्पाही मारता येत नाहीत. माझ्या
गावच्या बालपणीच्या खाणाखुणा आज सुधारणेच्या नावाखाली सिमेंट काँक्रेट खाली
गाडल्या गेल्यात त्या कायमच्या. मी आता
जुन्या आठवणींची उंचबळून गावाशी नाळ जोडायला जाऊ पाहतो. पण
हाती विशेष काही लागत नाही आणि तसाच परतून येतो रिक्त हातांनी.
गावात
वडिलांच्या वाट्याला रहायला घर आले नाही म्हणून आम्ही भाड्याच्या घरात रहायचो. गावात घर स्वस्तात
मिळते म्हणून मधरी आंधळी नावाने ओळखल्या जाणार्या व गावात भूताळीन म्हणून परिचित असणार्या बाईकडून वडिलांनी घर विकत घेतले, तेव्हा
मी खूप लहान होतो. तरीही भुताळीनचे घर म्हणून वडिलांनी केलेले अंध्दश्रध्दाळू उपाय मला
अजूनही जसेच्या तसे आठवतात. मांत्रिकाला
बोलवून घोड्याच्या नाला मंत्रून व चांभारपाणी देऊन बनवलेले नाग खिळे घराच्या
दोन्ही दारांना ठोकण्यापासून घराच्या चारी कोपर्यांना अंडे, िलंबू व गावठी दारूच्या बाटल्या बुजण्यापर्यंतच्या सर्व बारीक-सारीक
बाबी आठवतात. भगताने नदीतली वाळू मंत्रून घरात सर्वत्र टाकली होती.
घराच्या
बाजूलाच उतार उतरून गेलं की कान्हेरी नदी होती. तेव्हा
ती बाराही महिने पाण्याने वहायची. माझ्या अनेक
मित्रांबरोबर मी नदीवर अंघोळीला जात असे. केव्हा बंधार्यात, केव्हा
टाकळीत, केव्हा पाटात, केव्हा
चुहेलीत तर पूर येऊन गेल्यावर नदीतच आम्ही अंघोळ करत असू. अनायासे
भील लोक मासे व खेकडी कसे पकडतात
याचेही अवलोकन होत होतं.
भोवरा, गोट्यागोट्या, टिपाटिपी, कबड्डी, चिलापाटी, लपालपी, घोडाघोडी, हत्तीची
सोंड, विटीदांडू, डिबडिब, कोयीकोयी, आंधळी
कोशींबीर असे अनेक खेळ आम्ही दाराशीच खेळत असू. अपंग असूनही सर्वसाधारण मित्रपरिवारामुळे मी लहानपणी मैदानी
खेळही खेळू शकलो. दारासमोर मराठी शाळा व तिचे विस्तृत पटांगण होतं. त्याला
लागूनच मारोतीचा पार होता. अशा प्रचंड
जागेचा पुरेपुर उपयोग आम्ही खेळासाठी करीत होतो.
कानबाई, रानबाई, गौराई, काठीकवाडी, आईभवानी, आसरा, खंडोबा, आढीजागरण, म्हसोबा, रोकडोबा, वीरदेव
हे लोकदेव गावाच्या
आजूबाजूला पहात होतो. त्यांचे उत्सव पहात होतो. उग्र
उपासना अनुभवत होतो. गोंधळी, मरीआई, वासुदेव, रायरंग, नंदीबैलवाले, टिंगरीवाले, नाव
ओळखणारे, नाथबोवा, गारूडी, डोंबारी, यांच्या
कला- नकला, आवाज, गाणे, वाद्य
ऐकून नकळत एक स्वतंत्र दृष्टी तयार होत होती. हे
विश्व वेगळे आहे, आदिम आहे आणि आपण त्यात संमोहीत होऊन आकर्षिले जात आहोत, याची
जाण मला तेव्हाही असे. डोंगर्यादेवाचा उत्सव असो, चिरा
बसवण्याचा कार्यक्रम असो, धोंड्या
होऊन पाणी मागण्याचा कार्यक्रम असो, आखाजीचा बार
असो की तोंड पाहण्याचा कार्यक्रम असो. कुठे भजन
असो वा कीर्तन, राजकीय प्रचाराची सभा असो वा कलापथक, गावातील
भारूडांचा कार्यक्रम असो की तमाशा, स्वाध्याय
असो की सर्कस अशा सर्व गावसभा, गाव
कार्यक्रम वा आदिवासी लोकोत्सव असो दिवसभर तहानभूक विसरून मी भावनिकदृष्ट्या त्यात
सामील झालेलो असायचो. विरगावला भोवाडा हा लोकोत्सव सलग तीन
रात्रभर चालत असे. दिवसा अजिबात झोप न घेता मी सलग तीन
रात्री जागून संपूर्ण भोवाडा पाहत असे. खंडोबाचा
आढीजागरण कार्यक्रम असाच रात्रभर चालत असे. आखाजीचा बार
व झोक्यावरची गाणी, आषाढी अमावस्येला विरगावातील पद्मनाभ
स्वामी समाधीत एक लळित होत असे. जेवनखावन
विसरून मी तो कार्यक्रम पूर्ण पाहात असे. मन हरखून
जात असे. सर्व लोककलांची अस्सलता त्या बालवयातही
लक्षात येत होती.
आमच्या
घरापासून हाकेच्या अंतरावर भिलाटी होती, तेथील सर्व
सांस्कृतिक कार्यक्रमांना माझी हजेरी असायची. भिलाटीत
लग्न असो, डोंगर्या देवाचा उत्सव, थाळीवरची
कथा, लग्नातील ढोलावरचे नाच, पावरी
गीते, भिलाटीतील होळी नृत्य, खंजिरी, तुणतुणे, सांबळ
ह्या वाद्यांच्या सानिध्यात अशीच रात्र रात्र जागून ऐकत-पहात
असे.
विरगावातले
हे विश्व सोडून दूर शहरात गेल्यानंतर आदिवासी लोककलांचे महत्व मला जास्तच जाणवू
लागले. त्यांच्यातील
नैसर्गिकता आणि सहजता यांची ओढ वाटू लागली. आदिवासी
जीवन जाणिवांच्या कला ह्या काळाला पुरून उरणार्या आहेत, याचा
साक्षात्कार झाला आणि लहानपणी प्रत्यक्ष अनुभवलेले कागदावर हळूहळू उतरायला लागलं. माझ्या शोधनिबंधात याचे स्पष्ट
प्रतिबिंब पडलेले दिसेल. म्हणूनच माझ्या प्रबंध लेखनाबरोबरच कथा, कविता, कादंबरी आणि नाटकातही आदिवासी जीवनबंधाचे
प्रतिबिंब पडलेले दिसते.
ह्या
सगळ्या गोष्टींबरोबर निसर्गही माझा तेवढाच आवडीचा होता. मला
विंचू अनेकदा डसला आहे. गांधील माशा डसल्या आहेत. अंगावर
थोर नावाची वनस्पती उभरली आहे. जीवंत
सापाला माझा स्पर्श झाला आहे. मी
काडीपेटीत पिठ टाकून भिंग नावाचा किडा पाळला आहे. कोंबड्या, पारवे
पाळून पाहिलेत. उंदरं पकडून एका जागी बंद करून पाहिले, मांजर
पाळून पाहिली. गळाने सरडे पकडले आहेत. नदीत
हाताने बेडक्या पकडल्या आहेत. चिमण्या
पकडल्या आहेत. चिमण्यांना
रंग देऊन पुन्हा मोकळ्या सोडलेल्या
आहेत. विंचू गळाने पकडून त्याची नांगी तोडून स्वत:च्या
अंगावर चालवला आहे.
सायंकाळी
नदी थडीवरून उडत वडाच्या झाडावर मुक्कामाला जाणारे वटवाघूळं मी तासभर पहात रहायचो. याला
मी वटवाघळांची शाळा म्हणायचो. दारासमोर
पिंपळ होता. त्यावर अनेक पक्षी घरटे करायचे. या
सगळ्यांचे सूक्ष्म निरिक्षण व्हायचे. एखाद्या
रात्री पिंपळावर
रात्री घुबड येऊन बसायची. ती ओरडायची. तिचे
ओरडणे मात्र मला भयानक वाटत असे.
उन्हाळ्यात
ओट्यावर उघड्या आकाशाखाली झोपायचो तेव्हा आकाशातले इच्चू, चोरखाटलं, आकाशगंगा
न्याहाळत बसायचो. कोणी सांगितलं म्हणून तारा तुटला
म्हणजे एखादी चांदणी जळत खाली पडताना दिसली की थुंकायचो. कारण
तारा तुटणे म्हणजे अशुभ समजले जायचे.
पाऊस
हा तर माझा जवळचा मित्र होता. पावसाचे
वातावरण होऊन आले की मी मनोमन पावसाची आराधना करायचो. वारा
उलटायची वाट पहायचो. पावसाचे भाकित करायचो. तासन् तास ढगांचे निरिक्षण करायचो. पावसाचे
मला खूप आकर्षण आहे. म्हणूनच मी पावसाला आदिम तालाचे संगीत
म्हणतो. याच नावाचा माझा अहिराणी भाषेत कवितासंग्रह
आहे.
शाळा
शिकताना माझी बाहेरची शाळा अशीही सुरू होती. शिकता
शिकताच वाचण्याचीही गोडी लागली. इयत्ता
पाचवीत असतानाच राम गणेश गडकरी यांचे भावबंधन नावाचे नाटक अपघाताने शाळेच्या
वाचनालयातून माझ्या हाताशी लागले. त्यातील
अनेक संवाद तेव्हा कळले नाहीत तरी ते भावत होते म्हणून पूर्ण वाचले. याच
काळात शशी भागवत यांच्या मर्मभेद या पुस्तकानेही माझ्यावर मोहीनी घातली होती. चेटूक
केले होते असे म्हटले तरी वावगे होणार नाही. आठवीत
असताना मी शिवलीलामृताच्या
प्रभावाने शंकराची नवीन आरती तयार केली होती. ती
मी लिहिली असावी यावर घरातील कोणाचाच विश्वास बसत नव्हता. कारण
घरात वाचन-लेखनाची कोणतीही पूर्व परंपरा नव्हती. वडील
प्राथमिक शिक्षक होते. शाळेत मराठीच्या तास हा माझा सर्वात
आवडता तास असायचा. लेखकांबद्दल जबरदस्त आकर्षण वाटायचे. शिक्षक
कविता शिकवायला लागले की तेव्हा मी समरसून देहभान विसरून जायचो. माझ्यातील
कवीचा पिंड शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातील विविध कवितांवरच पोसला गेला. त्यामुळे माझा फायदा झाला की नुकसान ते मला सांगता येणार
नाही.
शिकता
शिकता मी अंगावर दुष्काळ झेलला आहे. घाटा, कुळदाचे
मुटकळे, कुळदाच्या घुगर्या, मुगाच्या घुगर्या, शिळ्या भाकरीचे सुगरे-भुगरे, शिळ्या
पोळ्यांचे गूळ टाकून शिजवलेले तुकडे, गूळ आणि
तेलाचा शिरा, पिठले, चटणी भाकर अशा प्रकारचे अन्न खाऊन पोट
भरून अभ्यास केला आहे.
लोंकाच्या
मळ्यात कामं केली आहेत. हरभरे उपटवणे, बाजरी
खुडणे, भुईमुंगाच्या शेंगा तोडणे, शेंगा
फोडणे, कापूस वेचणे अशी कामे मी केली आहेत, हे
माझ्या अनेक जवळच्या मित्रांनाही अजून माहीत नाही. अशा
आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतर घाईघाईने एक अशैक्षणिक क्षेत्रातील नोकरी पत्करली
आणि बाहेरून पीएच. डी. पूर्ण
करूनही अजून त्याच नोकरीत खितपत पडलोय. गाव सुटलं. सटाण्याला शिकलो नंतर ओझरला गेलो. नाशिकला शिकलो तरी
अनवाणी आणि पांढर्या पायजम्यावरच
वावरत होतो.
हे
सर्व अनुभव घेताना मी माझी अहिराणी मातृभाषा
बोलत होतो व अहिराणीतच जगत होतो. या
सर्व अनुभवात माझी मायबोली अहिराणी सखोल
मुरलेली आहे. अनुभव आणि माझी भाषा अहिराणी यांचे पृथगात्म असे संश्लीष्ट रूप
अंतर्मनात- अंतर्मनातल्या खोल कप्प्यात एकरूप झाले
आहे. म्हणून माझे बालपणातील अनुभवविश्व हे भाषा रूपात आविष्कृत
होताना अहिराणी भाषेशिवाय
तो दुसर्या भाषेत
अस्सलपणे आविष्कृत होऊच शकणार नाही- होऊच शकत
नाही. तसा प्रयत्न केला तरीही किमान अहिराणीचे अवशेष तरी त्या आविष्कारात अंतर्भूत झाल्याशिवाय रहात
नाहीत. म्हणून असे अनुभव लिहीत असताना मी काही शब्द अहिराणी वापरतो असं म्हणण्याऐवजी आविष्काराची
ती मागणी असते म्हणून ते शब्द आपोआप येत असतात, असे
म्हणावे लागेल.
मी
का लिहितो या प्रश्नाला उत्तर देताना, मला लिहिता
येतं म्हणून अथवा मी लिहायला पाहिजे म्हणून अथवा दुसरे काही करता येत नाही म्हणून, असे
उत्तर मला देता येणार नाही. कारण मी
जगलेलं, दुसर्याला सांगण्यासारखं आहे असं मला
वाटतं म्हणूनच मी लिहीत
असतो.
विरगाव
या माझ्या गावाशी तुटलेली नाळ जोडण्याचा मी अधूनमधून प्रयत्न करीत असतो. कारण
ती नाळ पुन्हा जोडली जात नाही. त्याचे दु:खं
आदिम तालनं संगीत या माझ्या अहिराणी कवितासंग्रहात
तोडेल नाळ सुईननी नावाच्या
कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ती अशी:
भारत जोडा
तरी
गाव तुटानी
जखम
भरता
भरत नही,
तोडेल नाळ
सुईननी
कथी फेकी
सापडता
सापडत नही!...
(या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या
ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/